जळगांव विटनेर दर्ग्यावर पाकिस्तानचा झेंडा लावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश


जळगांव। 22.02.2023
जळगावात विटनेर येथील दर्ग्यावर पाकिस्तानचा झेंडा आढळून आल्या प्रकरणी मा. न्यायालयाकडून देशद्रोह कलम 156 (3) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 18 जानेवारी 2023 रोजी हा धक्कादायक प्रकार लक्षात आला होता. सामाजिक कार्यकर्ते हेमंत गुरव यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. 


सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की सामाजिक कार्यकर्ते हेमंत गुरव यांना विटनेर येथील दर्गासमोर पाकिस्तानचा हिरवा पांढरा व चांद तारा असलेला राष्ट्रध्वज लावलेला आढळून आला. त्याबद्दल त्यांनी स्थानिकांना व दर्ग्याची देखभाल करणाऱ्या अमीन तडवी या व्यक्तीला विचारणा केली असता महिनाभरापासून हा नेरी येथील गोपाल कहार या व्यक्तीने हा झेंडा लावल्याचे समजले. दर्ग्याची जागा सुद्धा जवाहर ललवाणी या व्यक्तीच्या नावे असून अनधिकृत जागेवर दर्गा उभारला असल्याची माहिती हेमंत गुरव यांनी दिली. 


या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या सदर बाब लक्षात आणून देऊन जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. परंतु पोलीस गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली व सदर घटना राष्ट्रविरोधी असून यामुळे समस्त देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे सांगितले. घटनेतील सत्यता व गांभीर्य लक्षात घेऊन मा. जिल्हा न्यायालयाने एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ देशद्रोह कलमाखाली आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा केला प्रयत्न - हेमंत गुरव

सदर घटनेची स्थानिकांशी बोलून सविस्तर माहिती घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो असता पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी टाळाटाळ केली व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालयात जाण्याचे ठरवले. धार्मिक स्थळाजवळ शत्रू राष्ट्राचा ध्वज लागणे समस्त देशवासीयांच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व या भागात अजून काय काय असामाजिक गतिविधि चालतात याचा तपास करावा असे हेमंत गुरव यांनी म्हंटले आहे. 


----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या