बंजारा संस्कृतीतील होळी सणाचे महत्व



भारतीय सनातन संस्कृती विविध सण उत्सवांनी नटलेली आहे. समाजात एकोपा रहावा तसेच समाज संघटित, सुरक्षित व समरस रहावा यासाठी सण उत्सवांचे अनन्य साधारण महत्व आहे. होळी हा सण पूर्ण भारतात विविध प्रकारे साजरी केला जातो. बंजारा समाजातील होळी सण तर फारच उल्लेखनीय असतो. 

बंजारा समाजात दोन सण प्रामुख्याने साजरी केले जातात एक होळी आणि एक दिवाळी. बंजारा समाजाचा पारंपारिक आणि अति विशेष सण म्हणजे होळी आहे. बंजारा समाजाच्या आकर्षक संस्कृतीचे दर्शन होळी मधून दिसते. बंजारा समाजात दांडी पौर्णिमेपासून होळीला सुरवात होत असते म्हणजे एक महिना आधीपासून. या होळी उत्सवात अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वचजण सहभागी होतात. निसर्गाला अनुसरून होळी उत्सव साजरा केला जातो.

तांड्यात जे वर्षभरात जे मरण पावले आहेत त्यांच्याघरी होळीच्या आठ दिवस आधी तांड्यातील व्यक्ती भेट देतात व त्यांचे सांत्वन करतात. त्यानंतर त्यांड्याचा नायक त्यांड्यातील प्रत्येकाला होळी उत्साहात सहभागी होण्याची विनंती करतो. होळीच्या काही दिवस आधीपासूनच तांड्यातील नायकच्या घरासमोर रात्री 'डफडा' या पारंपरिक वाद्याच्या तालावर होळीची लेंगी नृत्य गाणी गायले जातात. महिला त्यांच्या गट करून व पुरुष त्यांच्या गट करून पारंपरिक लेंगी नृत्य गाणी सादर करतात. हा आनंदाचा उत्सव असल्यामुळे मौजमजेसाठी गाणे गातांना एकमेकांवर विडंबन केले जाते. होळीच्या उत्सवात सर्वप्रकारची गाणी गायली जातात.

बंजारा समाजात नृत्याचे विविध प्रकार आहेत राधा नृत्य, लडी नृत्य, उपरेरो नृत्य, पीर नृत्य, लंगडी पाय नृत्य. सर्व नृत्य होळी साजरी करत असताना सादर केले जातात. बंजारा समाजाचा इतिहास हा मौखिक असल्यामुळे लोकगीतांच्या माध्यमातून इतिहास समजतो. लोकगीतांना   बंजारा समाजात महत्व अनन्यसाधारण महत्त्व आहे. नृत्य आणि लोकगीतांशिवाय बंजारा समाजाची होळी होऊच शकत नाही. होळी उत्सव पारंपरिक नृत्य, लोकगीते हे बंजारा समाजाचे अविभाज्य घटक आहेत.

सर्व ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी होलिका पेठवून होळी साजरी केली जाते मात्र बंजारा समाजात दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी अंधारात होळी पेटवली जाते. परंपरेनुसार तांडासमोर पूर्व दिशेला होलिकेस पेटवल्यानंतर महिला व पुरुष निघून जातात, पण युवक युवती होलिकाजवळ गाणी गातात आणि नाचतात. होळी खेळणा-या युवकाला 'गेरीया' तर युवतीला 'गेरळी' असे म्हटले जाते. मौजमजेसाठी महिला मोठ्या, मोठ्या काठ्या घेवून पुरुषांवर प्रहार करतात. विशेषकरून वहिनी-दिरावर काट्यांचा प्रहार करते. बंजारा समाजात केसुलाला(पळस) विशेष महत्त्व आहे. तांड्यावर केसुलाला पाण्यात टाकून ओला रंग केला जातो व तो मोठ्याप्रमाणात वापरला जातो.

ज्यांच्या घरात होळीच्या आधी किंवा नंतर मुलगा जन्माला आला आहे त्याचा जन्मदिवस होळीच्या दिवशी साजरी केला जातो त्याला 'धुंड' असे म्हणतात. ज्यांच्या घरात लहान मूल जन्माला आलं आहे त्याचा शोध घेतल्या जातो व त्यांच्या अंगणात 'धुंड' केला जातो. धुंड करत असताना त्यांड्यातील सर्वजण नंगारा, डफडा वाद्य वाजवत लेंगी गातात व नृत्य करतात. 'धुंड' च्या ठिकाणी खीर एका हंड्यात टाकली जाती, तो हंडा एका खड्यात टाकल्या जातो, मग नंतर तो हंडा काढण्यासाठी पुरुष प्रयत्न करतात तेव्हा महिला त्यांच्यावर लाठीमार करतात, कितीही लाठीमार झाला तरी शेवटी पुरुष तो हंडा पळवून नेतात.

बंजारा समाजाच्या होळी मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसतो, तांड्यातील प्रत्येकजण होळी उत्सव साजरा करण्यासाठी घराबाहेर एकत्र येतात. होळी सण साजरी करतांना बंजारा समाजातील सर्वसमावेशकता, संघटीतपणा, एकात्मता, बंधुभाव सहजपणे दिसून येतात. हजारो वर्षापासून देश व समाज रक्षणासाठी बंजारा समाज विविध प्रांतात भटकंती करत राहिला, तरीही आपली सनातन संस्कृती या समाजाने जपून ठेवली आहे. 

- दिपक राठोड, छत्रपती संभाजीनगर

@विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या