रा. स्व संघ देवगिरी प्रांताचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग बीड येथे सुरू; प्रांत संघचालकांच्या हस्ते उद्घाटन

"राष्ट्रभक्तीने प्रेरित व अनुशासनबद्ध नागरिक घडविणे हे संघाचे ध्येय आहे"

२१ दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाची बीड येथे सुरुवात.

दि.7 मे 2023 (बीड) गेल्या 98 वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारित,देशभक्तीने ओतप्रोत व अनुशासनबद्ध नागरिक घडविण्याचे कार्य विविध प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून संघ करीत आहे असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे देवगिरी प्रांत  संघचालक श्री अनिलजी भालेराव यांनी प्रथम वर्ष वर्गाचे उद्घाटन करताना  केले.

 दि.7 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचा (मराठवाडा व खानदेश) "संघ शिक्षा वर्ग - प्रथम वर्ष" बीड येथे जालना रोड येथील गुरुकुल पब्लिक स्कूल येथे संपन्न होत आहे. या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक मा.अनिलजी भालेराव व प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अखिलेश जी ढाकणे व वर्गाचे सर्वाधिकारी अँड बाबुराव अनारसे  उपस्थित होते. 

याप्रसंगी श्री भालेराव म्हणाले की , हे प्रशिक्षण म्हणजे एक साधना आहे, ही साधना सर्वांनी मनापासून करावी यासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे  श्री अखिलेश ढाकणे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आहे संस्थेच्या वास्तूमध्ये हे प्रशिक्षण होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे संघ स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले व या प्रशिक्षणासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या प्रशिक्षणासाठी देवगिरी प्रांतातील (मराठवाडा व खानदेश) 15 जिल्ह्यातून 162 स्वयंसेवक आलेले आहेत. या प्रशिक्षणार्थी मध्ये महाविद्यालयीन तरुण, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार, शिक्षक व वकील इत्यादी सर्व स्तरातील कार्यकर्ते आहेत. सकाळी 4.45 ते  रात्री 10.30 असा या वर्गाचा दिनक्रम असणार आहे. या प्रशिक्षण वर्गास अनेक संघाचे अधिकारी भेट देणार आहेत यामध्ये संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य  श्री इंद्रेश कुमार जी  व अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य   श्री श्याम कुमार जी  हे पण भेट देणार आहेत, अशी माहिती वर्गाचे कार्यवाह श्री आनंद गुजर यांनी दिली.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या