छत्रपती संभाजीनगर: किरडपुऱ्यातील श्रीराम मंदिर औरंगजेबाने नव्हे तर ‘या’ हिंदू राजपूत राजाने बांधले

@डॉ. प्रसन्न पाटील

छ्त्रपती संभाजीनगर येथील किरडपुऱ्यातील श्रीराम मंदिर नुकत्याच झालेल्या जिहादी हिंसाचारा नंतर चर्चेत आले. त्यानंतर या मंदिराचा इतिहास आणि स्थापना कोणी केली यावरून सोशल मीडियात काही पोस्ट वायरल झाल्या. वायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत होता की हे श्रीराम मंदिर औरंगजेबाने बांधले आणि त्यानेच जागा दिली. पण याबद्दल सत्यता काही वेगळीच आहे. 

रेटून बोललं की खोट्याचं खरं होतं असं वाटतं कांही लोकांना. किराडपुऱ्यातील श्रीराममंदीर व या मंदीराची जागा औरंगजेबाने दिली अशा प्रकारची पोस्ट कालपासून फिरत आहे. आताच्या छत्रपती संभाजीनगरात औरंगजेब १६३६ ते १६४६ एवढा काळ रहात होता. म्हणजे फक्त दहा वर्ष. त्याच्यापूर्वी काही हजार वर्षांचा या भूमीचा, या परिसराचा इतिहास आहे. थेट सातवाहन, देवगिरीचे यादव पुढे मलिक अंबर, थोरले महाराज शहाजीराजे भोसले असा गौरवशाली इतिहास. 

त्यानंतर शहाजहानच्या रुपाने मुघल आले. पुढे औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैद करून स्वतःला बादशाहपदी स्थापित केल्यानंतर त्याच्या मुलाला इकडे पाठवलं ते ही स्वतःला धोका नको म्हणून! 

सांगायचा मुद्दा हा की, मुघलांकडून असलेले मातब्बर राजपूत सरदार इथे राहत होते व त्यांच्या शौर्यामुळे मुघलांचं दख्खनचं राज्य चालायचं. या शूर हिंदू सरदारांवरून शहरातील विविध पुऱ्यांची (भाग) नांवे आहेत. (उदा. कर्णपुरा, बायजीपुरा, किराडपुरा) या मातब्बरांच्या धार्मिक कार्यात औरंगजेब किंवा शहजादा मुअज्जम ढवळाढवळ करू शकत नव्हते. त्यापैकीच एक म्हणजे जसवंतसिंह राठोड. यांनीच हे श्रीराममंदीर स्थापन केलं. त्या मंदीराच्या व्यवस्थापनासाठी दिलेली जमीनही त्यांचीच. याचा उल्लेख डॅा. दुलारी कुरेशी यांच्या ‘ओरंगाबाद नामा’ मध्ये आहे. 


औरंगजेब सहिष्णु होता असं जरी त्यांनी लिहिलं असलं तरी त्यापुढच्याच वाक्यात आपल्या निष्ठावंताबाबतच त्याची धर्मनिरपेक्षता होती हे ही स्पष्ट होतं. तर हे मंदीर व त्या जागेचा औरंगजेबाशी थेट संबंध नाही. जसवंतसिंहाच्या खाजगी मालमत्तेतील ही सर्व जागा होती. पुढे मुघलशाही संपली, निजामशाही आली तरी या हिंदू सरदारांच्या वारसांनी व इथल्या हिंदू समाजाने ही मंदीरं, या जागा तश्याच राखल्या. अशी मुघलांकडं चाकरी करणाऱ्या मातब्बर हिंदू सरदारांनी बांधलेली अनेक मंदीरं शहरात आहेत. त्यामुळे त्याचं श्रेय औरंगजेबाला देणं हे इतिहासाचं विकृतीकरण म्हंटले पाहिजे. (आणि ‘औरंगजेबाने जमीन दिली’ तर त्याने काय ती जमीन उत्तरेतून आणलेली होती काय? त्याच्यापूर्वी इथे असलेल्यांचीच ती जमीन होती) 

या मंदीराच्या विश्वस्त मंडळाने अनेक सामाजिक कामं केलेली आहेत व करत आहेत. खडकी- फतेहाबाद (मलिक अंबरच्या वेडसर मुलाने ठेवलेलं नांव)- औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर याचा पुष्कळ इतिहास उपलब्ध आहे. Sanket Kulkarni यांच्यासारख्या इतिहास तज्ञांचा यावर प्रचंड अभ्यास आहे. त्यामुळे वायरल पोस्टमधील दावा खोटा असून इतिहासाचे विकृतीकरण आहे. 

@डॉ. प्रसन्न पाटील, संभाजीनगर

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या