फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या एक महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात गावोगावी अनेक तरुण, बालक, महिला छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पळून छत्रपती संभाजी महाराजांच्या बालीदानानिमित्त श्रद्धांजली अर्पण करतात. मूक पदयात्रा काढतात. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र वाचतात. गेल्या अनेक वर्षापासून पू. संभाजी भिडे गुरुजी यांनी हि शिकवण समाजात रुजवली. या वर्षी २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत हा बलिदान मास पाळला जात आहे.
काय आहे बलिदान मास?
छत्रपती संभाजी महाराजांची मुघल बादशाह औरंगजेब याने क्रूरपणे महिनाभर छळ करून हत्या करविली होती. छत्रपती शंभूराजे अवघ्या भारतीयांचे दुसरे छत्रपती होते. शिव छत्रपतींनी निर्माण केलेल्या हिंदवी साम्राज्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळत असताना बेसावधपणे हल्ला करून औरंगजेबाच्या सैन्याने त्यांना अटक केली व महिनाभर शारीरिक यातना देऊन फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हत्या केली. इस्लाम किंवा मृत्यू, असे दोनच पर्याय औरंजेबाने शंभू राजांसमोर ठेवले होते. शंभू राजांनी मरणांत यातना सहन केल्या, पण हिंदू धर्म सोडला नाही. राष्ट्र व धर्मासाठी हे सर्वोच्च बलिदान होते. शंभूराजांच्या या बलिदानाचे महत्व आपल्या प्रत्येक पिढ्यांना कायम स्मरणात राहिले पाहिजे, त्यांनी जो त्याग केला त्याची प्रत्येक भारतीयाला जाणीव राहिली पाहिजे म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेचे धारकरी, शिवभक्त व समाज बांधव हा बलिदान मास पळून छत्रपती शंभू राजांना श्रद्धांजली अर्पण करतात .
“मृत्यूस हि न डरले मनी धर्मवीर |
फुटले स्वनेत्र तुटली जरी जीभ शीर |
दूरदान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा |
म्हणुनी उरांत धरू या शिवसिंहछावा ||”
बलिदान मास मध्ये काय करावे?
बलिदान मास म्हणजे शंभू राजांच्या बलिदानाचे स्मरण. त्यांनी ज्या यातना सहन केल्या त्याची जाणीव व्हावी म्हणू आपण महिनाभर सर्व सुखांचा त्याग करणे होय. या महिन्यात अनेकजण गोड धोड खाणे टाळतात. दिवसात एकाच वेळ जेवण करतात. मनोरंजन व उत्सव साजरी करत नाही. अनेकजण जोडे चपला परिधान न करता अनवाणी राहतात. अश्या विविध प्रकारे सुखाचा त्याग देवघरात शंभू राजांची प्रतिमा ठेवून त्याचे पूजन करतात. तसेच, महाराजांच्या प्रतिमेसमोर दिवा लावतात. दररोज संध्याकाळी ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र म्हणतात. आपण घरात जे खाऊ त्याचा नैवेद्य दाखवतात.
पू. भिडे गुरुजी यांनी समाजाच्या धमन्यात शिवशंभू नावाचा रक्तगट तयार व्हावा म्हणून सर्व सुखांचा त्याग करून अवघे आयुष्यभर गावोगावी हिंडून समाजात विविध उपक्रम घेऊन शिव विचार रुजवला. राष्ट्रभक्ती व धर्मभक्ती निर्माण केली. हेच संस्कार भारताचे भवितव्य तारू शकतील. देशभरात औरंगजेबप्रेमी देशविरोधी शक्ती कश्या पद्धतीने विषारी फुत्कार काढत आहेत हे समाज बघत आहे. अश्या पार्श्वभूमीवर शिवशम्भूंच्या विचारांनी प्रेरित झालेला युवावर्ग हाच सज्जन शक्तीला आधार ठरू शकेल.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या