शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक - आक्षेप आणि वास्तव


-------------------
- रवींद्र पाटील

हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरला जाईल असा अवर्णनीय शिवराज्यभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी हिंदू वैदिक पद्घतीने मोठ्या उत्साहात पार पडला होता. शिवाजी राजे छत्रपती झाले होते. रयतेला खऱ्या अर्थाने त्यांचा राजा मिळाला होता. परकीय असो वा स्वकीय साऱ्यांनाच हिंदुस्तानात एक महापराक्रमी हिंदू राजा असल्याचे मान्य करावे लागणार होते. परंतु, याच दरम्यान निश्चलपुरी नावाच्या तंत्रिकाने पुन्हा एक राज्याभिषेक व्हावा असा घाट घातला होता. गागाभट्ट यांनी केलेला राज्याभिषेक योग्य नाही व या राज्याभिषेका दरम्यान झालेले अपशकुन पाहता असे करावे लागेल असे त्याने सांगितले होते. तथापि छत्रपती शिवरायांचा अश्या कोणत्याही अपशकुन व अंधश्रद्धा यावर विश्वास नव्हता, तरीही जनभावना लक्षात घेता एक छोटेखानी तांत्रिक राज्यभिषेक केल्याचा उल्लेख आढळतो.

शिवरायांनी केलेल्या पहिल्या राज्याभिषेकावर तथ्यहीन आरोप करणारे जसे आहेत तसे दुसरा राज्यभिषेक झाला म्हणून शिवराय व तंत्रविद्या या गोष्टींचा संबंध लावणारेही दुधखुळे कमी नाहीत. 
म्हणून नेमके काय आहे प्रकरण, समजून घेऊ..

रायगड किल्याच्या पायथ्याशी रायगडवाडी मध्ये निश्चलपुरी गोसावी  म्हणून एक तांत्रिक रहात असे. तो देखील पहिल्या राज्यभिषेक सोहळ्यात या सर्व सोहळ्यास आमंत्रित होता. जनभावनेचा आदर करणाऱ्या शिवाजी राजांनी राज्यात काही कलह नको, तसा वितंडही नको म्हणून निश्चलपुरी गोसावीचे म्हणणे शांतपणे  एकून घेतले. नेमके गोसाविने रायगडावर विधी सुरू असताना सभोवार न्याहाळताना काही गोष्टी अधोरेखित केल्या होत्या. त्यात नेसरीचा युद्धात प्रतापराव गुजरांच्या झालेला घात, पाचाडच्या वाड्यात काशीबाई राणी साहेबांच्या झालेला मृत्यू, शिवराय ज्या रथावर बसले तो रथ खचणे, शिवरायांच्या बोटातून अंगठी गळून पडणे आणि शंभुराजांच्या शिरपेचातील दोन मोती गळून पडणे या घटना अपशकुनी आहेत, म्हणून येत्या पुढील काही दिवसात राज्यावर संकट कोसळणार आहे असे सूतोवाच केले. 

झाले. आधीच अंधश्रद्धा व अपशकुनांनी ग्रासलेल्या समाजाला लगेच याची भीती व चिंता वाटू लागली. शिवाजी महाराजांनी या भविष्याला आणि अपशकुनांना अजिबात गंभीर्याने घेतले नाही. ज्या राजाने शत्रूला पराजित करण्यासाठी कधी अमावास्येचा विचार केला नाही तो असल्या खुळचट भविष्य वाणीने तो चलबिचल होणार नव्हता. त्यामुळे हा विषय असाच मागे पडला.

एके दिवशी रायगडावर विवेकसभा भरवली असता राजांनी निश्चलपुरींची आठवण काढली. त्यांच्या क्षेम कुशल असण्याविषयी विचारणा केली. त्यावेळी कवी कलश यांनी पुन्हा या विषयाची आठवण करून दिली. मासाहेब जिजाऊंच्या निधनामुळे निश्चलपुरी गोसाव्याने सांगितलेले भाकीत खरे ठरत असल्याचे भावना लोकांमध्ये पसरली असल्याचे त्यांनी राजांना सांगितले. राजांना त्याचे हसू आले.  

प्रभू रामचंद्रांनीही राज्याभिषेक केला होता. त्रिकालज्ञानी वशिष्ठ ऋषींनी त्यांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढून त्यांच्या हस्ते तो राज्याभिषेक पार पडला होता. त्यामुळे काय रामचंद्रांवर येणारी आव्हाने संपली होती काय? श्री रामांना वनवासात जावे लागले. रावणाशी युद्ध झाले. संकटं आणि आव्हानं येणारच नाही म्हणून राज्याभिषेकाचं महत्व असतं तर हिंदू राजांनी केवळ राज्याभिषेक करूनच परकीय शत्रूंना पादाक्रांत नसतं का केलं?  
राज्यभिषेक म्हणजे प्रजारक्षणाची विधिवत जबाबदारी असते. अख्ख्या हिंदुस्तानात हिंदू केवळ परकीय इस्लामिक राज्यकर्त्यांचा गुलाम म्हणून जगत होता, अश्या परिस्थितीत या सर्व शत्रूंच्या जोखडाला तोडून स्वतःचे राज्य - 'स्वराज्य' निर्माणकर्ता व स्वराज्यरक्षक होण्याला पुष्टी देणारा विधी म्हणजे राज्यभिषेक होता. दोन दिवसात स्वराज्य स्वराज्य करणाऱ्या शिवाजीचं भूत उतरून जाईल, असं म्हणणाऱ्या स्वकीय व परकीय अश्या साऱ्यांच्या स्वप्नांना खोटं ठरवणारा विधी राज्याभिषेक होता. इतक्या महान तत्वाचा शूद्र विचार करून अपशकुनांनी चिंताग्रस्त होणारे शिवाजी महाराज नव्हते. 

परंतु, जिजाऊ मासाहेब यांचे निर्वाण झाल्यामुळे लोकांची माने शंकीत झाली. तथापि राज्यभिषेक झाल्यानंतर लगेचच महाराजांनी बहादूर गडाला वेढा दिला आहे. औरंगजेबाचा दक्षिणेतील सरदार म्हणून बहादूरखान तळ ठोकून होता. यावेळी बहादूर खानाला सपाटून मार खावा लागला व मराठ्यांनी एक कोटी होण एवढी लूट आणली आहे. वसईकडील पोर्तुगिजांचा बंदोबस्त करण्यासाठी फोंडा येथे राजांनी अनाजीपंतांना पाठविले होते. तेही त्यांच्या कामात यशस्वी होत होते. पोर्तुगीजांना जरब बसत होती. आणि भागानगर कडे खुद्द संभाजी राजे व आनंदराव मराठ्यांची दहशत बसावी म्हणून गेले होते. ते सुद्धा कुतुबशाहीची येताना मोठी लूट करून परत आले. कुठेच अपयश नाही. कुठेही अपशकुन आडवा आला नाही. मासाहेब जिजाऊ यांचे सर्व मनोरथ पूर्ण झाल्यामुळे आणि वय झाल्यामुळे त्या निवर्तल्या होत्या, हेच त्यांच्या मृत्यूचे कारण होते. 

राज्यभिषेक झाल्यानंतर शिवाजी राजांनी ब्रह्मवृदांना, संन्यासी, साधू, संत यांना दाने दिली. निश्चलपुरी गोसव्याला ही आपल्याला काही अर्थसंपदा मिळावी असे वाटत होते. म्हणून त्याने संधी पाहून ही अफवा उडवून दिली. महाराज आपला मोठा सन्मान करतील व आपल्या कडूनही राज्याभिषेक दरम्यान काही तांत्रिक विधी करून घेतील म्हणून तीन महिने आधीपासून या निश्चलपुरी गोसाव्याने रायगड जवळ केला होता. 

परंतु, निश्चलपुरी गोसाव्याने भाकीत वर्तविल्यापासून शिवाजी राजांच्या प्रेमापोटी व काळजीपोटी रयत घाबरी होत होती. नको त्या वावड्या उठत. म्हणून प्रजेचं मन राखावं आणि एकदाचा हा विषय संपवावा म्हणून शिवाजी राजांनी निश्चलपुरी गोसाव्याकडून एका दिवशी तांत्रिक राज्याभिषेक करून घेतला. शिवाजी महाराज रयतेवर जीव ओवाळून टाकणारे राजे असल्यामुळे त्यांनी केवळ जन भावना लक्षात घेऊन दुसरा राज्याभिषेक केला होता, असेच म्हणता येईल. शिवरायांचा परंपरागत सुरू असलेल्या हिंदू वैदिक पद्धतीवर पूर्ण विश्वास होता. जिथे जिथे राजांना चालीरीती धर्मासाठी व राज्यासाठी अहितकारी वाटल्या, तिथे तिथे राजांनी त्याला बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
अधिक काय सांगणे. 

(लेखक इतिहास प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष व इतिहास संकलन संस्थेचे उपाध्यक्ष तसेच, शिवचरित्राचे अभ्यासक व व्याख्याते आहेत.
संपर्क: ७८८७३३७३३२)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या