शहाद्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात १९३० सालातला जयनगर येथील जंगल सत्याग्रह ही एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना होय. शहादा तालुक्यातील पंधरा-वीस हजारांचा जनसमुदायाने हा सत्याग्रह घडवून आणला. यात महिलांची विलक्षण उपस्थिती होती. तीन ते चार हजार महिला या सत्याग्रहात उपस्थित होत्या. या सत्याग्रहाचे नेतृत्व श्री. राजारामबापू रावजी वाघ व श्री.मंगेश बभुता पटेल यांनी केले होते.
सोनवदचे श्री राजाराम बापू वाघ यांनी सर्वप्रथम उठून," मी गवत उपटण्याकरिता प्रतिबंधित भागात जात आहे, आपणही चला." असे सर्व सत्याग्रहींना आवाहन केले. सत्याग्रही शांततेने प्रतिबंधित भागात शिरले व त्यांनी गवताच्या पेंढ्या आणून गोमातेवर उधळल्या. याप्रसंगी औषध पाण्यासाठी नंदुरबारचे डॉ. काणे व शहाद्याचे डॉ. केसकर हे स्वयंसेवकांसह उपस्थित होते.
सत्याग्रहानंतर श्री.मंगेश बभूता पटेल व श्री. राजारामबापू वाघ या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना धुळ्यास नेत असताना रस्त्यात ठिकठिकाणी लोकांनी त्यांचा सत्कार व स्वागत केले. राजारामबापू वाघ यांना एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा व दोनशे रुपये रोख दंड ठोठावण्यात आला.
पुढील काळात श्री राजारामबापू वाघ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रभावित झाले.स्वा. सावरकर यांच्याबरोबर ते शहादा प्रकाशा व अन्य ठिकाणी फिरले होते. त्यांनी हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये देखील सहभाग घेतला होता. त्यांचा जन्म १ डिसेंबर १८९२ रोजी झाला होता. शिरपूर व शहादा तालुक्यात त्यांच्या शेतजमिनी होत्या. शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते. सोनवद तर्फे शहादा येथे त्यांची जमीन व घर होते. २१ जुलै १९७३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते शहादा तालुक्याचे थोर स्वातंत्र्यसैनिक होते.
प्रकाशा येथील 'महात्मा गांधी विधायक ट्रस्ट' ने त्यांचा सन्मान केला होता. तसेच महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री. वसंतराव नाईक यांच्या सहीचे प्रमाणपत्र देऊन स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी पर्वात शहादा तालुक्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक श्री राजाराम बापू वाघ यांच्या कार्याला शतशत नमन.
लेखन - डॉ. पुष्कर शास्त्री, शहादा
Published by - विश्व संवाद केंद्र, देवगिरी
------------------------------------------------------
0 टिप्पण्या