भारताच्या इतिहासात डोकावताना अनेक इतिहासकारांनी हस्तलिखित पुरावे आणि भूर्जपत्रांचा अभ्यास केला आहे. भारतात फार प्राचीन काळापासून लेखन कला अवगत होती. म्हणूनच फार पूर्वीपासून काळ्या रंगाची शाई आणि बोरूची काडी यांचा लेखनासाठी वापर होत होता. मात्र आपल्या देशात एक असा ग्रंथ आहे. ज्याचं लेखन पूर्णपणे अदृश्य शाईचा वापर करून केलेलं आहे. म्हणजे जेव्हा या ग्रंथावर पाणी पडतं, तेव्हा यातील अक्षरे दिसायला लागतात, आणि पाणी वाळलं, कि ती अक्षरे पुन्हा अदृश्य होतात.
या अदृश्य शाईने लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे ‘’अग्र भागवत’’. म्हणजेच अग्रवाल समाजाचे मूळ पुरुष अग्रसेन महाराज यांचा चरित्र ग्रंथ. हजारो वर्षांपूर्वी जैमिनी ऋषींनी लिहिलेल्या जयभारत नावाच्या महाग्रंथाचा हा एक भाग आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे रहाणाऱ्या रामगोपाल अग्रवाल यांच्यामुळे या अदृश्य ग्रंथाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. रामगोपाल अग्रवाल एकदा आसामच्या दक्षिण भागात असलेल्या ब्रम्हकुंड सरोवरावर गेले होते. हे ठिकाण म्हणजे अग्रसेन महाराजांचं सासर होतं. ब्रम्हकुंडावर जाण्याआधीच त्यांना एक स्वप्न पडलं. ‘’त्यात आपल्याला ब्रम्हकुंडाजवळ एक साधू दिसेल, आणि तिथेच तुला हवं ते मिळेल’’, असा दृष्टांत झाला. त्यानंतर दुसऱ्या दिशी जेव्हा रामगोपाल अग्रवाल तिथे गेले, तेव्हा त्यांना ब्रम्हकुंडाजवळ एका वटवृक्षाखाली एक साधु बसलेला दिसला. रामगोपालजींनी त्याला नमस्कार केला. तेव्हा साधूने त्यांना आपल्याजवळचं एक गाठोडं दिलं. तो दिवस होता ९ ऑगस्ट १९९१ चा. त्या गाठोड्यात काही कोरी भूर्जपत्र होती. या कोऱ्या भुर्जपत्रांचं नेमकं काय करावं, हे त्यांना समजलं नाही. म्हणून त्यांनी आपल्या गुरूंना याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांचे गुरुजी म्हणाले, ‘’तुला जर ते भुर्जपत्र कामाचे वाटत नसतील, तर ते पाण्यात टाकून दे’’. हे ऐकून रामगोपाल अग्रवाल यांना काय करावं, ते सुचेना. मग शेवटी त्यांनी ती कोरी भूर्जपत्र आपल्या देवघरात ठेवली.
अश्यातच एकदिवस पूजा करताना त्या भुर्जपत्रांवर पाण्याचे काही थेंब पडले, आणि जिथे पाणी पडलं होतं, त्या भागात संस्कृत भाषेची अक्षरं उमटू लागली. या प्रकाराबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं, म्हणून त्यांनी एक अक्ख भूर्जपत्र पाण्यात बुडवलं, तर त्यावरची अक्षरं अगदी स्पष्टपणे दिसायला लागली. पण थोड्या वेळानंतर जेव्हा ती भूर्जपत्र वाळली, तेव्हा त्यावरची अक्षरं मिटून गेली. तेव्हा रामगोपालजींना हा सगळा प्रकार लक्षात आला.
त्यांनी त्या सगळ्या भूर्जपत्रांवरचा मजकूर लिहून काढला, आणि काही संस्कृत जाणकारांच्या मदतीने त्याचा अर्थ समजून घेतला. ती अदृश्य शाईने लिहिलेली पोथी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर खुद्द अग्रसेन महाराजांचं चरित्र, म्हणजेच ४३१ पानांचा ‘’अग्र भागवत’’ हा ग्रंथ होता.
हि बाब उघड झाल्यावर या ग्रंथाची अग्रवाल समाजात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. हा ग्रंथ या समाजासाठी अत्यंत पूजनीय होता. देश विदेशात या ग्रंथाची महती पसरली. याच काळात अग्रवाल समाजाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी कोट्यावधी रुपयांमध्ये हा ग्रंथ विकत घेण्याची तयारी दाखवली. हे बघून या समाजातील काही लोकांनी एकत्र येऊन एक ट्रस्ट स्थापन केलं, आणि या ग्रंथाला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. आजही हा ग्रंथ सुरक्षित आहे. मात्र हे अदृश्य शाईचे तंत्रज्ञान आणि त्यामागचे विज्ञान मात्र कुणालाही शोधता आलेलं नाही.
संदर्भ: भारतीय ज्ञानाचा खजिना, लेखक - प्रशांत पोळ
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या