शाखेचा गणेशोत्सव
आता वयाची साठी ओलांडली असली तरी बालवयात शाखेच्या संदर्भातल्या बहुतेक सार्या गोष्टी आजही जशाच्या तशा आठवतात. त्या काळात घडून गेलेले बरेच प्रसंग जसे काही तसेच्या तसेच आत्ता घडून गेले आहेत इतके स्वच्छ आठवतात. अर्थात या गोष्टी वा ते प्रसंग अविस्मरणीय असेच होते. मी कितीही विसरू म्हटले तरी ते मी विसरू शकणार नाही. दैनंदिन शाखेत स्वयंसेवकांचे सोबत व्यतीत केलेला काळ हा खरोखरीच आमच्यासाठी आनंदाचा ठेवा होता. त्या काळातले शाखेचे ते दिवस मी माझ्या आठवणींच्या कुपीत अगदी जपून ठेवले आहेत. आजही काही कारणाने मन सैरभैर झाले, खिन्नता आली, उदास, उदास वाटू लागले की मी डोळे बंद करतो, भूतकाळात म्हणजे शाखेतल्या दिवसात जातो, आठवणींची ती बंद कुपी उघडतो आणि तो सुवास खोल खोल ओढून घेतो.
खरेतर कुपी उघडताच आठवणींच्या सुगंधाने मन कसे प्रसन्न होऊन जाते पण त्या आठवणी हृदयात प्रवेश करताच मी सैरभैरपणा, खिन्नता, उदासी हे सारे विसरतो आणि टवटवीत होतो. ते सारे प्रसंग माझ्याभोवती पिंगा घालू लागतात आणि मग मी माझा राहत नाही .
गणेशोत्सवात गल्लीगल्लीत गणेश मंडळे गणपती बसवत आणि त्याच्यासमोर आरास म्हणजे देखावे सादर करत. देखावा म्हणजे रामायण, महाभारत किंवा पौराणिक कथा किंवा ऐतिहासिक कथा यातील प्रसंग निवडायचा आणि हार्डबोर्डची पात्रे तयार करून रोटरच्या साह्याने चलतचित्रे हलवायची. त्यामुळे देखावा जिवंत असल्याचा भास होई व दर्शक देखावा पाहण्यासाठी गर्दी करत. बहुतेक साऱ्या गणेश मंडळाचा या हलणाऱ्या चित्रांवरच भर असे व आपण सांगू त्या प्रसंगाचे हलणारे डेकोरेशन करून देणारे कारागीर वा कलाकार उपलब्ध होते. ज्यांनी तो काळ अनुभवला आहे त्यांनी गणेशोत्सवातली डेकोरेशनस डोळ्यासमोर आणावी म्हणजे मला काय म्हणावयाचे आहे याची त्यांना कल्पना येईल.
एका वर्षी विक्रमादित्य शाखेच्या आम्ही काही उत्साही स्वयंसेवकांनी ठरविले की आपणही गणेशोत्सव साजरा करायचा, डेकोरेशन करावयाचे, देखावा असा करायचा की त्यात शाखा दिसली पाहिजे आणि समाजात असलेले संघाबद्दल चे गैरसमजही दूर झाले पाहिजेत. थोरामोठ्यांच्या सल्ल्यानुसार वर्धा येथील संघ शिबिरात महात्मा गांधी यांनी भेट दिली होती. त्याचा देखावा करायचा असे ठरले. त्या काळात हा विषय उलट-सुलट चर्चेला वाव देणारा होता, पण संघासाठी आवश्यकही होता. आणि विशेष म्हणजे त्यात असत्य असे काहीही नव्हते.
देखाव्यातील पात्राकडून फडकणारा भगवा ध्वज, रांगेत उभे स्वयंसेवक आणि महात्मा गांधी ध्वजाला प्रणाम करीत आहेत हे दृश्य चलत स्थितीत तयार करण्यात आले आणि विक्रमादित्य गणेश मंडळाच्या नावाखाली स्वर्गीय बाळासाहेब झारे यांच्या घराच्या पडवीत गणपतीची स्थापना करून हा देखावा मांडण्यात आला. दहा दिवस देखावा बघण्यासाठी प्रचंड गर्दी होती. उलट सुलट चर्चा झडत होत्या, वादविवादही होत होते , पण उद्देश सफल झाला होता.
आज मागे वळून पाहताना वाटते की तसा स्फोटक विषय मांडून आम्ही नुसती खळबळच माजवली नव्हती तर एक सत्य घटनाही निर्भीडपणे लोकांसमोर मांडली होती. संघातल्या सर्व स्तरातल्या कार्यकर्त्यांकडून याबद्दल आमच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला नसता तरच नवल होते आणि तसेच घडले. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते यांनी आरास स्थळाला भेट देऊन आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि आमचा हुरूप वाढला. या अशा कौतुकातच पुढील वर्षाच्या गणेशोत्सवाची बीजे रुजली होती.
©️ हेमंत बेटावदकर
मो. 94 0 35 70 268
------------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या