'ताजमहाल की तेजोमहाल' याचा देखावा..
संघाच्या स्वयंसेवकांनी संघकार्या व्यतिरिक्त समाजात घडणाऱ्या घडामोडी, चळवळींकडे ही लक्ष ठेवून असले पाहिजे आणि सार्वजनिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला पाहिजे अशी अपेक्षा असे. त्याला अनुसरून विक्रमादित्य शाखेच्या आम्ही स्वयंसेवकांनी" विक्रमादित्य गणेश मंडळ" स्थापन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले होते व त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षीही तो देखाव्या सहित साजरा करावा असे निश्चित झाले होते. मागच्या वर्षी आम्ही" महात्मा गांधींची शाखेस भेट" या विषयावर देखावा केला होता आणि त्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.
या कौतुकाने हुरूप येऊन आम्ही यावर्षी आणखी चांगला प्रसंग शोधून त्याचा देखावा उभा करायचा असा निश्चय केला होता आणि त्यानुसार विषयाची शोधा शोध सुरू होती. आमचे काही वरिष्ठ देखील काही विषय सुचवत होते पण आम्हाला त्यातील एकही पसंत येत नव्हता. विषय असा असला पाहिजे की त्यातून समाजाला आपल्या पुरातन संस्कृतीची ओळख व्हावी, परकीय आक्रमकांनी, आमच्या पूर्वजांनी कष्टाने उभारलेल्या स्मारकांची, देवालयांची, वास्तूंची जी नासधूस केली, तोडफोड केली, आमची समृद्ध संस्कृती नष्ट करण्याचा ठरवून प्रयत्न करण्यात आला त्याविषयी माहिती व्हावी.
याविषयी चर्चा चालू असताना मला सहजच पु .ना. ओक यांनी लिहिलेल्या "ताजमहाल की तेजोमहाल"? या पुस्तकाची आठवण झाली. यात पु.ना. ओकांनी संशोधकांचे दाखले देऊन, तज्ञांची मते नोंदवून, हिंदू देवालयांच्या रचनांचा अभ्यास करून असे ठाम प्रतिपादन केले आहे की ताज महाल हा मकबरा नसून ते प्रत्यक्षात शिवालय आहे .झाले!! आम्हाला देखाव्यासाठी विषय मिळाला.
चलत् चित्राचा देखावा तयार करून देणाऱ्या कलाकाराला संपूर्ण विषय समजावून सांगण्यात आला. त्यानुसार असा देखावा उभा करायचा होता की, जगप्रसिद्ध ताज महाल दिसतो आहे, त्याच्यावर हिरवा फोकस पडला आहे, क्षणार्धात त्या ताजमहालची प्रतिकृती वर उचलली जाते आणि शिवलिंगाचे दर्शन होते, त्याबरोबर त्या शिवलिंगावर भगवा फोकस पडतो. हे दृश्य बराच काळ राहते. मग पुन्हा ताजमहाल खाली येतो आणि त्यात शिवलिंग नाहीसे होते. कलाकाराने अतिशय प्रयत्न करून हा देखावा उभारून दिला. या डेकोरेशन च्या वरती "ताज महाल की तेजोमहालय?" असा ठसठशीत बोर्ड रंगवण्यात आला. आरास बघायला येणार्या दर्शकांसाठी या विषयाचा इतिहास, संशोधन, दाखले पु. ना. ओकांच्या पुस्तकाचा उद्देश आणि परकीय आक्रमकांचा हेतू याविषयी मोठा फलक लावण्यात आला होता. प्रेक्षक व दर्शक आधी तो फलक वाचत आणि मग आरास पहात
पूर्वीच्या काळी असे काही घडले असेल याची कल्पना नव्हती पण तुमच्यामुळे खरे काय ते आज कळले असे जो तो भेटून सांगत होता. मला आठवते, एका स्थानिक वृत्तपत्राने या देखाव्याची दखल घेऊन फोटोसहीत वृत्त दिले होते. वृत्तपत्रात बातमी येताच प्रेक्षकांची गर्दी वाढली आणि हा विषय सर्वत्र पसरला. मला आठवते त्याप्रमाणे जळगावच्या व.वा. वाचनालयात वाचकांनी या पुस्तकाची जोरदार मागणी केली. आम्हालाही हे पुस्तक कुठे मिळू शकेल अशी विचारणा होत होती. समाजमन ढवळून काढण्यात आम्ही निश्चितच यशस्वी झालो होतो आणि आम्हालाही तेच अपेक्षित होते. आमचा उद्देश सफल झाला होता.
©️ हेमंत बेटावदकर
मो. 94 0 35 70 268
-------------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या