स्मृतींची चाळता पाने (भाग ८)

दिवस पोलीस कोठडीचे

आणीबाणीच्या विरोधात तुकड्या तुकड्यांनी ठराविक दिवसांच्या अंतराने सत्याग्रह करायचा होता. 15 डिसेंबर 1975 रोजी भर दुपारी बारा वाजता मी आणि माझे तीन सहकारी यांनी मु.जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात सत्याग्रह करायचा होता. विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जावे म्हणून महाविद्यालयाची निवड केली होती. मी त्याच महाविद्यालयात एफ.वाय बी.कॉम ला शिकत होतो. हा योगायोग होता. सत्याग्रह करणारी आमची बहुधा पाचवी बॅच असावी, त्याआधीच्या चार बॅचेसनी शहरातल्या निरनिराळ्या गजबजलेल्या ठिकाणी सत्याग्रह केला होता. ते सारे जिल्हा कारागृहात डांबले गेले होते. 

अटक झाल्यानंतर लगेच कारागृहात रवानगी होत नसे, तर पोलीस चौकशी करायची आहे तेव्हा यांना पाच सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असे न्यायालयाला सांगून सत्याग्रहींना पोलीस कोठडीत ठेवले जाई. ते 4/5 दिवस घालवल्यावर न्यायालयीन कोठडी म्हणजेच कारागृह मंजूर करी.  मग कारागृहात रवानगी होई. 

महाविद्यालयाच्या आवारात, वर्गांच्या समोरून फलक फडकावित, पत्रके वाटत, घोषणा देत आम्ही जवळजवळ दोन तास फिरत होतो. शेवटी कोणीतरी पोलीस स्टेशनला कळवले असावे तसे मोठी व्हॅन भरून पोलिस आले आणि त्यांनी भराभर बाहेर उड्या टाकल्या. आम्ही पळून तर जाणारच नव्हतो, पण का कोण जाणे आमच्यातला एकजण पोलीस गाडी आणि पोलीस पाहताच धूम ठोकून पळत सुटला. पोलिस मागे पळाले पण तो हाती लागला नाही. परंतु, नंतर त्याला पकडण्यात आले. 

आम्हाला अटक करून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि चार्जशिट तयार करून रात्री तहसीलदार कचेरीतल्या पोलीस कोठडीत आमची रवानगी करण्यात आली. आम्हाला कोठे ठेवण्यात आले आहे याचा तोपर्यंत कोणालाही पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी बाहेर आली. आम्हाला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

"सब घोडे बारा टक्के" या न्यायाने इतर कैदीसोबत आम्ही या छोट्या दहा बाय दहाच्या कोठडीत डांबले गेलो होतो. पाकीटमार, भूरटे चोर, हल्लेखोर एवढेच काय बँकेत अपहार केलेला एक जण देखील तिथे होता. गुन्हेगार ठासून भरलेले असल्यामुळे साधी पाय लांब करायला ही जागा नव्हती त्यामुळे झोपेचा प्रश्नच नव्हता. शौचाला मागच्या बाजूस जावे लागे. सोबत पोलिस येई व बाहेर थांबे. 

कैद्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट कुणी अग्रवाल नामक इसमाकडे होते. त्याचा कालू नावाचा माणूस डबे घेऊन येई. खरे तर हे जेवण चवीला अतिशय चांगले होते शिवाय भरपूर असे. पण घरुन पाठवलेले डबे खाऊ देतात त्यामुळे कालूने आणलेले डबे आम्ही इतर कैद्यांना  देत असू. एकदा काही कारणाने कालूचा डबा खाण्याचा योग आला तेव्हा त्याची चव कळाली.  पण घरचा डबा असल्यावर कालुचा डबा खाण्याचा प्रश्नच नव्हता. कालूचे डब्याचे महत्व तेव्हा कळले जेव्हा कारागृहाच्या अर्ध्याकच्च्या 3 चपात्या आणि पांचट बेचव बावन पत्ते भाजी खाण्याची वेळ आली.

पोलीस कोठडीत या कालु च्या डब्याने एक चांगली शिकवण दिली, की जे मिळते आहे त्यात समाधान मानावे. उगाच चांगले मिळते आहे म्हणून बऱ्याला लाथाडू नये, न जाणो पुढे जाऊन तेही मिळणार नाही. मग अशावेळी पश्चात्तापाशिवाय पदरी दुसरे काय येणार ? आमच्यावरही हीच वेळ आली होती.

 ©️ हेमंत बेटावदकर 
   मो. 94 0 3570268

---------------------------------------------
Like & Follow us..

Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉  YouTube

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या