वैशिष्ट्य संघ कार्य करतानाचे..
दैनंदिन शाखेत येणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे एकमेकांशी अगदी जीवाभावाचे संबंध असत. जर घरात संघाचे वातावरण असेल तर हे संबंध घरापर्यंत जात. अशावेळी एकमेकांचा थेट स्वयंपाक घरापर्यंत वावर असे. मला वाटते की संघ स्वयंसेवकांचे एक दुसऱ्याशी वागणे हे निश्चितच चारचौघांपेक्षा वेगळे असते, कारण अशा संबंधात" संघाचा स्वयंसेवक" हे जास्तीचे नाते जुळलेले असते आणि ते अतूट असते. रोज एक तास संघ स्थानावर सोबत राहायचे तर वाद-विवाद, उणीदुणी, भांडणे, इर्षा, हेवा या गोष्टी घडणे अपरिहार्य असे. पण एवढे घडूनही संबंध तुटतिल एवढे ताणले जात नसत. सारे वाद, भांडणं शाखेतल्या शाखेतच मिटत. स्वयंसेवकांचे एकमेकांशी बोलणे आणि स्वयंसेवकांचे इतरांशी बोलणे यातला फरक चटकन ओळखता येई.
सहज म्हणून एक गंमत सांगतो. तेव्हा माझे नुकतेच लग्न झाले होते. आमच्या घरात येईपर्यंत बायकोला संघ म्हणजे काय हे माहीत नव्हते. इथे आल्यावर तिला हळूहळू संघाच्या वातावरणाची ओळख होऊ लागली. नवीन लग्न झालेले असल्यामुळे आम्ही रोज संध्याकाळी फिरायला जात असू. रस्त्यात अनेक मित्र, स्नेही भेटत. त्यातल्या काहींचा परिचय, ओळख मी बायकोला करून देई, पण काहींचा परिचय करून देणे राहुन जाई. असा एखादा मित्र माझ्याशी बोलून पुढे गेला की बायको बरोबर ओळखत असे की बोलून गेला तो स्वयंसेवक होता. मला आश्चर्य वाटे की हिने हे कसे ओळखले? त्यावर ती म्हणे की तुम्हा स्वयंसेवकांचे एकमेकांशी बोलणे, वागणे इतरांपेक्षा खूप वेगळे असते. मला ते आता पटकन ओळखता येते, कारण ते चारचौघांसारखे नसते तर त्यात आपुलकी असते, वेगळेपण असते, जे इतरांशी बोलताना, वागताना जाणवत नाही.
दैनंदिन शाखेत बरेच नवीन स्वयंसेवक येत. अशा नवीन आलेल्या स्वयंसेवकांनी भिऊ नये, त्यांना इतर स्वयंसेवकांविषयी मित्रभाव उत्पन्न व्हावा, परकेपणा वाटू नये म्हणून आम्ही एखाद्या संध्याकाळी आठ-दहा जण या स्वयंसेवकाच्या घरी शाखा सुटल्यावर जात होतो. उद्देश हा असे की यानिमित्ताने स्वयंसेवकांचे घर पाहता येईल, त्याच्या आई-वडिलांशी परिचय होईल, आमच्या भेट देण्याने त्याच्या घरच्यांना संघ म्हणजे काय हे समजेल, आपला मुलगा योग्य ठिकाणी आपला वेळ व्यतीत करतो आहे याची त्यांना खात्री पटेल आणि अजून एक घर संघ कामाशी जोडले जाईल.
अशा पद्धतीने आम्ही बऱ्याच घरांशी जोडले गेलो होतो आणि ती घरे ही संघ कार्याशी जोडली गेली होती. याचा दूरगामी परिणाम असा झाला की आमच्या कार्यक्षेत्रात घराघरात, हर घरी किमान एक तरी स्वयंसेवक होता तर काही घरेच्या घरे संघाची म्हणून ओळखली जात. अगदी घरातल्या माता-भगिनी देखील संघ कार्याशी अशा जोडल्या गेल्या की पुढे जाऊन प्रतिकूल परिस्थिती येताच या घराघरातुन संघ कार्याला मोलाची साथ मिळाली आणि संघ कार्याची तेजस्वी पताका डौलाने फडकत राहिली.
©️ हेमंत बेटावदकर.
मो. 94 0 35 70 268
--------------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या