तत्कालीन सरकार्यवाह एकनाथजी रानडे यांची एक आठवण
आणीबाणी संपुष्टात आल्यावर संघकार्य जोमाने सुरू झाले. शहराशहरात कार्यकर्त्यांच्या फळ्याच्या फळ्या तयार होऊ लागल्या. जळगावही त्याला अपवाद नव्हते. शहर पातळीवर काम करणारे स्वयंसेवक रात्री जेवणे आटोपल्यावर एकमेकांना भेटत, दिवसभरातल्या घडामोडींची देवाण-घेवाण करीत आणि रेल्वे स्टेशन समोरच्या ब्रिज विलास रेस्टॉरंटमध्ये चहा पिऊन आपापल्या घरी जात. रात्री दहानंतर शहरात सर्वत्र सामसूम असे पण रेल्वे स्टेशन परिसर मात्र गजबजलेला असे. कारण रात्री रेल्वे गाड्यांनी येणारे व जाणारे प्रवासी हा परिसर जागता ठेवत. साहजिकच त्यांच्या सोयीसाठी हॉटेल चालू ठेवणे आवश्यक असे, त्यामुळे सारे जळगाव झोपले असताना हमखास चहा मिळण्याचे ठिकाण म्हणजे रेल्वे स्टेशन असे.
कधी कधी निरोप येई. रात्रीच्या अमुक-अमुक गाडीने संघाचे हे हे पदाधिकारी जात आहेत, त्यांचा बोगी नंबर असा आहे तर तुम्ही दोन किंवा तीन जणांचा जेवणाचा डबा घेऊन गाडीवर जा, त्यांना भेटा व त्यांना डबा द्या. कधीकधी नुसतेच जाऊन भेटण्या विषयी निरोप असे. आम्ही वयाने तरुण होतो त्यामुळे ही कामगिरी आपोआपच आमच्या गळ्यात येऊन पडत असे. अर्थात आम्ही कसले आढेवेढे न घेता ती छोटीशी कामगिरी चोख बजावत असु.
आम्हा साऱ्यांकडेच संघाच्या काही ना काही जबाबदाऱ्या होत्या. श्री. दिपक राव घाणेकरांकडे त्यावेळी सह शहर कार्यवाह अशी जबाबदारी होती. जेवण झाल्यावर फिरणाऱ्या आमच्या ग्रुपमध्ये तेही असत. मला आठवते त्याप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब झारे, अजित मेंडकी, आबा दप्तरी, मुकुंद जोगदेव, मी स्वतः व अजून एक-दोन जण ह्या ग्रूप मध्ये होते. एकदा वरतून निरोप आला की त्यावेळचे अखिल भारतीय सरकार्यवाह माननीय एकनाथजी रानडे एका गाडीने मुंबईहून नागपूरला जात आहेत. ती गाडी जळगावला रात्री दहा वाजता येईल. तर त्यांना डब्बा पोहोचवण्याची व्यवस्था करा. त्यांच्यासोबत अजून दोन कार्यकर्ते आहेत. जेवण मसालेदार व तळकट नसावे. बोगी नंबरही कळवण्यात आला. झाले !!
आम्ही त्याबरहुकुम सारी व्यवस्था केली व गाडी येण्याच्या पंधरा मिनिटे अगोदर आम्ही स्टेशनवर जाऊन जेथे बोगी येईल तेथे उभे राहिलो. गाडीचा थांबा खरेतर दोन मिनिटाचा होता, पण त्या दिवशी गाडी पाच दहा मिनिटे अगोदर आली. गाडीने स्टेशनमध्ये प्रवेश केला आणि हळूहळू येऊन थांबली. फर्स्ट क्लास आमच्या समोर येऊन थांबला आणि आम्ही चार-पाच जण पुढे सरसावलो. डब्याचा दरवाजा उघडला आणि मा. एकनाथजी दारात येऊन उभे राहिले. ज्या माणसाने मोठा संघर्ष करून कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक उभे केले त्या ऋषितुल्य व्यक्तीच्या दर्शनाने आमची मान आदराने आपोआप झुकली. त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्याच्या स्वाधीन आम्ही जेवणाचा डबा वगैरे केला.
माननीय एकनाथजींनी आमचा परिचय करून घेतला. प्रत्येकाने आपले नाव व संघाची त्याच्याकडे असलेले जबाबदारी सांगितली. जेव्हा दिपकराव घाणेकरांची पाळी आली तेव्हा त्यांनी दीपक गजानन घाणेकर, "सहशहरकार्यवाह" असे सांगितले पण माननीय एकनाथजींना ते सहसरकार्यवाह असे ऐकू आले. तेव्हा ते एकदम गमतीने म्हणाले, "अरे, मला न सांगता, न विचारता, मा. बाळासाहेबांनी ( त्यावेळी पु. बाळासाहेब देवरस सरसंघचालक होते) माझ्या सहाय्यकाची नेमणूक केव्हा केली ? उद्या त्यांना विचारले पाहिजे. हे सारे बोलताना ते मिश्किलपणे हसत होते. त्यांनी केलेली थट्टा आणि घेतलेली आमची फिरकी आम्हाला समजली पण तरीही आम्ही थोडे हिरमुसलोच. दिपकराव थोडे खजील झाले. पण नंतर हसू आवरले गेले नाही.
स्टेशनवरच्या गोंगाटामुळे माननीय एकनाथरावांना शहर ऐवजी सर असे ऐकू आले होते आणि हे सारे समजूनही या स्वयंसेवकांची थट्टा करावी, फिरकी घ्यावी म्हणून माननीय एकनाथ जी हसुन हे बोलले होते. तो त्यांचा मिस्कीलपणा होता. गाडी निघून गेली, आम्ही परतलो. त्यानंतर बरेच दिवस आम्ही सारेजण या प्रसंगाबद्दल हसत होतो, एकमेकांना टाळ्या देत होतो.
©️ हेमंत बेटावदकर
मो. 94 0 35 70 268
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
--------------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या