स्मृतींची चाळता पाने (भाग ६)


राजापेक्षा राजनिष्ठ

संपूर्ण देश तुरुंग वाटावा अशा पद्धतीने आणीबाणी सुरू झाल्यावर कारभार सुरू होता. बादरायण संबंध जोडून स्वयंसेवकांना उचलून स्थानबद्ध केले जात होते, यातून सुटकेची किंचितही शक्यता कोणालाच वाटत नव्हती. सारे भविष्य अंध:कारमय होतेे. अशा स्थितीतही आणि हे सारे माहित असतानाही संघ बंदीला विरोध आणि आणीबाणीचा निषेध म्हणून स्वयंसेवक निर्भीडपणे सत्याग्रह करीत होते आणि स्वतः कारागृहात जात होते. साऱ्या हिंदुस्थानात हेच घडत होते. फक्त सेन्सॉरशिप मुळे वर्तमानपत्र या बातम्या देत नव्हती.
जळगावच्या ज्या संघ कार्यकर्त्यांना मिसा कायद्याखाली स्थानबद्ध केले होते, ते एकतर विसापूर (अहमदनगर) वा नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात होते, इतर सत्याग्रहींना जिल्हा कारागृहात डांबण्यात आले होते. यातील बहुतेक सारे सत्याग्रही एकमेकांच्या परिचयाचे होते. कारण त्याआधी संघ बैठकी, प्राथमिक वर्ग, हिवाळी शिबिरे, जिल्हा बैठकी यानिमित्ताने ते एकत्र येतच असत. जे ओळखीचे नव्हते ते कारागृहाच्या चार भिंतीआड स्नेही झाले आणि सुटका झाल्यानंतरही या मैत्रीत खंड पडला नाही.

आम्ही राजकीय कैदी असलो तरी सर्वसामान्य कैद्यांचे सारे नियम आम्हालाही लागू होते. दर गुरुवारी संध्याकाळी चार ते पाच या वेळात नातेवाईकांना कैद्याला भेटता येई, अर्थात मध्ये जाड लोखंडी जाळी असे, छोट्याशा खिडकीतून संवाद करता येई. एकदा माझी आई आणि लहान भाऊ मला भेटायला आले. आईला मी पुन्हा येशील तेव्हा बाटलीत गोडेतेल घेऊन येण्यास सांगितले. कारण जेल मधील खाणे अतिशय बेचव होते. तेव्हा, पोळ्यांना तेल मीठ लावून खाऊ म्हणून तसे सांगितले. 

पुढच्या गुरुवारी आई न विसरता तेेलाची बाटली घेऊन आली. भेट संपताच मी ती तेलाची बाटली घेऊन बऱ्याककडे निघालो तोच एका वॉर्डन ने मला अडवले आणि जेलर समोर नेऊन उभे केले. कोणी मिरजकर म्हणून जेलर होते, त्यांनी मला विचारले की या बाटलीत काय आहेे? मी सांगितले की शेंगदाण्याचे तेल आहे. त्यांनी विचारले की कशासाठी मागवले? मी म्हंटले खाण्यासाठी. त्यावर ते लगेच म्हणाले मग इथेच खाऊन टाक. मी गोरामोरा झालो कारण ते शक्यच नव्हते ! ते म्हणाले हे कारागृह आहे, तुझे घर नाही. येथे जे खायला दिले जाईल तेच खावे लागेल. तुमचे खाण्या-पिण्याचे चोचले पुरवायला तुम्ही काही फार महान कामगिरी बजावलेली नाही. उलट प्रस्थापित सरकारच्या विरोधात उठाव करून तुम्ही येथे आला आहात, तुमच्याविरुद्ध राजद्रोहाचा खटला चालू आहे. सरकारी नियमानुसार वागायचे तुम्हाला कोणत्याही सोयीसुविधा देण्यास मी बांधील नाही, असे म्हणून त्यांनी ती तेलाची बाटली जप्त केली आणि मी हिरमुसला होउन बरेक कडे परतलो.

साधी गोडे तेला ची बाटली नाकारताना त्या जेलरला थोडीफारही दयामाया वाटली नसेल? त्याच्या राजापेक्षा राजनिष्ठ या वर्तणुकीतून त्याने काय मिळवले? असे वागून त्याने त्याचे कर्तव्य बजावले असेलही पण अनेक मने मात्र दुखावली. पण कर्तव्यापुढे सारे गौण.

©️ हेमंत बेटावदकर, जळगांव

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

------------------------------------------------------
Like & Follow us..

Click here 👉  Facebook
Click here 👉  Instagram
Click here 👉  Twitter
Click here 👉  YouTube

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या