भारताचे उद्धारकरते राष्ट्रभक्त 'बाबासाहेब'


         
    डॉ. बाबासाहेब हे केवळ दलितांचे नाहीत साऱ्या समाजाचे आहेत, अखिल भारत राष्ट्राचे आहेत. हे राष्ट्र प्रगत प्रबल एकसंध व्हावे अशी त्यांची आकांक्षा होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ते विशेषता दलितांच्या हक्कासाठी संघर्ष करत होते,त्या कालखंडात सर्वात महत्वाचा विषय दलित उद्धाराचाच होता. पुढे स्वातंत्र्य भारताच्या घटनेत दलितांना कोणते हक्क मिळणार याची काळजी करणे त्यांना आवश्यक वाटत होते. त्यांनी घटनेच्या माध्यमातून सर्व हक्क दिले. तसेच समान सामजिक न्याय व अधिकार सर्व भारतीयांना देण्यात आले.भारतीय घटना कोणाला ही वंचित ठेवत नाही. सर्वाना समानतेने पुढे घेऊन जात आहे. आज बाबासाहेबांना साऱ्या राष्ट्राचे म्हणून समजून घेण्याचे तसेच 'राष्ट्रवादी बाबासाहेब' समाजासमोर मांडण्याची गरज आहे, म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेषता दलित हक्कांच्या संबंधात त्यांनी मांडलेली भूमिका आज जशी आहे तशीच आज उद्धृत करणे योग्य ठरणार आहे. त्यांची एकूण राष्ट्र विषयाची एक राष्ट्रपुरुष म्हणून भूमिका मांडण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आज एकूण जागतिक स्तरावर भारताला पुढे घेऊन जाताना बाबासाहेबांचे विचार अतिशय प्रेरणादायी ठरत आहेत आणि सर्व समाजातील सर्व स्तरातील विकास झाल्याशिवाय देश पुढे जाणार नाही, त्यामुळे सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारी बाबासाहेबांची सामाजिक न्यायाची भूमिका मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सर्व समाजाचा विचार करणे गरजेचे आहे.

      बाबासाहेबांनी तीन गोष्टी आपल्या उपासनेमध्ये प्राधान्याने ठेवल्या. विद्या,शील आणि राष्ट्र. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांनी या तीन निकषावर घासून आत्मसात केलेली दिसते. विद्या, शील आणि राष्ट्र हिताच्या आड जे जे येईल त्याच्यावर त्यांनी कठोरपणे घाला घातला आहे. महापुरुषांचे जीवन हे समाजाला सतत दिशा दाखवणारे असते आणि त्यांच्या गुणामुळे सर्व समाजाला प्रेरणा मिळते. आज युवकांमध्ये राष्ट्र अभिमान व अस्मिता जागृत करण्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनाची प्रेरणा महत्त्वपूर्ण आहे.
           
       दिनांक १३ डिसेंबर १९४७ रोजी घटना समितीत भाषण करताना बाबासाहेब म्हणाले आज आपण राजकीय सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुभंगलेले आहोत, याची मला जाणीव आहे. आपण विरोधी छावण्या करून आहोत आणि मीही कदाचित युद्धाची छावणी ठोकुन राहिलेल्या एका समाजाचा नेता आहे. परंतु, असे असले तरी माझी पूर्ण खात्री आहे की परस्थिती नि काळ येताच आपल्या एकतेस कोणतीही गोष्ट अडथळा करू शकणार नाही. जरी जाती नी पंथ अनेक असले तरी आपण एक राष्ट्र होऊ, या विषयी माझ्या मनात शंका नाही.

              पुण्यातील विद्यार्थी संमेलनात युवकांसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले, "माझ्या तरुण मित्रांनो तुम्हा सर्वांना पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. आज तुम्हाला माझ्या आयुष्याचे एक गुपित सांगतो. तुम्ही खूप शिका, पण विद्येबरोबरच आमच्यातील शील आवश्यक आहे. शिलाशिवाय विद्या फुकाची आहे. युवका जवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान नसेल तर तोच युवक विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील. शिलाशिवाय युवक निपजू लागले तर त्यांच्यामुळे क्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे.

     बाबासाहेबांनी दलितांबरोबरच या देशातील प्रत्येक शोषित माणसाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. म्हणून बाबासाहेब केवळ दलितांचेच नव्हे, तर आधुनिक भारताच्या निर्मितीचे प्रमुख राष्ट्रीय नेते आहेत. पण आपल्या समाज व्यवस्थेने बाबासाहेबांना कुठेतरी जातीच्या चौकटीत बसवण्याचा करंटेपणा केलेला दिसतो. बाबासाहेबांनी सातत्याने एकात्म भारताचा पुरस्कार केला. बाबासाहेब प्रखर राष्ट्रभक्त होते. भारतीय संघराज्यात विलीन न होता स्वतंत्र राहू पाहणाऱ्या हैदराबादच्या निजामाविरुद्ध भूमिका घेताना त्यांची राष्ट्रभक्ती प्रखरपणे जाणवते. तसेच काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, यास्तव ३७० कलमाला बाबासाहेबांचा कठोर विरोध होता. आज ३७० कलम रद्द केले आहे, पण त्याचे सर्वात मोठे श्रेय बाबासाहेबांचे आहे. कारण घटनेमध्ये केवळ तात्पुरत्या स्वरूपाची योजना अशा पद्धतीने ३७० कलमला ठेवले होते, म्हणून आज भारत अखंड राहण्याच्या दृष्टिकोनातून काश्मीर आपल्याशी जोडला गेला.

                 कोणत्याही राष्ट्राच्या दृष्टीने 'समान संस्कृती आणि समान इतिहास' हा त्याच्या एकतेचा गाभा असतो. 'भिन्न संस्कृती भिन्न इतिहास' असलेले राष्ट्रीय धर्म जो पुढे भविष्यात देशाच्या एकतेला धोका होईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनवतील असा धर्म मी केव्हाच स्वीकार  करणार नाही. कारण या देशाच्या इतिहासात स्वतःला विध्वंसक म्हणून घेण्याची माझी इच्छा नाही. म्हणजेच बाबासाहेबांनी अतिशय सखोल चिंतन करून या देशातीलच संस्कृती इतिहास आणि परंपरा यांच्याशी सुसंगत असणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

           अस्पृश्योद्धार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे ध्येय असले तरी त्यांनी राष्ट्रीय हिताकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रनिष्ठा जोपासली देशाच्या इतिहासात आपली आणि आपल्या अनुयायांची अराष्ट्रीय अशी नोंद होऊ नये, म्हणून सतत काळजी घेतली. मी खरा देशभक्त आहे, स्वातंत्र्य चळवळीतील कोणत्याही मोठ्या नेत्यांपेक्षा माजी राष्ट्रनिष्ठा अधिक आहे, असे ते नेहमी म्हणत असत. त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचे साक्ष देणारी अनेक प्रसंग सांगता येतात. हैदराबाद संस्थानात तेथील जनतेने निजामाविरुद्ध लढा पुकारला त्यावेळी तेथील रजाकरी सेनेने अस्पृश्य जनतेवर अन्याय अत्याचार केले. त्यांची घरेदारे उद्ध्वस्त केली. त्यासंबंधी डॉ.बाबासाहेब यांनी सर्व समाजाला अवाहन केल, कोणत्याही परिस्थितीत कितीही संकटे आली तरी निजामाला साथ देता कामा नये आणि या पद्धतीने त्यांनी अतिशय प्रखरपणे आपली राष्ट्रीय भूमिका मांडली.

            डॉ.आंबेडकरांचा कम्युनिस्टाच्या  सर्वकष हुकुमशाहीच्या तीव्र विरोध होते. ते म्हणतात हुकुमशाही संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य याचा अभाव असतो. संसदीय लोकशाहीत नागरिकापाशी अधिकार आणि कर्तव्य दोन्ही असतात ,पण हुकूमशाही नागरिकापाशी केवळ आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी असते. तक्रार करण्याचा कोणताही अधिकार असत नाही. बाबासाहेबांना रक्तरंजित क्रांतीसाठी लोकशाहीत कोणतेही स्थान नको होते. तसेच राजकारणातील व्यक्ती पूजेला विरोध होता. राजकीय जीवनात समानता आणि सामाजिक आर्थिक जीवनात असमानता अशी स्थिती होऊ नये यासाठी बाबासाहेब सजग होते एका बाजूने समानता आणि दुसऱ्या बाजूने असमानता अशा ढोंगाने  लोकशाही धोक्यात येईल अशा पद्धतीने त्यांचे परखड मत होते.

         दिनांक:०६/०२/१९५४ रोजी श्री. अत्रे यांच्या 'महात्मा फुले' चित्रपटाचे उद्-घाटन करताना डॉ.बाबासाहेब म्हणाले आज देशात चारित्र्यच उरलेल नाही आणि ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य अतिशय खडतर आहे. तुमच्यामध्ये जर चारित्र्य आणि नीतिमत्ता राहिली नाही, तर देशासमोर काळोखच उभा राहील. ज्याला धर्म उत्तमरित्या समजला तोच देशाला तारू शकेल. महात्मा फुले अशा धर्मसुधारकांपैकी होते. विद्या, प्रज्ञा,करुणा,शील व मैत्री या धर्मतत्त्वानुसार प्रत्येकाने आपले चरित्र बनवले पाहिजे. करुणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो. करुणा म्हणजे माणसामाणसांमधले प्रेम आणि याच्याही पुढे मनुष्य गेला पाहिजे.

        'राष्ट्रवाद' म्हणजे काय या सर्वात मूलभूत तत्त्वाला बाबासाहेबांनी आपल्या जीवनाशी जोडलेले आहे.त्यांच्या भाषण व ग्रंथातुन पाहण्यास मिळते.राष्ट्रीयत्व ही सामाजिक भावना आहे ही एकाकीपणाची सामूहिक भावना आहे. ज्यांच्या मनात ही भावना निर्माण होते त्यांच्यात बंधुत्वाचे भावना नक्कीच निर्माण होते. आणि बंधुभाव निर्माण झाल्याशिवाय समता निर्माण होणार नाही, त्यासाठी बंधुत्वाच्या नात्याने सर्व समाज जोडला पाहिजे आणि त्यासाठी सर्व समाजाने आणि समाजातील नेत्याने पुढाकार घेऊन सर्व समाजाप्रती बंधुत्वाची नाळ जोडली गेली पाहिजे तरच भारत प्रगती करु शकेल यावर बाबासाहेब ठाम होते.

       आजच्या नव्या पिढीसमोर  बाबासाहेब आंबेडकर आदर्श असले पाहिजेत त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनाचा त्यांच्या विचारांचा डोळे उघडे ठेवून अभ्यास केला पाहिजे. मी जाणीवपूर्वक असे म्हणेल की डोळे उघडे ठेवूनच बाबासाहेबांचा जीवनाचा व त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणे एवढे सोपे नाही. ते ज्ञानाचा अथांग महासागर आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या असंख्य लाटा प्रकट होत होत्या. माझ्या लोकांना अन्यायाच्या गर्तेतून बाहेर काढायचे हे त्यांच्या जीवनाचे लक्ष होते, परंतु लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना राष्ट्रहिताला थोडा ही धक्का लागणार नाही याचे भान त्यांचे सातत्याने असायचे. समाजाविषयी असणारी त्यांची तळमळ राष्ट्राप्रतीचा त्यांचा भक्तिभाव आपल्या शरीरातही आपण भिनवला पाहिजे आणि आपणही आंबेडकरमय होऊन गेले पाहिजे. अशा  राष्ट्र उद्धारक व राष्ट्र समर्पित महामानवाला कोटी कोटी वंदन.... 

- डॉ. सोमीनाथ सारंगधर खाडे, जालना    
  संपर्क: ८२७५५१५९३८

विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या