राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

“गावा गावासी जागवा | भेदभाव समूळ मिटवा |
उजळा ग्रामोन्नतिचा दिवा | तुकड्या म्हणे ||”

'व्यक्ती निर्माणातून ग्रामविकास आणि ग्रामविकासातून राष्ट्र निर्माण' हे सूत्र भारतीय जनमानसात रुजवण्यासाठी संत तुकडोजी महाराज यांनी सर्वव्यापी सर्वस्पर्शी प्रयत्न केल्याचे आपणास त्यांच्या जीवनदर्शनातून दिसून येते.

संत तुकडोजी महाराजांनी भारतीय जन मानसिकतेची नस ओळखली होती, म्हणून त्यांनी कीर्तन, अध्यात्म, भक्ती, सेवा, कृती, सहवास, ग्रामगीता, प्रबोधन याच्या माध्यमातून भारतीय नागरिकांच्या मनाची मशागत करून त्यात सुसंस्कारित व समता पूर्ण कृतीरूप बीजारोपण केले.

महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ या दिवशी झाला.
बालपणापासूनच अध्यात्माची आणि कीर्तनाची आवड महाराजांना होती. टाळ, मृदंग, झांज, खंजीरी घेऊन गायन, भजन, अध्यात्मिक सत्कार्यात महाराज रममाण होऊन जात असत. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी 'आनंदअमृत' नावाच्या ग्रंथाची रचना केली होती....

संत तुकडोजी बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे असल्यामुळे आणि मनात भक्ती, सामर्थ्य, राष्ट्रभक्तीची जाण असल्यामुळे ग्रामविकासाची मोठी तळमळ होती. पारतंत्र्यातील देश गुलामीतून मुक्त व्हावा यासाठी त्यांनी चळवळीत देखील भाग घेतला, यामुळे त्यांना तुरुंगवास  सोसावा लागला.

गाव खेड्यामध्ये नागरिकांच्या जगण्या वागण्यात समानता यावी, व्यवहारातील अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी तुकडोजी महाराजांनी अनेक गावांमध्ये तत्कालीन दलित समाजातील लोकांना मंदिर प्रवेश मिळवून दिल्याच्या अनेक घटना त्यांच्या जीवन चरित्रामध्ये पाहायला मिळतात.....

"हिन्दव: सोदरा सर्वे |
न हिन्दू: पतितो भवेत् ||
मम दीक्षा हिन्दू रक्षा |
मम मंत्र: समानता ||"

या भूमीवरील सर्व हिंदू सहोदर (म्हणजे एकाच मातेच्या उदरातून आलेले भाऊ) आहेत. कोणताही हिंदू पतित नाही. हिंदूंचे रक्षण करणे - हीच दीक्षा आहे. समानता हा आमचा मंत्र आहे. 
असा श्लोक भारतातील सर्व संत महंत, शंकराचार्य, महामंडलेश्वर यांनी एकत्र येऊन १९६५ या वर्षी सांदिपनी आश्रम, पवई, मुंबई येथे विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेच्या निमित्ताने निर्माण केला आहे. संत तुकडोजी महाराज हे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य होते. १९६६ मध्ये प्रयाग व १९६७ मध्ये नाशिक येथे झालेल्या संमेलनांचे ते अध्यक्ष होते.
अध्यात्म आणि हिंदुत्वाच्या धाग्यात भारतीय समाज एकत्र यावा, समरस समता पूर्ण व्हावा असा संत तुकडोजींचा उद्देश होता.

चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांनी जेव्हा भारतावर
इ.स.१९६२ आणि १९६५ अशी युद्धे  लादली, त्यावेळी त्या युद्धाच्या रणभूमीवरती संत तुकडोजी महाराज स्वतः जाऊन सैनिकांसाठी शौर्याची व धैर्याची वीररसातील गाणी म्हणत असत म्हणूनच त्यांना *राष्ट्रसंत* म्हणून संबोधले जाते..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या एकूणच जीवनकार्याकडे दृष्टिक्षेप टाकला असता ठळकपणाने आपणाला त्यांच्या जीवनात समाज परिवर्तनाची काही मूलभूत मूल्ये लक्षात येतात. ती म्हणजे अध्यात्म, ईश्वरभक्ती, सेवा, राष्ट्रीयता, समता, अध्यात्मिक उन्नती, स्त्री पुरुष समानता, आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट करणे,  ग्रामविकास आदी. या मूल्यांच्या माध्यमातून त्यांनी एक राष्ट्रभक्त समाज निर्मितीचे कार्य केल्याचे दिसून येते..

अशा प्रेरणादायी राष्ट्रसंताच्या जीवन चरित्रातून आपण सुद्धा कार्यरत होण्याचा मनोमन संकल्प करूया.

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्रिवार अभिवादन*

- ऋषिकेश सकनुर

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या