अनाकलनिय विश्व
कारागृहाचे जग हे एक एक वेगळेच विश्व असते, ज्यांना जन्मठेप किंवा दीर्घ मुदतीची शिक्षा झालेली असते. त्यांची नेमणूक वार्डन म्हणून केली जाते. वार्डन म्हणजे कैद्यांमधूनच कैद्यांवर देखरेखीसाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले जेलरचे हस्तक. त्यांच्यामार्फत तुरुंगात सुरू असलेल्या बऱ्या-वाईट साऱ्या गोष्टींची इत्यंभूत खबर जेलर पर्यंत पोहोचते. त्यांच्या या खबरगिरीमुळे बरेचदा या वार्डन लोकांना मारहाण होते, खूनही पडतात.
कारागृहात कैद्यांच्या मार्फत चालणाऱ्या धंद्यांविषयी तर सांगावे तितके थोडेच. ज्या गोष्टी तुरुंगात मिळणे दुरापास्त, त्या त्या गोष्टी अवैधरीतीने आणि गैरमार्गाने कैद्यापर्यंत सहज पोहोचतात. तंबाखू, अफु, गांजा, चरस, मद्य, छानछोकीची साधने म्हणजे पत्ते, गंजिफा एवढेच काय ट्रांजिस्टर देखील त्यांच्या पर्यंत पोहोचविला जातो. त्यांची मर्जी संपादन करून किंवा त्यांना दहशत दाखवून या साऱ्या गोष्टी पार पडतात.
मी ज्या काळात कारागृहात होतो, त्या काळात असे बरेच गुन्हेगार तेथे होते की बाहेरच्या जगात त्यांनी असा काही गुन्हा केला आहे यावर कोणाचाही विश्वास बसला नसता. बेलबॉटम, गुरू शर्ट, टी-शर्ट ही त्या वेळची फॅशन होती. आम्हाला जरी कैद्यांचे कपडे दिले असले तरी घरचे कपडे घालण्याची परवानगी होती. आम्ही दिवसभर फॅशनेबल कपडे घालून वावरत असू. पाचोरा येथील एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या भावाचाच खून केला होता, तो आमच्या वेळेसच शिक्षा भोगत होता. सुशिक्षित असल्याने त्याचा दिवसभर आमच्यातच वावर असे. संध्याकाळी मात्र त्याला कट्टर गुन्हेगारांच्या कोठडीत जावे लागे. स्वतःच्या हाताने त्याने आपले आयुष्य उध्वस्त करून टाकले होते. क्रोधामुळे माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचे तो एक उत्तम उदाहरण होता.
एका किरकोळ शरीरयष्टीच्या खेडूत इसमाने शेतीच्या बांधाच्या वादापायी सख्या काका व पुतण्याचा कुऱ्हाडीने खून केला होता. तरीही पश्चातापाचा त्याच्या चेहऱ्यावर लवलेशही दिसत नसे. असे एक ना दोन अनेक कैदी आम्हाला भेटत. प्रत्येकाची आत येण्याची कहाणी निराळी. पण आमच्यासाठी मोठी शिकवण असे. आपण ज्या पांढरपेशा समाजात वावरतो आणि ज्याचा आपण एक भाग आहोत त्याचे कायदेकानून, नियम आणि गुन्हेगारी विश्वाशी संबंधित समाजाचे नीतिनियम यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे हे येथे आल्यानंतर आणि त्यांच्या कहाण्या किस्से ऐकल्यावर ठळकपणे जाणवले.
कोठडीतल्या शौचालयाबद्दल तर काय सांगावे? प्रत्येक शौचालयाचा दरवाजा खालपासून अर्धाच असे. कैदी शौचास बसला आहे की पळून जाण्यासाठी प्रयत्न करतोय यावर लक्ष राहण्यासाठी ही सोय. तसेच कैदी आत्महत्येसाठी काही प्रयत्न तर करत नाही ना हे वॉर्डन वा पोलिसांना पाहता यावे यासाठी ही सोय होती. पण अशा अर्धवट उघड्या दरवाजामुळे आत गेलेल्यांची मोठी कुचंबणा होई. पण दुसरा पर्यायच नाही म्हटल्यावर हळूहळू त्याचीही सवय करून घ्यावी लागली.
आंघोळीसाठी आम्ही जेलच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर जात असू. बादली लावून आंघोळ करण्यापेक्षा आम्ही टाकीवर चढून बादल्यांवर बादल्या पाणी अंगावर ओतत असू. त्यासाठी एक जण टाकीवर चढे आणि खाली उभ्या मित्रांच्या अंगावर बादल्या भरून भरून ओते. दहा-पंधरा बदल्या अंगावर घेतल्या खेरीज समाधान होत नसे. या शाही स्नानासाठी दुपारची शांतता, निर्मनुष्य वेळ योग्य असे. प्रतिकूल परिस्थितीत सुख शोधण्याचा तो एक प्रयत्न होता असे आजही विचार करताना वाटते.
©️ हेमंत बेटावदकर
मो. 9403570268
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
-----------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या