'शिवराज्याभिषेक' अर्थात 'हिंदूसाम्राज्य दिन'

-----------------
©️ प्रवीण प्रल्हाद नायसे, भुसावळ

छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य हे पराक्रमाने आणि प्रेरणेने भारलेले आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाला, घटनेला बघितल्यास एक वेगळा रोमांच अनुभवास येतो. अशा या दैदिप्यमान आयुष्यात एक दिवस मात्र अतिविशेष म्हणावा लागेल कारण त्यादिवशी शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प पूर्ण झाला होता आणि रयतेला जाणता छत्रपती लाभून शेकडो वर्षांच्या गुलामी नंतर या हिंदूस्थानात पुन्हा एकदा हिंदूंचे साम्राज्य प्रस्थापित झाले होते आणि तो दिवस म्हणजेच इ.स. १६७४ चा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा "शिवराज्यभिषेकदिन".  सभासद बखर मधे बखरकार वर्णन करतांना म्हणतात, "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मराठा पातशहा येवढा छत्रपती जाहला हि गोष्ट सामान्य जाहली नाही.." यावरून या राज्यभिषेकाचे महत्व कळून येते.

भारतात अनेक परकियांनी आक्रमणे केली. अर्थातच आपला भारतदेश हा खुप समृद्ध देश होता म्हणून अनेकांच्या वाईट नजरा येथे वळल्या. शक, हून, कुशाण, ग्रीक यांच्या आक्रमनांना तोंड देऊन येथील वीरांनी महान पराक्रम गाजवला होता. परंतू आठव्या शतकात इ.स. ७११ ला झालेल्या महम्मद बिन कासिमच्या पहिल्या इस्लामी आक्रमणा पासून ते नंतर झालेल्या सर्व सुलतानांच्या आक्रमणाने भारताच्या हिंदू संस्कृतीचे अतोनात नुकसान झाले. युद्ध सुद्धा नियमाने करणारी आपली हिंदू संस्कृती होती जिचे गौरवपूर्ण वर्णन मेगॕस्थेनीस हा ग्रीक विचारवंत त्याच्या "इंडिका" या ग्रंथात करतो तो म्हणतो, "इतर राष्ट्रांमध्ये हि सर्वसामान्य गोष्ट आहे की युद्ध सुरू झाल्यावर शत्रूचा प्रदेश बेचिराख करावा, पण भारतात हा प्रकार कधीही दृष्टोत्पत्तीस येत नाही उलट भूमीला अत्यंत पवित्र समजण्यात येते."

असा महान आदर्श असलेल्या आपल्या संस्कृतीला युद्धात कोणाला मारावे हे ठाऊक होते, शत्रूंच्या स्त्रियांना आणि बालकांना इजा पोहचवू नये, शरणागतास अभय द्यावे, दुर्बलांवर अत्याचार करू नये हे आपल्याला ठाऊक होते. मात्र धर्मांध टोळधाडींचे धोरण याच्या उलट होते. क्रौर्य, धर्मांधपणा, स्रियांचे आणि लहान बालकांचे अपहरण आणि अत्याचार, देऊळे पाडून मुर्तिभंजन करणे, लुटालूट , जाळपोळ, सामुहिक धर्मांतरण आणि कत्तली, लंपटपणा , ऐषआराम, असत्य बोलून फसवणे हे स्वरूप एका हातात धर्मग्रंथ आणि एका हातात तलवार घेऊन आलेल्या या नराधमांचे होते. हे स्वरूप भारतीयांना ओळखता आले नाही, नियमाने जगणाऱ्या पृथ्वीराज चौहाण सारख्या महान हिंदू सम्राटांनाही दगा देऊन या सुलतानांनी संपूर्ण भारताला पारतंत्र्याच्या अंधार कोठडित ढकलून दिले. भारत या धर्मांध आणि क्रूर सुलतानांच्या अत्याचारात पूर्णपणे भरडला जात होता. गुलामीची मानसिकता इतकी प्रबळ झाली होती कि इथले विद्वान पंडित, साहित्यिक हे सुद्धा या सुलातानांनाच जगदिश्वर मानत होते. आपण संघर्ष करून आपले स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त करावे हा विचार सामान्यजनच काय काही थोडके पराक्रमी सोडले तर कुणाच्याही मनात येत नव्हता.

पारतंत्र्याच्या अशा भयानक परिस्थितीत शेकडो वर्षांच्या गुलामीनंतर रयतेचे आणि स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी, देवाधर्माचे राज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांनी "स्वराज्य" स्थापनेची शपथ घेतली आणि आपल्या अतुलनीय पराक्रमाने पूर्णही केली. अनेक वीरांनी आधी पराक्रम केला होता परंतू वारंवार स्वराज्याचे  पुनरूत्थान करून शिवरायांनी अजेय क्षमता असलेलं राज्य निर्माण केलं हे महाराजांचे विशेष आहे. संपूर्ण देशावर जेव्हा इस्लामी सुलतानांचे राज्य असतांना आणि "आपण जिंकू शकत नाही, आपण गुलाम आहोत, आता दिल्लीश्वरच आपला देव आहे..." अशी येथील सामान्य रयतेची मानसिकता झालेली असतांना स्वतःला राज्यभिषेक करवून घेऊन हिंदूचे स्वतंत्र सिंहासन निर्माण करून आपणही लढू शकतो, जिंकू शकतो आणि सर्वांच्याच हिताचे हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतो हा विश्वास छत्रपती शिवरायांनी सर्व रयतेच्या मनात निर्माण केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचाराने प्रेरित होऊन पुढील पिढ्यांनी कर्तृत्व गाजवून दिल्लीवर भगवे निशाण फडकवून दाखवले आणि भारताला या सुलतानी गुलामगिरीतून मुक्त केले तसेच स्वधर्माचे रक्षण केले. शिवरायांच्या या कामगिरी विषयी गौरवोद्गार काढतांना आधुनिक भारतातील राष्ट्रपुरूष न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे त्यांच्या "Rise of Maratha Power" या ग्रंथात म्हणतात, "शिवछत्रपतींनी विखूरलेली मराठी शक्ती एका उच्चध्येयासाठी एकसुत्रीत केली आणि समान राष्ट्रीय संकटाविरूद्ध तिचा उपयोग करून घेतला. शिवछत्रपती आपल्या राष्ट्रबांधवांच्या श्रद्धेचा विषय झाले आहेत, पिढ्यानपिढ्या त्यांनी राष्ट्रभक्तीने भारून टाकल्या त्या संपूर्ण भारतात हिंदू साम्राज्य प्रस्थापित होई पर्यंत या प्रेरणेनेच अखंड क्रियाशील होत्या..." याप्रमाणेच प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार त्यांच्या 'India Under Aurangzeb' या ग्रंथात शिवरायांविषयी गौरवोद्गार काढताना म्हणतात, " हिंदूराष्ट्र घडवू शकतात, राज्य स्थापन करू शकतात, शत्रूचा पराभव करू शकतात, आपले संरक्षण स्वतः करू शकतात, व्यापार व उद्योगधंदे याची भरभराट करू शकतात, कला व साहित्य निर्मिती करू शकतात, नौदल निर्माण करू शकतात अशा अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी आपल्या उदाहरणावरून सिद्ध करून दाखविल्या. आधुनिक हिंदूंनी आपला विकास आपल्या शक्तीनुरूप पूर्णपणे करून घ्यावा ह्याची शिवाजी महाराजांनी हिंदूंना शिकवण दिली..."
                        
आज काही लोक शिवरायांना सेक्युलर (हिंदूधर्म न माननारे या अर्थाने) जरी म्हणत असले तरी छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला धर्माचेच अधिष्ठान होते हे अनेक पुराव्यांनी सिद्ध होते. शिवकाळातील परिस्थितीचा विचार करता त्याकाळी अनेक साधूसंतांनी धर्मांधांचा धोका ओळखून धर्माचा पाया मजबूत केला होता आणि म्हणून रयत धर्माविषयी पूर्णपणे श्रद्धा असलेली होती. शिवरायांनी रोहिडेश्वरावर ईश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पुढे त्यांनी दादाजी नरसप्रभू यांना लिहिलेल्या पत्रात, "हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात फार आहे.." असे लिहून शिवरायांनी आपले कार्य ईश्वरी असल्याचा निर्वाळाच दिला आहे. शिवराय धार्मिक होते आणि म्हणूनच त्यांना दुखविण्यासाठी अफजलखानाने हिंदू देऊळांना त्रास दिला होता.

शिवरायांच्या धार्मिक असण्यावर पुरावा म्हणून सर जदुनाथ सरकार यांचे म्हणने लक्षात घेण्यासारखे आहे ते म्हणतात, "जन्मापासूनच शिवाजी महाराजांची धर्माकडे स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने आणि त्यातच लहानपणी त्यांच्यावर वेळोवेळी प्रखर धार्मिक संस्कार झाल्याने शिवाजी महाराजांचा मनःपिंड सर्वार्थाने धार्मिक बनलेला होता. त्यांचा धर्मविषयक दृष्टीकोन उदार होता..." आई तुळजाभवानी आणि जगदिश्वरावर असलेली शिवरायांची दृढ श्रद्धा सर्वश्रुतच आहे. या सर्व कारणांमुळे परकियांनीही शिवाजीराजे हे हिंदूंचे राजे आहेत असे मानले होते. 

राजापूरचा इंग्रज अधिकारी हेन्री रेव्हिंगटन् याने शिवरायांना १३ फेब्रुवारी १६६० ला  लिहिलेल्या एका पत्रात शिवरायांचा "General of Hindu Forces" म्हणजेच "हिंदूसेनाधिपती" असा उल्लेख करतो. हिंदूधर्माच्या स्वाभिमानाविषयी शिवरायांच्या उक्तीचे आणि कृतींचे खुप दाखले आज उपलब्ध आहेत ते सर्व एका लेखात देणे अशक्य आहे परंतू त्या काळात शिवरायांची संस्कृत भाषेतील मुद्रा, स्वभाषेच्या जतनासाठी निर्माण केलेला राज्यव्यवहारकोश, नेतोजीरावांना स्वधर्मात घेण्याचा निर्णय, शत्रूंच्या स्त्रियांनासुद्धा दिलेली आदरयुक्त वागणूक, भेदाभेद न करता सर्व जाती धर्माच्या रयतेबद्दल असलेलं उदार धार्मिक धोरण अशा असंख्य गोष्टी शिवरायांच्या सहिष्णू, उदार, विश्वव्यापक असणाऱ्या हिंदू संस्कृतीयुक्त तेजाने तळपणाऱ्या हिंदवी स्वराज्याची साक्ष देतात.

समर्थ रामदास शिवरायांविषयी चांगले जाणून होते आणि म्हणून धर्म रक्षण करण्यासाठी शिवराय हे एकमेव योग्य युगपुरूष आहेत हा त्यांना पूर्ण विश्वास होता. ते शिवरायांना उद्देशून म्हणतात,    "या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहीला काही तुम्हा कारणे.."

उत्तर भारतातून आलेला कवीभूषण तर महाराजांच्या चरित्रातून इतका प्रेरित झाला होता कि त्याने महाराजांना "मुघलदल संहारक" म्हटले. "हिंदूधर्म रक्षक" म्हटले. कवी भूषण त्याच्या काव्यात शिवरायांचे महत्व विशद करतांना म्हणतो," काशीहु की कला जाती मथुरा मस्जित होती, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी" आपण गांभीर्याने या ओळीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. 

छत्रपती शिवरायांचे सर्वधर्मविषयक धोरण उदार होते, परंतू त्यांचे स्वधर्माचे आचरण तेवढेच प्रेरणादायी आहे. त्यांनी कधीच स्वतःहून परधर्माचा अनादर केला नाही, परंतू स्वधर्मावर चालून आलेल्या शत्रूला त्यांच्या तलवारीने कधीच माफ केले नाही. प्रसंगी साम, दाम, दंड, भेद वापरून त्यांनी शत्रूंचा संपूर्ण नाश केला.

प्रसिद्ध शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे हे अनेक कागदपत्रे आणि इतिहासातील साधणांचा अभ्यास केल्यानंतर ठामपणे शिवरायांच्या स्वराज्याचा उद्देश सांगताना म्हणतात, "शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्य स्थापन केलं राज्यभिषेकाच्या निमित्ताने त्यांनी याची प्रकट घोषणा केली यामागचे शिवरायांचे उद्दिष्ट बऱ्याच प्रमाणात साध्य झाले. हिंदूंचे रक्षण, हिंदूंचे उत्कर्षण आणि त्यासाठी इस्लामी राजवटींचा नाश हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे उद्दिष्ट होते असेच उपलब्ध कागदपत्र आणि इतिहासाच्या साधनांमध्ये दिसून येते..." म्हणून शिवरायांचे स्वराज्य हे हिंदू साम्राज्यच होते आणि म्हणून ज्यादिवशी हे घोषित झाले तो दिवस म्हणजेच "शिवराज्यभिषेकदिन" अर्थातच "हिंदू साम्राज्य दिन" म्हणून साजरी केला जातो. 

(लेखक शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक व व्याख्याते आहेत. संपर्क- ९९७०७३८७६९)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या