श्री शिवराज्याभिषेकसाठी रायगडावरील सज्जता व तयारी

----------------
✍️ रवींद्र गणेश सासमकर

"हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे", असे म्हणत शिवरायांनी स्वराज्याचा पवित्र वसा हाती घेतला. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहीले आहे, की "मोठ्या युक्तीने  तोरण्याचा किल्ला सर करून मराठ्यांनी हिंदूंचा झेंडा रोविला"

स्वराज्यस्थापना हे सहजसाध्य होणारे कार्य नव्हते. महाराजांना आदीलशाही, मुघल, जंजिरेकर सिद्दी आणि पोर्तुगिज सत्तांशी संघर्ष करावा लागला. लोककल्याणकारी राज्याचे एक प्रमाणच शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या रुपाने उभे केले. अशा या महान राजाचा ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी आंग्ल दि. ६ जुन १६७४ ला राज्याभिषेक झाला. शिवराय याच दिवशी "सिंहासनाधिश्वर छत्रपती" झाले. ही सामान्य घटना नव्हे! हिंदुंच्या इतिहासातील सुतक याच दिवशी फिटले. जीर्ण झालेल्या हिंदु राजधान्यांच्या जखमा इथेच बुजल्या, त्या याच दिवशी!!

राज्याभिषेकाची पूर्वतयारी

किल्ले रायगड एखाद्या लग्नकार्यात सजावे तसा सजला होता. गागाभट्टांनी मूहूर्त ठरवला होता., शके १५९६ आनंदनाम संवत्सर, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी पहाटे पाच वाजता. गंगा, यमुनादी नद्यांचे पाणी आणण्यासाठी माणसे गेली होती. राज्याभिषेकापूर्वी महाराज प्रतापगडावर आले. प्रतापगडावर श्री भवानीदेवीला सोन्याचे रत्नजडीत छत्र महाराजांनी अर्पण केले. मनोभावे श्रीभवानीदेवीची पूजा बांधली. सव्वा मण सोन्याचे छत्र अर्पण केले. आणि महाराज रायगडावर आले. 
(दि. २१ मे, १६७४) 

रायगड किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. स्थपती हिराजी इंदुलकरांनी रायगडाची राजधानी म्हणून उत्कृष्ट रचना केली होती.  रत्नशाळेचे आधिकारी आणि रामाजी दत्तो यांनी ३२ मण सुवर्ण सिंहासन अंतिम रुपात आणले होते. अभिषेकशाळा, यज्ञशाळांनी आकार घेतला. गंगा, यमुनादी सप्तनद्यांचे पाणी रायगडावर आणले होते. हेन्री ऑक्झिंडेन हा वकील जाॅर्ज राॅबिन्सन आणि थाॅमस मायकेल या आपल्या सहकार्यांसह राजधानीत दाखल झाले होते. दुभाषा म्हणून नारायण शेणवी हा त्याच्या बरोबर होता. हेन्री ऑक्झिंडेनने महाराजांसाठी सोळाशे पन्नास रुपयांचा नजराणा आणला होता. शिवाय युवराज व इतर मंडळीसाठी सुमारे तीन हजार पासष्ट रुपयांचे नजराणे त्याने आणले होते. ईस्ट इंडिया कंपनीने महाराजांसाठी एक सुंदर खुर्चीही पाठवली होती. राज्याभिषेकाच्या नोंदी हेन्री आपल्या डायरीत केल्या आहेत.

२९ मे, १६७४ रोजी महाराजांची मुंज झाली. तुलादान, तुलापुरुषदान हे विधी झाले. यावेळी महाराजांना सोने, चांदी, रुपे या धातुंनी तुला करुन ते ऋजित्वांना दान करण्यात आले. महाराजांची तुला करण्यासाठी १६ हजार होन लागले. यावरुन असे लक्षात येईल की महाराजांचे वजन ६८ किलो असावे. यानंतर सोयराबाईंशी महाराजांचा समंत्रक विवाह लावण्यात आला. ( ३० मे, १६७४) या नंतर श्रीगणेशपुजन, अभिसिंचन, षोडश मातृकापूजन असे काही ना काही मंगलविधी रायगडावर संपन्न होत होते. गागाभट्ट यांनी स्वतः राज्यभिषेक विधी करण्याचा ग्रंथ निर्माण केला होता. 

शिवाजी महाराज राजराजेश्वर झाले -

श्रीनृप शालिवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी शनिवार. पहाटे पाच वाजता शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सुरु झाला. त्या मूर्हूताची तुलणाच नाही. महाराज सिंहासनाधिश्वर छत्रपती होणार होते. अवघ्यांच्या डोळ्यात उत्सुकता दाटली होती. सर्वात जास्त आनंद अर्थात राजमाता जिजाऊसाहेबांना झाला होता. त्यांचा लाडका शिवबा आज अभिषिक्त राजा होणार होता. कृतार्थपणे त्या सोहळा पाहत होत्या. धन्य धन्य ती माता आणि धन्य तिचा तो  सुपुत्र !  डोळ्यांचे पारणे फेडणारा तो क्षण समीप येत होता. 

महाराज राजसभेत आले. पहाटे पाच वाजता  महाराज सिंहासनाधिश्वर छत्रपती झाले. शंभुराजे युवराज झाले ! मंगलवाद्ये वाजू लागली. गडागडावरुन तोफांचे आवाज झाले. लोकांनी पृष्पवृष्टी केली. सर्वांनी जयजयकार केला "प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस, गो-ब्राम्हण प्रतिपालक, सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज, श्री राजा शिवछत्रपती की जय" दहादिशांना जयघोषाचे प्रतिध्वनी उमटले. दिल्लीच्या बादशाहाला दिमाख दाखवणारा हा सोहळा होता. शतकांच्या परकीय आक्रमणांनी घायाळ झालेल्या हिंदुसमाजावरची ही फूंकर होती. नगारे, चौघडे, शिंगे, कर्णे वाजवून लोक आनंद व्यक्त करु लागले. गोंधळी, भाट गाऊ लागले.

कृष्णाजी अनंत सभासदाने या घटनेचे विलक्षण रोमांचकारी वर्णन केले आहे तो लिहीतो  "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मर्ह्राटा बादशाह येवढा पातशाह जाला. ही गोष्ट सामान्य जाली नाही."

राज्याभिषेकाच्या दिवशी हेन्री ऑक्झिंडेन राजसभेत आला. नारायण शेणवी त्याच्यासोबत होता. सिंहासनासमोर वीस हातावर तो उभा राहिला. त्यांनी ब्रिटीश पध्दतीने महाराजांना अभिवादन केले व आणलेल्या नजराण्यांपैकी हिऱ्याची अंगठी महाराजासमोर अदबीने धरली. महाराजांनी त्याला सिंहासनाजवळ बोलावून त्याला  मानाची वस्त्रे दिली. 

महाराजांना आता शोभायात्रेला निघायचे होते. सिंहासन आरोहन व अन्य विधी चार तास तरी चालले असतील. नंतर महाराज एका हत्तीवरील आसनावर बसले. हत्ती चालवण्यासाठी माहूत म्हणून हंबीरराव मोहीते होते. महाराजांच्या मागे सूवर्णाचे मोरचेल घेऊन मोरोपंत बसले होते. सर्वत्र जयजयकार चालला होता. एका हत्तीवर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. "आजी सोनियाचा दिनू , बरसे अमृताचा घनु, आजी सोनियाचा दिनू।।" असाच तो दिवस. आनंदाच्या डोहाला आनंदाचे तरंग आले होते. महाराजांनी मिरवणुकीने जाऊन श्रीजगदीश्वराचे दर्शन घेतले. देवदर्शन घेऊन महाराज पुन्हा मिरवणुकीने परत आले.

जेधे शकावलीतील राज्याभिषेकाची नोंद अशी आहे "शके १५९६ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ शुध्द १२ शुक्रवार, घटी २१ पले ३४ वि. ३८/४० सी. १२ तीन घटीका रात्र उरली तेव्हा राजश्री शिवाजीराजे सिंहासनी बैसले. छ.१० रबिलावल सुll खमस सबैन अलफ "

सार्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून शिवाजीमहाराजांनी स्वत:च्या मस्तकावर छत्र धारण करुन स्वत: स छत्रपती म्हणविले. राज्याभिषेकाच्या दिवसापासू  "राज्याभिषेक शक" ही कालगणना सुरु केली. महाराज "शककर्ते राजे" झाले. स्वत:च्या नावाने "श्री राजा शिवछत्रपती"  ही अक्षरे असलेली सोन्याची नाणी पाडली.  हिंदु समाजाचे नवचैतन्य शिवराज्याभिषेकाने जागृत झाले. त्यातुनच पुढे  आसेतूहिमाचल संघर्ष करुन मराठ्यांनी मुघलसत्तेचे निर्दालन केले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवला. जेव्हा जेव्हा आपल्या देशावर आणि धर्मावर संकटे येतील, आक्रमणे होतील तेव्हा  तेव्हा शिवरायांचे हे राजसिंहासन आम्हाला प्रेरणा देत राहील. एवढे या राज्याभिषेकाचे महत्व आहे.

(लेखक शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक आहेत)
मो- ८६९८५४३२५४ 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या