विक्रमादित्य सायं शाखा...
माझा बालक मंदिरात प्रवेश आणि शाखेत जाणे बहुधा बरोबरच सुरू झाले. शिशु स्वयंसेवकापासून सुरू झालेला हा प्रवास नोकरीला लागल्यावर थोडा खंडित झाला आणि लग्न झाल्यावर तो फक्त उत्सव आणि कार्यक्रम तेवढाच सीमित झाला. पण तोपर्यंत दैनंदिन शाखेच्या माध्यमातून जे काही मिळवता आले तेसुद्धा आयुष्य सुंदर होण्यासाठी मोलाचे ठरले. फार तुरळक अपवाद वगळता रोजची दैनंदिन शाखा कधी चुकली नाही. कधी एकदा संध्याकाळचे सहा वाजतात आणि संघशाखेत जातो असे होई. काही कारणाने शाखेत जाणे जमले नाही तर चुकल्यासारखे वाटत असे. समजा शाखेच्या वेळात दुसरे महत्त्वाचे काम असले तर शाखेत जायचे, प्रणाम करून कार्यवाह, मुख्यशिक्षक यांची परवानगी घेऊन त्यांना प्रणाम मग ध्वजाला प्रणाम करून आपल्या कामासाठी संघस्थान सोडायचे एवढे तरी केल्याच जायचे. समजा हेही जमत नसेल तर शाखा सुटताना किमान प्रार्थना तरी झालीच पाहिजे असा स्वतःचा आग्रह असे. याचे दुसरे कारण असे होते की स्वयंसेवकांच्या भेटी व शाखा चुकू नये.
आमच्या घराजवळच नगरपालिकेची शाळा क्रमांक 1 एक व दोन या होत्या. त्यांच्या मोकळ्या मैदानात विक्रमादित्य सायम शाखा भरत असे. या जागेवर सकाळी सहा वाजता प्रौढांसाठी गुरुगोविंद प्रभात शाखा भरत असे. या शाखेत दैनंदिन जाणारे स्वयंसेवक जर काही कारणाने प्रभात शाखेत जाऊ शकले नाहीत तर ते संध्याकाळी सवड काढून आमच्या सायम् शाखेत येत. सायम् शाखेत त्यांना फक्त उभे राहण्या शिवाय काही काम नसे पण दैनंदिन शाखा चुकू नये म्हणून ते न चुकता सायम् शाखेत येत.
पावसाळ्यात पूर्वी चार दिवसांच्या पावसाच्या झडी लागत. अहोरात्र पाऊस कोसळत असे. पण अशाही परिस्थितीत प्रभात शाखेचे काही स्वयंसेवक शाळेच्या ओट्यावर शाखा लावत. कधीकधी तर एकच स्वयंसेवक असे पण शाखा ही लागलीच पाहिजे ही भावना असे. सायम् शाखेत बहुतेक शिशु आणि बाल स्वयंसेवक येत. त्यांना पावसाची बिलकुल परवा नसे. ध्वजाची छोटी पिशवी, पोल, स्टॅन्ड आमच्या घरात ठेवलेला असे. सकाळी सहाला पाच दहा मिनिटे बाकी असताना घराच्या बंद दरवाजावर दंडाने ठक ठक केले जाई. नाहीतर अण्णा! अण्णा!! असा वडिलांच्या नावाने पुकारा होई. गाढ झोपेत असलेले आम्ही डोळे चोळत उठत असू आणि त्या झोपाळू डोळ्यांनीच बाहेर शाखेच्या गणवेशात उभे स्वर्गीय दादा अभ्यंकर यांना किंवा मग स्वर्गीय विनायकराव दंडवते यांना पोल, स्टॅन्ड, पिशवी देत असू. वर्षानुवर्षे यात खंड नव्हता.
सायम् शाखा संध्याकाळी सात वाजता सुटे. शाखा सुटल्यावर आम्ही काही स्वयंसेवक रस्ता ओलांडल्यावर समोरच रहात असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब झारे यांच्या घरी पाणी पिण्यासाठी जात होतो. बरीच वर्षे ते आमचे मुख्य शिक्षक होते. त्यांच्या घरी जाऊन पाणी ढोसणे हा आमचा कार्यक्रम असे. खरेतर साऱ्यांचीच घरे शाखेच्या जवळपास होती, पण शाखेतला एक तासाचा सहवास अजून वाढावा, तो संपूच नये असे साऱ्यांनाच मनोमन वाटे . म्हणून सारे स्वर्गीय बाळासाहेबांना त्रास देत. काही काळानंतर हा मान माझ्या घराला मिळाला.
या घरी पाणी पिण्यासाठी स्वयंसेवकांनी जाण्याच्या कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की वेळोवेळी शाखेत भेट देणाऱ्या अनेक महान व्यक्तींचे पाय आमच्या घराला लागले. माननीय तात्या इनामदार, लक्ष्मणराव इनामदार, तात्याराव बापट, सुरेशराव केतकर, नानाराव ढोबळे, मुकुंदराव पणशीकर, अण्णासाहेब पूर्णपात्रे, दुर्गानंद नाडकरणी, शिवराय तेलंग, केशवराव दिक्षीत, दामुअण्णा दाते, संभाजीराव भिडे अशा ऋषितुल्य प्रचारकांचे पाय आमच्या घराला लागले आणि आम्हीच काय पण आमची घरेदेखील पावन झाली.
©️ हेमंत बेटावदकर, जळगाव
मो. 9403570268.
-विश्व संवाद केंद्र, देवगिरी
-------------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या