'शिवराज्याभिषेक' - काळाची गरज


------------------
- सौ. संगीता कर्णिक पवार

"स्वप्नि जे देखीले रात्री, ते ते तैसे ची होत से
हिंडता फिरता गेलो, आनंद वनभुवनी"

किल्ले रायगडावर श्री. शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि सज्जनगडावर श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या अमृतवाणीने असे शब्द फुलांचे शिंपण केले.

श्री. शिवरायांचा राज्याभिषेक शालीवाहन शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध १३ रोजी झाला. राजे सिंहासनाधीश्वर झाले.

"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा" या समर्थांच्या प्रेमळ उपदेशापासून तर..
"शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप" 
येथपर्यंत महाराजांच्या आदर्शवत जीवन प्रवासाची फलश्रुती म्हणजे शिवराज्याभिषेक होय.

श्री. शिवरायांचा जन्म झाला तेव्हा हिंदुस्तान चार यवनी सत्तांच्या बदफैल अमलाखाली होता. श्री. शहाजीराजे शिवाजीराजांचे पिता आदिलशहा कडे सरदार होते. त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली होती. खूप लहान वयात श्री. शिवराय आपल्या मातोश्री जिजाऊ मासाहेब आणि शहाजी राजांनी कारभारी म्हणून पाठवलेले दादोजी कोंडदेव यांच्याबरोबर पुण्यात आले. त्यावेळी पुणे भकास बेचिराख झाले होते. 

पण आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाने पुणे परगणा वसला महाराजांनी दऱ्याखोऱ्यातून मित्र मिळवले. आऊसाहेबांचे संस्कार आणि दादोजींची शिकवणूक यातून श्री. शिवराय घडले ते जसजसे मोठे होऊ लागले तशी तशी त्यांची तल्लख बुद्धी आडाखे  बांधू लागली. आजूबाजूच्या परिस्थितीचे त्यांना आकलन होऊ लागले. हिंदू प्रजेवर होणारा अत्याचार त्यांच्या डोळ्यात काट्याप्रमाणे सळू लागला. 

हिंदूं मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील स्त्री ही देवता सुलतानशाहीत फक्त उपभोग्य वस्तू झाली होती. मुसलमान सरदारच नाहीत तर त्यांच्या चाकरित असलेले काही हिंदू सरदारही मुले बायका पळवून त्यांची अब्रू लुटत आणि नंतर त्यांची रवानगी जनानखान्यात होई किंवा त्यांना आत्महत्येसाठी सोडून दिले जाई. 

एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची अब्रू लुटल्याची बातमी महाराजांच्या कानावर आली तेव्हा महाराज अगदी किशोरावस्थेत होते, पण कोणीही असो मराठ्यांच्या राज्यात गय केली जाणार नाही हे त्यांनी दाखवून दिले मुजोर रांझ्याच्या पाटलाला आपले हात पाय गमवावे लागले. शिवरायांच्या या कडक न्यायामुळे पंचक्रोशीत आपोआपच दहशत बसली.

त्यावेळी वतनदारी किंवा सरंजामदारी पद्धत होती. सैन्याच्या खर्चासाठी म्हणून जहागीर दिली जाई, ही जमिनीच्या रूपात असे. तिच्या उत्पन्नातून सैन्याचा खर्च चालवला जात असे. ही जमीन पडीक असेल तर सैन्याचा खर्च भागत नसे. मग प्रजेची पिळवणूक करून त्यांच्यावर जुलूम करून हा खर्च काढला जाई. सर्वसामान्य प्रजेच्या नशिबी दुःख यातना हेच भोग होते.

सतत होणाऱ्या लढाया, अवर्षण, हिंस्र श्वापदांचा उपद्रव यामुळे भूमिपुत्रांचे शेतकऱ्यांचे अतिव नुकसान होई. त्यातच वाढत जाणाऱ्या कर्जाच्या ओझ्यामुळे तो हवालदिल होई. मग तो शेती सोडून मोलमजुरी किंवा सैन्यातील हलकी सलकी कामे करी. महाराजांनी त्यांची ही परिस्थिती ओळखली त्यांना पुन्हा जमिनी करायला लावल्या, जमिनीची प्रत सुधारावी म्हणून सरकारातून खते दिली. बी-बियाणे दिले, बैल अवजारे पुरविली. शेतीवरील कर ६०% वरून ३०% वर आणला. कर्जफेडीसाठी पाच वर्षे दिली. जे शेतकरी पडक्या जमिनी लागवडीखाली आणतील त्यांना पाच वर्षे सारा माफ केला. त्यांना बिनव्याजी तगाई कर्ज दिले. त्याकाळी व्यापाराचे महत्व जनता पूर्णपणे विसरली होती राजांनी सुरत लुटली तेव्हा व्यापाऱ्यांना आपलेसे करून ते आपल्या बरोबर घेऊन आले आणि आणि व्यापार सुरू केला.

ही तो श्रींची इच्छा असे म्हणत महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केले होते त्यावर अफजल खान, शाहिस्ताखान, सिद्दी जोहर यासारखी अनेक सुलतानी आक्रमणे झाली. पण राजांनी या सगळ्या मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केले. एवढेच नाही तर दिल्लीला औरंगजेबाच्या  जबड्यातूनही महाराज सुटून आले.

खरे तर तेव्हा महाराजांनी रायरेश्वराची शपथ घेतली तेव्हाच त्याचा राज्याभिषेक झाला असे म्हणावयास हवे. कारण त्यानंतर त्यांनी निस्वार्थीपणे रयतेसाठी जे काही केले त्यामुळे ते रयतेच्या हृदयात कधीच राजा च्या स्थानावर जाऊन बसले होते.

परंतु त्यावेळी हिंदूंचे कोणतेही तत्त्व परंपरेने नव्हते. देवगिरीचा राजा रामदेवरायाच्या राज्याच्या अस्तानंतर हिंदूंना सिंहासनाधिष्ठित राजा नव्हता. एवढेच नाही तर काही हिंदू सरदारही राजांना पुंड म्हणत होते. त्यांच्या स्वराज्याला मानत नव्हते. यात घाडगे, घोरपडे, मोरे, मोहिते, डबीर एवढेच नाही तर महाराजांचे भाईबंद भोसले - जाधवही होते. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावयास हवे होते.

मिर्झाराजे जयसिंग स्वराज्यावर आलेले गडद संकट त्यांच्याशी महाराजांच्या वाटाघाटी चालू असताना काही हिंदू सरदार मात्र भटा भिक्षू काकांकडून यज्ञ याग करून घेत होते. लाखो रुपयांचा चुराडा करत होते, ते राजांचा पराभव व्हावा म्हणून. अशा लोकांच्या स्वराज्य विरोधी हालचालींना चाप बसायला हवा होता.

संत तुकाराम महाराजांनी तर राज्याभिषेक होण्याआधीच "शिव' तुझे नाव ठेविले पवित्र
छत्रपती सूत्र विश्वाचे की" असे लिहून ठेवले. कारण, राज्याभिषेकानंतर साधुसंत निर्विघ्नपणे आपले यज्ञ याग करू शकतील, मंदिरे सुरक्षित राहतील, ब्राह्मण पुजारी समाधानाने शांतपणे पूजा अर्चा करू शकतील याची त्यांना खात्री होती.

समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांबद्दल म्हटले आहे -
"निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी," "यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा !"

असा हा सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ पारदर्शी रयतेच्या हिताचे कार्य करणारा राजा सिंहासनाधिश्वर व्हावा याची प्रजा वाट पाहत होते.

राज्याभिषेक मुळे त्यांचा राजा मग कोणालाही शूद्र वाटणार नव्हता, तो छत्रपती होता. शिवरायांची अष्टप्रधान मंडळाची मांडणी निर्विवाद श्रेष्ठतम आहे. 

प्रकांड पंडित गागाभट्ट यांच्याहस्ते राज्याभिषेक -

"क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मणप्रतिपालक हिंदूपदपादशहा श्रीमंत श्री छत्रपती महाराज की जय"

श्री शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि रयत आनंदली. स्त्री निर्भयपणे पाणवठ्यावर जाऊ लागली. शेतकरी आनंदला. त्याला दिलेल्या सवलतीत भर पडली. जमिनीचा वसूल क्षेत्राप्रमाणे न आकारता पिकांच्या आकडेवारीवर आकारण्याची पद्धत सर्वप्रथम महाराजांनी सुरू केली. शेतकऱ्यांची जीवनमान सुधारू लागले. त्यामुळे बलुतेदारांना कामे मिळू लागली.

कोकणपट्टी हा महाराजांच्या जिव्हाळ्याचा विषय इंग्रज पोर्तुगीज सिद्धी यांच्या पासून होणारा तिथल्या जनतेचा त्रास महाराजांनी आरमार आणि सिंधुदुर्ग सारखे बळकट किल्ले बांधून आधीच कमी केला होता. आता तर त्यांना आपला राजा मिळाला होता. राज्यभिषेक झाल्यानंतर इंग्रज शिवरायांचा उल्लेख 'General Of Hindu Forces / हिंदूसेनाधिपती' असा करू लागले होते. यावरून भारतात आलेल्या परकीयांना देखील भारत भू वरील हिंदूंचे नेतृत्व करणारे शासन निर्माण झाले असल्याचे मान्य करावे लागले होते. शिवराज्याभिषेक मुळेच ते साध्य होऊ शकले आहे.

वसुलीची कामे आधीच प्रमुख आणि त्यांचे नोकर करत होते व त्यांना पगार मिळत होता. नोकरांनी चालढकल केली तर प्रमुख त्यांना शिक्षा करू शकत असे व प्रमुखाने त्रास दिला तर नोकर न्यायालयापुढे दाद मागू शकत असे. त्यामुळे परंपरेने चालत आलेली वतनदारी मोडकळीस आली होती. राज्याभिषेकानंतर ती संपुष्टात आली.

सैन्याला सरकारातून पगार मिळत असल्यामुळे महाराजांचे सैनिक लुटारू नव्हते. त्यांना उभ्या पिकातून लढाईला जाताना जाऊ नये असा आदेश असे. कोणाच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. हवे असल्यास रोख रक्कम देऊन ती घ्यावी, असे आदेश आता कायद्याने कडक झाले. त्यामुळे सामान्य जनता सुखावली जिजाऊंच्या डोळ्याचे पारणे फिटले.

बजाजी निंबाळकर हे सकळ सौभाग्यवती सईबाई यांचे बंधू त्यांना बळजबरीने मुसलमान केले गेले होते. त्यांना महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते. त्यांच्या मुलाला आपली मुलगी दिली होती. परंतु, नेताजी पालकर महाराजांवर रागवून आदिलशाहित गेले होते. ते परत आले तेव्हा मोहम्मद अली खान झाले होते. त्यांना पुन्हा धर्मात घेताना विरोध झाला असता, पण राजा प्रजेसाठी देव असतो ही भावना त्या काळी दृढ होती. म्हणूनच राजांनी त्यांचे धर्मांतरण करुन हिंदू धर्मात घेतले तरी विरोध झाला नाही.
राज्याभिषेकानंतर बाबासाहेब पुरंदरे आपल्या राजा छत्रपती या पुस्तकात श्री शिवरायांना राज्याभिषेक का करावा लागला त्याबद्दल परखडपणे म्हणतात.

परंतु तरीही आपले स्वराज्य निर्माण झाले असून आपल्याला एक महान राजा लाभला आहे हे काही केल्या विचारवंत हिंदू मनाला पटेना म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. भविष्यपुराणाने झपाटलेल्या मूर्खांना आणि कयामत दिनतक बादशाही गाजवण्याची घमेंड बाळगणाऱ्या शेख मोहम्मद यांना आणि फाजील शंकेखोराना या राज्याभिषेकाने धडा मिळाला.

"प्रतिपच्चंद्र लेखेवर्धिष्णू विश्व वंदिता
शाहसुनो शिवशेश्या मुद्रा भद्राय राजते।।"

तेराव्या शतकाच्या शेवटी देवगिरीच्या रामदेवरायचे राज्य गेले आणि अख्ख्या भारतावर हिंदूंची स्वतःची अशी सत्ताच शिल्लक राहिली नव्हती. हिंदूंचे सैन्य कितीही विशाल असले तरीही काही ना काही कारणास्तव हिंदूंचा पराजय होत होता व त्यासोबतच हिंदू यशस्वी प्रत्युत्तर देऊ शकतो व स्वराज्य टिकवू शकतो असा आत्मविश्वास खचत होता. स्वा. सावरकर सांगतात, छत्रपती शिवाजी राजांच्या काळात मात्र हिंदूंच्या मागे लागलेली पराजयची अवदसा शत्रूच्या मागे लागली आणि हिंदू सेनेचाच केवळ विजय होऊ लागला. ज्यामुळे पुन्हा एकदा हिंदूंच्या मनात स्वधर्म व स्वराज्य निर्मिती व संरक्षणाचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकला.  सावरकर पुढे असंही म्हणतात, "श्री शिवरायांनी चालू केलेली चळवळ त्यांच्या पश्चात्य दीर्घकाळ टिकली इतकेच नव्हे तर त्यांच्यासारख्या समर्थ आणि देशभक्त विभूती ची शतावदी संघटना पटूंची आणि रणधूरंदरांची, वीरांची आणि हुतात्म्यांची एक अखंड परंपरा निर्माण झाली." यावरून शिवराज्याभिषेकाचे महत्व आणि गरज आपल्या लक्षात येते.

पारतंत्र्याच्या काळात राजांना गुरुस्थानी मानून कित्येक क्रांतिकारकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. राजांचे कार्य फक्त त्या काळापुरते मर्यादित नव्हतेच, त्याचा ठसा आजही समाजावर आहेच. म्हणूनच स्वातंत्र्यवीर म्हणाले
हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा
हे हिंदू तपस्या पुत ईश्वरी ओजा
हे हिंदू श्री साम्राज्य भुतीच्या राजा 
हे हिंदू नृसिंह नमो शिवाजी राजा...

जयतु शिवाजीराजा जयतु

(लेखिका शिक्षिका आहेत व शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासक व व्याख्यात्या आहेत)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या