किनवट भाग म्हणजे आत्ताच्या तेलंगणा व विदर्भ प्रांताच्या सीमेवर असणारा निसर्गरम्य, पर्यटन व धार्मिक स्थळांचा प्रदेश. सुप्रसिद्ध सहस्त्रकूंड धबधबा व पैनगंगा अभयारण्य हे ह्याच परिसरात आहे. सोबतीला आदिशक्ती च्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ व अत्रीमुनींचा आश्रम असलेले पवित्र व पुरातन श्री क्षेत्र माहूर ( मातापुर) इथेच आहे.
रामायण काळात उल्लेख असलेल्या दंडकारण्याचा हा परिसर आहे. एवढेच नव्हे तर नाथ संप्रदायातील तीन धार्मिक स्थळ सुध्दा ह्याच भागात आहेत. मच्छिंद्रनाथ पार्डी, वडसा (पडसा) व वनदेव हे ते तिन नाथ संप्रदायातील दूर्लक्षीत तिर्थक्षेत्र. मच्छिंद्रनाथ पार्डी इथे नाथ संप्रदायाचे संस्थापक गुरू मच्छिंद्रनाथ यांचे तपश्चर्येचे भुमिगत स्थळ व वडसा(पडसा) इथे नाथ संप्रदायातील अजून एका नाथांचे संजीवन समाधी स्थळ आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गरम पाण्याचे कुंड असलेले ऊनकदेव वा ऊनकेश्वर इथेच आहे. ह्या तिर्थक्षेत्राचा उल्लेख रामायणातील अरण्यकांडात येतो. कुष्ठरोगाने पिडीत असलेल्या शरभंग ऋषींचा दंडकारण्यात असलेला आश्रम म्हणजे उनकेश्वर होय. ह्या शरभंग ऋषींचा कृष्ठरोग दूर व्हावा म्हणून प्रभू श्रीरामांनी आपल्या धनुष्याच्या साह्याने गरम पाण्याच्या कुंडाची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे. एवढेच नव्हे तर इथे प्रभूंनी दोन दिवस थांबल्याचा उल्लेख सुध्दा आहे. आजही इथे सोयरासीस व पांढरा डाग असणारे रोगी ह्या गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करून बरा झाल्याचे उदाहरणे आहेत.
श्री क्षेत्र उनकेश्वर येथे श्री शंकराचे मंदिर आहे जे पुर्ण दगडी बांधकामात (हेमाडपंथी) असलेले दृष्टीक्षेपात पडते. मंदिरावर दोन एक दिपमाळेवर शिलालेख आढळतो. एक शिलालेख हे क्षेत्र यादवकालीन असल्याचा पुरावा व 25 गावातून दिवाबत्ती ची सोय करणारा आदेश उपलब्ध आहे. ह्या शिलालेखावर त्या 25 गावाचा उल्लेख आढळतो. देवगिरी साम्राज्याचा पंतप्रधान हेमाद्री याने आपल्या राज्यात सनातन धर्मासाठी विष्णू व शिवाचे अनेक मंदिरे बांधली. उनकेश्वर त्यापैकी एक. एका शिलालेखवर हेमाद्री पंडित व सोमपंडित असा उल्लेख आढळतो. मुख्य दरवाजा वर असणारा शिलालेख जिर्णोद्धाराचा असून सिंदखेड इथे असलेल्या व्यक्तीने जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात शरभंग ऋषींची समाधी आहे तर बाहेरील भागात एक दिपस्तंभ व यज्ञकुंड नजरेस पडते. मंदिराच्या अगदी समोर एक गरम पाण्याचे कुंड आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात अजून कुंड असून त्याचा उपयोग पुजेसाठी होतो मात्र हे कुंड गरम पाण्याचे नसून थंड पाण्याने भरलेले आहे. एकाच ठिकाणी थंड पाण्याचे व गरम पाण्याचे कुंड हे आश्चर्यच आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या या देवलयांना आपण जरूर भेट दिली पाहिजे.
साभार :- डॉ.अंकूश सुरवसे, इतिहास अभ्यासक, किनवट
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#indianhistoryfacts #unakeshwar #Hemadri #DevgiriEmpire #kinwat #nanded #UnknownFacts #unknownhistory
0 टिप्पण्या