ब्रम्हलीन परमपूज्य संत श्री.लक्ष्मण चैतन्य जी बापूजींचा संक्षिप्त जीवन परिचय
प.पू.बापूजींचा जन्म- 15 ऑगस्ट, 1968 रोजी महाराष्ट्रातील एक लहानसे गाव पाल (ता.रावेर, जि.जळगाव) या गावात एका सामान्य कुटुंबात झाला. बालपणी त्यांचे चौथी पर्यंतचे शालेय शिक्षण याच गावात झाले. पूर्वजन्मातील संस्कारामुळे त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी घर-परिवार सोडून आध्यात्मिक मार्गाला त्यांनी सुरुवात केली. ईश्वरप्राप्तीच्या उत्कट इच्छेमुळे पाल या गावातील एका उंच टेकडीवर एकांतवासात राहून 17 वर्षे फलाहार सेवन करून त्यांनी ध्यान साधना केली. या साधना काळात पूज्य बापूजींना 'दिव्य शक्ती" प.पू.सद्गुरु भगवान श्री.रामदेवजी बाबा यांच्या रुपात वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा देत असत. परंतु बापूजींनी सद्गुरू परंपरेचा सन्मान करण्यासाठी ईश्वरीय संकेतानुसार संत श्री.महादेव चैतन्यजी महाराज (श्री.दगडूजी बापू) यांना सदगुरु म्हणून स्वीकार केले.
आध्यात्मिक साधनेच्या प्रभावामुळे दिनांक- 16 नोव्हेंबर, 1995 रोजी, शुक्लपक्ष नवमीला परमपिता परमात्मा च्या 'दिव्य प्रकाशा' चे "दिव्य ज्योती स्वरूप" दर्शन झाले. या दिव्य अनुभूती दर्शनाच्या परमानंदात पूज्य बापूजी पुढील 04 वर्षे मौनव्रतात राहिले. 01 जानेवारी, 2000 रोजी सुरू झालेल्या- 05 दिवसीय "विष्णु महायज्ञ" मध्ये गुरु महामंडलेश्वर त्यागमूर्ती श्री.गणेशानंद पुरीजी महाराज (साधना सदन, कंखल- हरिद्वार) यांच्या मुख्य उपस्थितीत बापूजींनी आपले मौन विसर्जित केले.
पूज्य बापूजींनी आपणांस प्राप्त ईश्वरीय ज्ञान प्रसादाचे देशातील विविध राज्ये- प्रांत, शहरांपासून खेड्यापर्यंत, भव्य दिव्य "गीता रामायण सत्संग" आणि "एक दिवस स्नेह मिलन" च्या माध्यमातून भक्ती प्रसार केला. पूज्य बापूजींचा ठाम विश्वास होता की, समाजात दैवी ज्ञानाची देवाणघेवाण होणे सोपे नाही. म्हणून ती कुठंही शोधू नका. बापूजींनी कोणतीही भेटवस्तू कधी स्वीकारली नाही. त्यांचे अंतिम उद्दिष्ट फक्त "लोककल्याण" हेच होते. या लोककल्याण करुणेमुळे पूज्य बापूजींनी जुलै- 2002 मध्ये "गुरुपौर्णिमा उत्सवाच्या" शुभ मुहूर्तावर अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराची स्थापना केली. पूज्य बापूजींचे आज श्री.वृंदावन धाम आश्रम- पाल, ता.रावेर, जिल्हा-जळगाव(महाराष्ट्र), श्री.दगडूजी बापू धाम चारुकेश्वर आश्रम- खेडीघाट, ता.बडवाह, जिल्हा- खरगोन (मध्य प्रदेश), सद्गुरू धाम आश्रम- कन्नड, ता.कन्नड, जिल्हा- संभाजीनगर (महाराष्ट्र), श्री.रुणीचा धाम आश्रम- सडीया पानी, ता.हरसुद, जिल्हा- खंडवा(मध्यप्रदेश) व शबरी धाम आश्रम- आंबा, ता.नेपानगर, जिल्हा- बुरहानपूर(मध्यप्रदेश) असे मिळून सर्व- पाचही आश्रमात "ज्ञान, भक्ती, कर्म आणि लोककल्याणाचे अनेक उपक्रम अविरत चालू असतात.
या विविध लोककल्याण कार्यामध्ये विविध राज्यांमध्ये गांव गांव ध्यान केंद्र, तसेच तालुकास्तरीय होणाऱ्या भक्तीसभेत अहिंसा, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, ग्राम स्वछता, शिक्षण, सनातन संस्कृती, युवकांमध्ये जागृती असे अनेक कार्य बापूजींनी आश्रमाद्वारे केलेले आहे व आज ही कार्ये सुरू आहेत. त्यासोबतच आश्रमांमध्ये होणाऱ्या ध्यान साधना शिबिराच्या माध्यमातून अध्यात्मिक जागृती, सामाजिक जागृती, स्वतःची ओळख, सकारात्मक दृष्टिकोन, व्यक्ती निर्माणाचे कार्य, गोपालन व गोशाळा चालवणे असे अनेक कार्य करण्याचे मार्गदर्शन पूज्य बापूजी सतत करीत असत.
सातपुड्यातील खोऱ्यात वसलेल्या जनजाती वनवासी समाजाला, बंजारा समाजाला व अन्य सर्व समाजांना प्रामुख्याने पूज्य बापूजींनी एक नवीन अध्यात्मिक संजीवनी मिळवून दिली. त्या सर्वांना समाजाच्याव प्रामुख्याने हिंदू धर्माच्या रक्षणाचे व हिंदू धर्माच्या मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्याचे मोठे कार्य पूज्य बापूजींनी केलेले आहे.
संकटाच्या विविध काळात आश्रमाद्वारे या सर्व सातपुडा खोऱ्यातील जनजाती वनवासी समाजामध्ये जाऊन विविध भोजन भंडारे, भोजन सामग्री, धान्य सामग्री वितरित करण्याचे कार्य केले जात असते. याची मोठी अनुभूती कोरोना काळात सर्वांनीच अनुभवली.
पूज्य बापूजींनी त्यांना झालेल्या ईश्वरीय साक्षात्काराला गोपनीय ठेवले होते. या गोपनीय ईश्वरीय साक्षात्काराला आपण दि. 10 डिसेंबर 2009 रोजी आश्रम समर्पित ब्रह्मचारी यांना सांगताना, पूज्य बापूजी म्हणाले की, "मला ध्यानात ईश्वरीय साक्षात्कार, प्रकाश जाणवला होता, तो प्रकाश मी आता अधिकाधिक अनुभवतो आहे. यास ईश्वर माना अथवा ईश्वरीय ऊर्जा माना. श्री.गीताजी मध्ये भगवंतांनी सांगितले आहे की, 'ज्योतिषामपि तजज्योति'. म्हणूनच आम्ही या प्रकाशाला ईश्वरच मानतो. तुम्ही सर्वजण त्या प्रकाशाच्या प्राप्तीपर्यंत पोहोचा, त्याआधी तुम्हाला जे काही मिळालं, ते प्रकाशापर्यंत मी तुम्हांला तुमच्या मेहनतीने पोहोचवलं आहे.
ब्रह्मलीन होण्यापूर्वी प.पू.बापूजींनी पूज्य श्री.गोपाल चैतन्य बाबाजी यांना अ.भा.चैतन्य साधक परिवार, पाल आश्रम आणि चारुकेश्वर आश्रम व अन्य सर्व आश्रमांच्या संपूर्ण कार्याची जबाबदारी व गादीपती म्हणून नियुक्त केली होती.
दि.25 डिसेंबर 2009, वार- शुक्रवार रोजी पूज्य बापूजी ब्रम्हलीन झाले. आज पूज्य संत श्री.लक्ष्मण चैतन्य बापूजींना ब्रम्हलीन होऊन पूर्ण- 13 वर्षे पूर्ण होत आहेत. पूजनीय बापूजींच्या पावन स्मृतीस शत शत नमन..!
माहिती साभार - जितेंद्र गवळी, पाल
-- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या