शहाद्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात एक मोठे नेतृत्व म्हणजे कै. बूभता गुलाल पटेल. मंगेश बूभता हे त्यांचे थोरले चिरंजीव. राष्ट्रीय वृत्तीचे व नेतृत्वाचे बाळकडू त्यांना घरीच मिळाले होते. गांधीजींच्या दर्शनाने सहवासाने ते फार प्रभावित झाले होते. ३१ ऑगस्ट १९३० रोजी झालेल्या जयनगर येथील जंगल सत्याग्रहामध्ये ते एक प्रमुख सत्याग्रही होते. ज्यांनी जंगल विषयक कायदा मोडून कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला होता व शहादा तालुक्याचे नेतृत्व केले होते. चळवळीतील सहभागामुळे त्यांना एक वर्ष सक्त मजुरी व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. पुढे देखील स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाबद्दल त्यांना चार वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता.
१९३७ च्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते या परिसराचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतः त्यांचा प्रचार परिसरात केला होता.१९३७ ते १९३९ पर्यंत ते या परिसरातील इंग्रजी काळातील विधिमंडळाचे प्रतिनिधी म्हणजेच आमदार होते. शहाद्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील ते पहिले आमदार ठरतात.१९३९ मध्ये भारतीयांना विश्वासात न घेता इंग्रजांनी भारत दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाला असे जाहीर केल्याने काँग्रेसच्या आठही राज्यातील मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. त्यात यांचाही समावेश होता.
दोन वर्षाच्या कार्यकाळात लोणखेडा ते मंदाणे रस्ता बांधणी, अधिक धान्य पिकवा योजना तसेच सहकारी पाणीपुरवठा मंडळ, फेस इत्यादी सुधारणा राबविल्या. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे ते आठ वर्षे चेअरमन होते. १९५० मध्ये त्यांनी शहादा मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली व या बँकेचे ते चेअरमन होते. १९७८ साली मांगेशभाई कैलासवासी झाले. शहाद्यातील अशा थोर स्वातंत्र्यसैनिकास भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर विनम्र अभिवादन!
माहिती स्त्रोत- माननीय श्री ईश्वरकाका मंगेश पटेल, शहादा
लेखन - डॉ. पुष्कर शास्त्री
Published by - विश्व संवाद केंद्र, देवगिरी
===================================
0 टिप्पण्या