'हेमाद्री'
आज अभियांत्रिकी दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अश्या एका ऐतिहासिक पुरुषाची ओळख करून दिली पाहिजे.
इ.स. 12 व्या शतकात देवगिरी साम्राज्यावर यादवांचे प्रभुत्व होते. राजा रामदेवराय यादव यांचा पंतप्रधान ज्याला करणाधिप म्हंटल्या जायचं तो होता 'हेमाद्री'. अतिशय विद्वान, बहुगुणी, राष्ट्रभक्त, हिंदुधर्माभिमानी असा हा पंतप्रधान होता.
देवगिरीच्या अफाट साम्राज्याचा कारभार सांभाळत असताना त्याने संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने तीन महत्वाची कामे केलेली आढळतात. एक म्हणजे कमी शब्दात मोठा अर्थ सांगणारी, अतिशय सोपी अशी मोडी लिपी विकसित केली.
दुसरे म्हणजे 13 विविध ग्रंथांसह 'चतुर्वर्गचिंतामणी' हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला. क्षिणत्व पावत असलेल्या हिंदू धर्माला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्याने हा ग्रंथ रचला. ज्याला हिंदू धर्माचा ज्ञानकोश असा दर्जा दिला गेला आहे.
आणि तिसरे वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे भारतासमोर एक नवी स्थापत्य कला ठेवली ज्यामुळे भविष्यात हजारो वर्षापर्यंत सनातन हिंदू धर्माची प्रतीके, संस्कृती, चिन्हे आपली ओळख कायम ठेवतील. ते स्थापत्यशास्त्र म्हणजे आपल्याला परिचित असलेले 'हेमाडपंथी' स्थापत्यशास्त्र.
खान्देश, वऱ्हाड, आंध्र, कर्नाटक वगैरे प्रांतात हेमाडपंती शैलीची अनेक प्राचीन मंदिरे आपल्याला दिसून येतात. चुन्याच्या साहाय्याने दगडावर दगड ठेवून भिंत उभारण्याची पारंपरिक पद्धत त्याकाळी प्रचलित होती. परंतु हेमाद्रीने चुन्याशिवाय दगडावर दगड रचून बांधकाम करण्याची नवी पद्धत शोधून काढली. स्थापत्यशास्त्र, शिल्पशास्त्र व वास्तूविद्या शास्त्रातील ही क्रांती होती. आणि त्याचाच परिपाक म्हणून एक हजार वर्षानंतरही आपण त्या वास्तू अनेक आक्रमणे झेलल्यानंतरही सुस्थितीत असल्याचे पाहतोय. हा आहे आपली गौरवशाली इतिहास!
हेमाद्रीसोबत ज्या अभियंत्यांनी सहकार्य केले असेल, त्याचे सहकारी असतील, त्याच काळातील एक एक प्रकल्प पूर्णत्वास नेणारे प्रोजेक्ट इनचार्ज, आर्किटेक्चर, शिल्पकार, सुतार, लोहार व अन्य सर्व सहकारी असतील त्यांची विद्या आणि ज्ञान काय अफाट असेल.
आज आपण ज्या लोकांना भटके विमुक्त म्हणून रस्त्याच्या कडेला दगड फोडताना, जाते वरवंटा बनवताना पाहतो ना हीच लोक त्या काळी मोठमोठी शिल्प घडवीत होती. त्यांनी आपली कला ब्रिटिशांच्या वाहिली नाही म्हणून ब्रिटिशांनी त्यांना चोर, डाकू, लुटारू असा शिक्का मारून वाळीत टाकून दिले. आजही त्याच स्थितीत त्यांचं जिणं सुरूय. किती दुर्दैव आहे आपलं.
हेमाद्री हे केवळ एक उदाहरण आहे. अशी शेकडो नावं इतिहासाच्या पानात आपल्याला सापडतील. अश्या हजारो वास्तू आपल्याला सापडतील ज्या अभूतपूर्व आहेत. त्यांना पाहायला जगभरातून लोक भारतात येतात. पण आम्ही या वस्तूंकडे केवळ दगड म्हणून पाहतो. ही शोकांतिका आहे.
अभियांत्रिकी दिनाच्या सर्व अभियंता मित्रांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यातून भारताचा निरंतर गौरव वाढत राहो हीच कामना.
- कल्पेश जोशी, संभाजीनगर
kavesh37@yahoo.com
©विश्व संवाद केंद्र, देवगिरी
संदर्भ - हेमाद्री उर्फ हेमाडपंत, लेखक - ऍड. केशव अप्पा पाध्ये
#हेमाद्री #Hemadri #Hemadpant #DevgiriEmpire #देवगिरी #EngineersDay #HistoryOfIndia #IndianArcheology #vskdevgiri
0 टिप्पण्या