जळगांव जिल्ह्यातील एरंडोल येथे ‘पांडववाडा’ नावाने शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणावर ऐतिहासिक वास्तू आहे. ही ऐतिहासिक वास्तू प्राचीन काळापासून हिंदू आणि जैन समाजाच्या ताब्यात होती. या इमारतीत हिंदू आणि जैन समाजाचे लोक पूजा आणि धार्मिक विधी करीत असत आणि अजूनही करतात. पण मुस्लिम समुदायाने ही जागा बळकावून वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित केली व जागेवर ताबा सांगितला आहे. या जागेत पूर्वी अस्तित्वात नसलेल्या थडग्याचीही निर्मिती करण्यात आली आहे व याच ठिकाणी मदरसाही सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पांडववाडा संघर्ष समितीकडून ही वास्तू सरकारच्या मालकीची व पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असून त्याचा ताबा सरकार कडे घ्यावा अशी मागणी केली आहे. सध्या जळगाव जिल्हा न्याय दंडाधिकारी या विषयाची सुनावणी करत आहे.
काय आहे पांडववाडा?
पांडववाडा वास्तू हे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे राज्य संरक्षित स्मारक आहे. हे स्मारक सि.स.नं. ११०० या जागेवर आहे. सदर स्मारक महाराष्ट्र राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले असुन ते सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग नाशिक यांचे कार्यालयाच्या अखत्यारित आहे.
याच ठिकाणी इतिहासात पांडव येऊन गेले असल्याची माहिती स्थानिक सांगतात. तसेच १३ व्या शतकाच्या अगोदर येथे जैन मंदिर असल्याचे पुरावे आहेत. पूर्वापार येथे जैनांची वस्ती व ५२ मंदिरे (जिनालय) होती आणि ५२ जिनालय पैकी ‘पांडववाडा’ नावाचे दिगंबर जैन मंदिर म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
या वास्तूच्या संरक्षण भिंतीवर समया, चंद्र, सूर्य कमळ फुलांची रांग, धोतराच्या फुलांचे नक्षीकाम वृक्षवेली असे दगडांचे कोरीव काम केलेले आहे. वास्तूची बांधणी हिंदू संस्कृतीची आहे.
मुस्लिम राजवटीत या मंदिरास उध्वस्त करून त्याचे मुस्लिम प्रार्थना स्थळात (मस्जिद) रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला.
वास्तविकता काय?
१८८० च्या एका करारनुसार पांडववाडा इमारतीच्या पश्चिमेला, जुम्मा मस्जिद नावाची छोटीशी मशीद होती. तिची पडझड झाल्यामुळे लाकूड वैरण ठेवण्यासाठी तिचा तत्कालीन व्यवस्थापक अमीर मंगु खतीब यास फक्त पंचवीस वर्षासाठी पांडववाड्याची इनाम म्हणून छोटीशी जागा देण्यात आली होती. अमीर मंगुच्या बायकोने १९३० मध्ये ही जागा बक्षिसपात्र म्हणून जुम्मा मशीद ट्रस्ट ला अनधिकृतपणे देऊन टाकली. तथापि, या जागेचा आणि मुस्लिम समाजाचा संबंध फक्त पंचवीस वर्षाचा होता.
या पांडववाडयातील बसवलेल्या जैन मूर्ती मुस्लिम आक्रमकांनी तोडल्या आणि तेथील जैन मंदिरांचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी ब्रिटिश सरकार सत्तेवर होते. त्यापैकी एक शिलालेख असलेली अखंड जैन मूर्ती विहिरीत आणि दुसरी मूर्ती जंगलात सापडली आहे.
नगर भूमापन मधील रेकॉर्डनुसार ‘जुम्मा मस्जिद’ अगर ‘मस्जिद’ अशा नावांची नोंद व्हावी, असा आदेश कोठेही दिलेला नसुन नकाशात ही नोंद कश्याच्या आधारे झाली याची कल्पना रेकॉर्डवरुन येत नाही व झालेल्या नोंदीबाबत अधिकृत असा वरिष्ठ अमलदाराचा आदेश अगर कागदी पुरावाही नाही. सार्वजनिक विश्वस्थांची नोंदणी पुस्तकात देखील बी-८९ जुम्मा मस्जिद ट्रस्ट कमिटी एरंडोल ईस्ट खान्देश मध्ये देखील पंचानी ट्रस्टची नोंदणी ही शेत जमिनीवर केलेली आहे. सदरील पांडववाड्याच्या कागदपत्रांवर केलेली नाही.
जळगांव जिल्हा गॅझेटीअर १९६२ पान क्र. ७५३ मध्ये पांडव वाड्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यात जुन्या हिंदू मंदिराच्या अवशेषावर मस्जिद उभारल्या आहेत. असे हेनरी कझेनच्या ‘मेडीव्हल टेम्पल्स ऑफ दी दखन’ सन १९८५ च्या पुस्तकात एरंडोल विषयी व पांडववाड्या विषयी सविस्तर माहिती नमुद करण्यात आली आहे.
यानंतर दिनांक ११/०३/१९१० मध्ये अनसिनेट मोनुमेंटस प्रिझरव्हेशन ऍक्ट १९०४ नुसार कमीशनर गारडिअन व अटी व शर्तीनुसार याचा उल्लेख सन १९१३ मध्ये ‘जैन बम्बई अहाता’ या पुस्तकात एरंडोल या शहराचे पौराणिक नांव एरणवेल, अरुणावती असे होते व येथे ५२ जिनालय नावाचे दिगंबर जैन मंदिर “पांडववाडा” या नावाने होते असे नमूद आहे.
सन १९३४ मध्ये शंकर बळवंत तिवारी यांनी ‘एरंडोल तालुक्याचे भुवर्णन’ या पुस्तकात पांडव वाड्याविषयी सविस्तर वर्णन केले आहे. ही माहिती त्यावेळेच्या दुसरीच्या पाठ्य पुस्तकात प्रकाशित केलेली आहे.
पांडववाडा संघर्ष समितीचे म्हणणे काय?
◆ पांडववाड्याच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यातला अनधिकृतपणे बसवलेला दरवाजा बंद करण्यात यावा. तसेच उत्तर पश्चिम भिंतीमध्ये असलेला अनधिकृतपणे कोरलेला दरवाजा बंद करण्यात यावा.
◆ पांडववाड्यामध्ये ट्रस्टीनीं बेकायदेशीर पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या, हातपाय धुण्याची जागा, मुतारी तसेच बांधलेले पत्री शेड, खोली बांधल्या आहेत ते अतिक्रमण पाडून पूर्वीप्रमाणे करण्यात यावे.
◆ एरंडोलमध्ये सिटी सर्व्हे योजना कार्यान्वित झाली, त्यावेळी शहर भूमापन अधिकारी पत्रक क्र. २४ तयार केले. त्या पत्रकात थडग्यांचे बांधकाम दाखवलेले नाही. आता तिथे थडगं आहे. हे काम बेकायदेशीरपणे झाले आहे. त्या थडग्यांचे अतिक्रमण केलेले बांधकाम हटवून ती जागा पूर्वीप्रमाणे करण्यात यावी.
◆ वक्फ बोर्डाकडे कोणत्याही मालकी हक्काशिवाय नोंदणी करण्यात आली आहे. स.नं. ११०० ची वक्फ बोर्डाकडे असलेली नोंदणी रद्द करून घेण्यात यावी .
◆ पांडववाडा वास्तूच्या मुख्य गेटवर पूर्वी बसवलेले "पांडववाडा" फलक पुन्हा मोठ्या आणि ठळक अक्षरात लावण्यात यावे.
मुस्लिम पक्षाचा अजब दावा
मुस्लिम पक्षाकडून विवादित जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची असून मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ असल्याचा दावा केला जात आहे. तसेच ही वास्तू ८०० वर्ष पूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. परंतु ८०० वर्षापूर्वी ही वास्तू कोणी बांधली? इथे दिगंबर जैन मुर्त्यांचा संबंध काय? वास्तूची बांधणी इस्लामिक पद्धतीची आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
वक्फ बोर्डवर कारवाईची मागणी
सबळ पुरावे, ऐतिहासिक नोंदी, सिटी सर्व्हेअरच्या नोंदीनुसार, स.नं. ११०० (पांडव वाडा) यावर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे हक्क आहे. यावर जुम्मा मस्जिद ट्रस्ट या जमिनीचे मालक असल्याचे दाखविणारी कोणतीही नोंद नाही. वक्फ बोर्ड त्यांचे मालकी हक्क सांगत आहे. ऐतिहासिक वास्तू वर कब्जा केल्या प्रकरणी तथा धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी वक्फ बोर्ड वर कठोर कारवाई करण्यात यावी असे पांडववाडा संघर्ष समितीचे म्हणणे आहे.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
राष्ट्रीय विचारांची सत्य, स्पष्ट व योग्य माहिती मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
0 टिप्पण्या