स्थितप्रज्ञ बाळासाहेब झारे

नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती...

@ दीपक गजानन घाणेकर.
मो.नं. - ९४२३१८७४८०
------------

एके दिवशी मी बंडोपंत कानडे यांना फोन केला. त्यांच्या घरातील क्षेम कुशल विचारुन वहिनींच्या तब्येतीची विचारपुस केली. बंडोपंतांनी मी वडिलांवर लिहिलेला "नाही चिरा नाही पणती" या सदरातील लेख वाचला होता. त्यावर प्रतिक्रिया देतांना बंडोपंत म्हणाले, मला ब-याच गोष्टी वडिलांच्या या लेखातून समजल्या. मी त्यांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दिले. त्यांनी माझ्या वडिलांबद्दल, (कोणालाही न सांगण्याच्या बोलीवर) एक माहिती सांगितली. मी उत्सुकतेने ऐकत होतो, बंडोपंत म्हणाले, "तुझ्या वडिलांना एक चिंता नेहमी असे. दीपकचा मित्रपरिवार चांगला आहे कां? बंडोपंत जरा लक्ष द्या."

वडिलांना चिंता वाटावी असे कारणही तसेच होते. मी कॉलेजचे शिक्षण घेत होतो व अभ्यास करण्यासाठी बंडोपंतांच्या घरा जवळच आम्ही मित्रांनी एक खोली भाड्याने घेतली होती. खोली ही अभ्यासापेक्षा संपर्क कार्यालयच होते. अनेक प्रकारची (स्वभावाची) मंडळी या संपर्क कार्यालयात येत असत. खोलीचे भाडे देणारे आम्ही तिघे होतो, अजित सदाशिव, दीपक गजानन, लक्ष्मीकांत विश्वनाथ (उर्फ अवि). तथाकथित अभ्यासाच्या खोलीत असा नियम होता की आडनावाचा उल्लेख टाळून स्वतःचे व वडिलांचे नावाने बोलायचे. आमच्या खोलीत दोन निमंत्रित सदस्यही होते. अर्थात ही नांवे खोली मालकाला सांगितली नव्हती. ती जर सांगितली असती तर खोली मिळण्याची शक्यता नव्हती. ते होते प्रमोद पंडितराव, उमाकांत काशिनाथ (झारे). या दोघांचा शिक्षणाचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. परंतु ही जोडी आमच्या शैक्षणिक जीवनात आली नसती, तर आमचे शिक्षण अपूर्ण राहिले असते.

आमची व बाळासाहेब झारे यांची मैत्री केंव्हा झाली व ती घट्ट केंव्हा झाली हे सांगणे अवघड आहे. पण  या मैत्री मागे संघ कार्यालय हा दुवा होता. जुने संघ कार्यालय हे बळीराम पेठेत जुन्या नगरपालिकेच्या मागील गल्लीत कावडीया वकिलांच्या शेजारी भाड्याने घेतले होते. कावडीया वकिलांचे ऑफिस शेजारी संघ कार्यालय, परदेशी सरांचे क्लासेस व त्यांच्या शेजारी श्री.कांकरीया यांचे घर. या वास्तुत बाळासाहेब एक तप ( १२ वर्षे ) राहिले. रात्री नियमित कार्यालय निवासी असायचे. 

बाळासाहेबांच्या लग्नाच्या अगोदर दोन दिवस जड अंतःकरणाने त्यांनी संघ कार्यालयाचा निरोप घेतला. या कार्यालयात अप्पाजी ओलतीकर, नाना ढोबळे, तात्या इनामदार, मुकुंदराव पणशीकर, मोहनराव आपटे अशा थोर प्रचारकांचा सहवास या कार्यालयामुळे बाळासाहेबांना मिळाला. त्यावेळी तरुणांना संघ कार्यालयाचे आकर्षण असे. रात्रीचे जेवण झाले की सर्वजण कार्यालयात येत व चेष्टा,दंगा मस्ती करत. यात बालूचाही भाग असे, मात्र हे सर्व योग्य अंतर ठेवून करत.(बाळासाहेबांना आम्ही बालू म्हणत असू.) 

दंगामस्ती,चेष्टा करतांना कोठेही लक्ष्मणरेषा ओलांडली जात नाही याची काळजी बालू घेत असे. बालू संघ कार्यालयाचा जसा पालक होता, तसे आमच्या मित्र मंडळींचे पालकत्व त्याने स्विकारले होते. रात्री कार्यालयात आल्यावर कधी कधी रेल्वे स्टेशनवर चहा किंवा दुध पिण्यासाठी जात असु सर्व खर्च पालकच (बालू) करत असे. काही दिवसानंतर वहीचे पान फाडून प्रत्येकाच्या नावाच्या चिठ्या बनवल्या जात व त्यातील एक चिठ्ठी बालू  काढत असे, ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल तो त्या दिवसाचा खर्च करत असे. आमच्या मित्रमंडळीत कावडीया हा खिसा नसलेली पँट घालून कार्यालयात येत असे, त्यामुळे पैसे कधी देत नसे.

आमचा चतुर मित्र प्रमोद पंडितरावच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने सर्वांच्या नावाच्या चिठ्या बनवल्या केवळ कावडीयाची चिठ्ठी वहीच्या पानावर लाल रेघांचा समास असतो त्यावर लिहून चिठ्ठी तयार केली व कावडीयाच्या अपरोक्ष अगोदरच बालूस लाल रेषवाली चिठ्ठी काढण्यास सांगितले. यानंतर खिसा असलेली पँट घालून कावडीया कार्यालयात येऊ लागला. बालूकडे बराच काळ विक्रमादित्य सायं शाखेचा मुख्यशिक्षक /कार्यवाह म्हणून दायित्व होते. शनीपेठ, वाल्मिकीनगर जुने जळगांव येथील बाल स्वयंसेवक विक्रमादित्य शाखेवर येत असत,ते आता मोठे होऊन व्यावसायिक झाले आहेत ते देखील बालू झारे यांचे नाव घेऊन अभिमानाने सांगतात त्यांच्या संस्कारामुळे आज आम्ही प्रगती करु शकलो. 

कुशाभाऊ पुंडे या काळात शहर कार्यवाह होते. त्या वेळी अप्पा चव्हाण, अण्णा जोशी, पेशुमल कुकरेजा, चंद्रकांत शिंत्रे, चंद्रकांत चौधरी, दादा मराठे, अनिल अभ्यंकर, प्रभाकर जोशी, PTK 
( प्रभाकर कुळकर्णी ) वगैरे अनेक कार्यकर्त्यांची टीम काम करत असे. बालूवर कुशाभाऊंच्या कार्यपध्दतीचा प्रभाव होता. कुशाभाऊंचे कामाचे नियोजन, प्रवास, सुसुत्रता, कार्यकर्ता संपर्क याचा उल्लेख बालू नवीन कार्यकर्त्यांना करुन देत असे. बालू झारे यांचे मोठे बंधु मधुकरराव झारे व कुशाभाऊ पुंडे यांच्या सहकाराने कुशाभाऊंचे लहान बंधु अरुण (शंभु) पुंडे व बालू झारे यांनी टाईपींग क्लास काढला. क्लासमुळे बालूस सायंशाखेत येणे जमत नसे. त्यामुळे बालूस प्रतापादित्य रात्र शाखेची जबाबदारी देण्यात आली. १९७० मधे जळगांवला मोठी जातीय दंगल झाली. दंगल जुन्या जळगांव मधे झाली असल्याने त्या भागातील  नागरिकांना मोठ्या प्रमाणात अटक झाली. अनेक निर्दोष संघ स्वयंसेवकांनाही त्यात अडकवले गेले. या निर्दोष नागरिकांना सोडविण्यासाठी पुण्याचे प्रसिद्ध वकिल प्रांतसंघचालक माननीय कै. बाबाराव भिडे 
(ब.ना.भिडे) यांनी वकिलपत्र घेतले. या सर्व न्यायालयीन प्रक्रियेत ॲड.कै.रमेश गुप्ते, ॲड.पी.एल.जोशी (अण्णा जोशी) व ॲड.पी.एन.दप्तरी (बाबा) यांनी बरीच मेहनत घेतली.

माननीय बाबाराव भिडेंनी वकिलपत्र घेतले असल्याने त्यांचा बराच काळ जळगांवात मुक्काम असायचा. प्रतापादित्य रात्र शाखेत त्यांची उपस्थिती असायची. बालू त्या शाखेचा कार्यवाह होता. दंगलग्रस्त भागातील नागरिक मोठ्या संखेने शाखेत उपस्थित असायचे. शाखेमुळे त्याचा राम,मारुती,कोळी,जोशी,भवानी,बालाजी पेठेतील स्वयंसेवकांशी संपर्क असे. त्या काळात बालू सोबत असंख्य कार्यकर्ते संघाचे काम करत होते. कै. राजाबापु शिंदे, कै. भैया पाटील, कै.पंढरीशेठ वाणी, कै.मधुकर भावसार, श्री.तानाजी भोईटे वगैरे अनेक दैनंदिन शाखेत येत असत.
 
२१ जुन १९७५ ला बालु झारे याचा विवाह नंदुरबार येथे झाला. त्यादिवशी हिंदूसाम्राज्यदिन उत्सव होता. नानाराव ढोबळे नंदुरबार उत्सवाचे प्रमुख वक्ते होते. लग्नानंतर १४ व्या दिवशी ४ जुलैला बालूला संघावर बंदी आल्यामुळे स्थानबध्द करण्यात आले.१९७७ च्या वर्षप्रतिपदेला सुटका करण्यात आली. मा.डॉ.अविनाश आचार्य जिल्हा संघचालक होण्याअगोदर कै.ब.ह.पळशीकर (वकिल) जिल्हा संघचालक होते व शहर संघचालक कै.रामभाऊ धर्माधिकारी (वकिल) होते. बालू दोन्ही संघचालकांचा निजी कार्यवाह होता. त्यांच्या घरी जाऊन संघाची शहरातील व जिल्ह्यातील माहिती देण्याचे काम बालू करत असे.
बालूला व्यवसायात संघर्ष करावा लागला. टाईपरायटींग क्लास मधे फी पासून मिळणाऱ्या उत्पन्नात भागत नसे, त्यामुळे जॉब वर्क करावा लागे. बालू ६.३० वर्षे तहसील कार्यालयासमोर ऊन, थंडी, पावसाची पर्वा न करता रस्त्यावर टाईपींगचे जॉबवर्क करत असे. पुढे बालूचा उदय टाईप रायटींग क्लास रामानंद नगर मधे स्वतःच्या जागेत शिफ्ट झाला.

रामानंदनगर मधे घर बांधले त्यामुळे घरामधे टायपींग क्लासची सोय करता आली. रामानंदनगर मधे घर बांधल्या मुळे व क्लास घरातच असल्यामुळे बालुच्या जीवनास स्थिरता मिळाली. बालूस तीन मुले स्वानंद, हर्षद, योगानंद. तिन्ही मुलांचा सांभाळ करुन विद्यावहिनी संसारात बालूस मदत करीत असत. बालूच्या भाग्यात सांसारिक सुख कमीच होते. ५ डिसेंबर १९९६  ला विद्या वहिनींची तब्येत अचानक गंभीर झाली व त्यातच त्यांचे निधन झाले. तीन मुले व व्यवसाय सांभाळायची  जबाबदारी बालूवर आली. बालूच्या जीवनात बरीच संकटे आली पण धैर्याने त्याने तोंड दिले. बालूची स्मरणशक्ती तीव्र होती. तसेच विनोदी स्वभावामुळे अनेक मित्र जवळ आले. गीतेतील अनेक श्लोक त्याचे मुखोदगत होते, संस्कृत सुभाषितांचा योग्य ठिकाणी वापर करायचा. शांत स्वभावाचा व सगळ्यांप्रती समत्व भाव ठेवणारा स्वभाव होता. मला जाणवलेला बालू हा स्थितप्रज्ञ होता. 

गोंदवलेकर महाराज, संत सज्जन व सामान्य माणसात फरक करतांना म्हणत, सामान्य माणुस संसारात माया, ममता, संपत्ती या मोहात लिप्त "असतो." संसारात अडकलेला असतो. संत सज्जन माणुस संसार करतांना "दिसतो." परंतू माया, ममता, संपत्ती या मोहात लिप्त होत नाही. आमच्या सारखे सामान्य लोक हे "असतो" या गटात संसारात लिप्त असतात, बालू झारे "दिसतो"या गटात संसारात राहून अलिप्त होता. गोंदवलेकर महाराजांनी सुंदर वर्णन संत, सज्जन व सामान्य माणसांचे वर्णन "असतो" व "दिसतो" च्या माध्यमातून केले आहे.

जानेवारी २०१७ हा महिना झारे कुटुंबीयांना अत्यंत क्लेश देणारा होता. जलोदराचा आजार बालूस झालेला होता. या आजारातून बाहेर येण्याची शक्यता वाटत नव्हती. बालूची तिन्ही मुले व सुन सौ.प्रीती बालूची काळजी घेत. स्वानंदने डॉ. हेडगेवार रुग्णालयात दोन वेळा बालूस उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या काळात आम्ही मित्रमंडळी बालूस भेटायला जात असतांना तो आजारा व्यतिरिक्त गप्पा मारत असे. चेहऱ्यावर कोणतीही काळजी अगर दुःख नसे. मृत्यू केव्हाही येऊ शकतो, त्याचे स्वागत करायला तो तयार होता. अखेर ती वेळ आली २७ एप्रिल २०१७ रोजी त्याला देवाज्ञा झाली. आमच्या या स्थितप्रज्ञ मित्राची उणीव आम्हाला नेहमीच जाणवते.

-----------------

बाळासाहेबांचे नातलग व मित्रपरिवाराचे मनोगत 

श्री.परशुराम ( उर्फ मधुकरराव ) झारे.

नमस्कार मी परशुराम झारे, मला आज  माझ्या धाकट्या भावा बद्दल चार शब्द  लिहायला मिळाले हे माझे भाग्य समजतो. माझं माझ्या भावा वर खूप प्रेम होते आणि तो जरी आज आमच्यात नसला तरी अजूनही त्याच्यावर निस्सीम प्रेम आहे, पण जे प्रेम माझे आहे तितकेच प्रेम त्याचे माझ्यावर होते. अतिशय शांत स्वभाव, कधीही, कोणावरही तो ओरडून बोललेला मला आठवत नाही. कधीही चिडचिड नाही, कधी कोणाला अपमानास्पद वागणूक नाही. मला कधीही अप्पा ने अंतर दिले नाही. आमचे संबंध प्रेमाचे होते, आपुलकीचे होते. मला आठवतं माझ्या लहानपणी माझा एक शान्ताराम नावाचा भाऊ होता. तो आणि मी गोवर या आजाराने आजारी पडलो, त्यात तो माझा भाऊ वारला. नंतर मला सलग तीन बहिणी झाल्या आणि मग ह्या तीन बहिणींनंतर मला हा भाऊ म्हणजे बालू झारे झाला. मी त्या वेळेस ५ वी त होतो. Have one brother अस सांगण्या मधे मला फार आनंद होत असे. माझा पाठचा भाऊ हा नेहमी आयुष्य भर माझ्या पाठीशीच राहीला. मी त्याला संघात जा म्हंटले तर तो संघातच राहीला. तो देशपांडे यांच्या क्लास ला टायपिंग शिकण्यासाठी जाणार होता, मी त्याला म्हटलं आपणच टायपिंग क्लास काढू. त्या प्रमाणे उदय टायपिंग क्लास सूरु झाला आणि त्या टाइपिंग साठी क्लाससाठी त्याने मेहनत पण घेतली आणि त्याने त्याचे घर सावरले. त्याच्या अनेक आठवणी अजूनही आहेत. त्या आठवूनच माझा जीवन प्रवाह चालू आहे. अजूनही वाटते तो जवळच आहे.
------------

सौ.प्रीती स्वानंद झारे

आप्पा म्हणजे सपोर्ट सिस्टीम. आप्पा म्हणजे विश्वास. आप्पा म्हणजे एखादी गोष्ट खूप शांतपणे समजून घेणं. आप्पा म्हणजे सगळ्यांशी पटणं आणि आप्पा म्हणजे हक्काचं आपलं माणूस असणं ! खरंच लग्नानंतर जेव्हा सून म्हणून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांनी खूप मनापासून स्वागत केलं. नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी मला खूप वेळ दिला. आकाशवाणीला मी ड्युटी करायला जायचे, माझं प्रशिक्षण असायचं त्या ही वेळेत आप्पांनी प्रत्ययला खूप छान पद्धतीने सांभाळल. आणि म्हणूनच मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करू शकले. आजपर्यंत कोणत्याही सासऱ्यामध्ये आणि सुनेमध्ये इतकं निर्मळ, इतक दिलखुलास नातं असेल असं माझ्या तरी पाहण्यात नाही. आम्ही दोघे अनेक विषयावर चर्चा करायचो. ते मला वडीलांसारखेच होते. एकदा तर त्यांच्या एका विद्यार्थिनीने सरळ त्यांना विचारलं... तुमची मुलगी सासरी नांदत नाहीये का? ती तर तीन महिन्यांपासून तुमच्याकडेच आहे.. आप्पांनी हसून तिला सांगितलं की ही माझी सून आहे आणि हीच माझी मुलगी. त्यांच्यातला सहनशीलपणा फार प्रभावी होता. ते कायमच माझा आधार बनले. कुठेही लग्नकार्यात आम्ही दोघे आवर्जून जात असू. त्यांना माणसं जोडण्याची कला अवगत होती. ते आम्हा सर्वांचे सुपर कॉम्प्युटर होते. ज्यात अनेक लोकांची माहिती फीड केली होती. एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून मला आप्पांनी योग्य तो न्याय दिला... आणि आमचे नाते वडील मुलीचे गुंफले गेले.
----------

श्री.स्वानंद उमाकांत झारे

माझे वडील म्हणजे आम्हा सर्वांचे अप्पा..
लहानपणा पासूनच त्यांचाशी होणाऱ्या गप्पा हे एक आमच्या नात्यातील वैशिष्ट्य होते. शेजारी खांबेटे आजींकडे मी न चुकता टि.व्ही.वरील संध्याकाळ च्या ७ च्या बातम्या ऐकत असे आणि नंतर अप्पांना जावून सांगत असे... प्रत्येक वेळेस त्या बातमीचा पूर्व इतिहास ते सांगत असत त्यामूळे सहजतेने त्या बातमीची समिक्षा योग्य शब्दात समजत असे... निवडणूकीच्या काळात आम्हा लहान मुलांना काही समजत नसे पण त्यांनी कधीही अतिशयोक्ती किंवा फसवी भविष्यवाणी करीत नसत. त्यांचा तो स्वभावही नव्हता.. व्हि.पी सिंग सरकार पडले ही बातमी रात्री उशिरा आकाशवाणीवर ऐकली त्यावेळेस आता काय होईल असं मी विचरल्यावर ते म्हणाले कॉन्ग्रेस सरकार बनवेल आणि चरणसिंग यांच्या सरकारसारखे ३-४ महिने सरकार चालेल आणि मग निवडणूक होईल.. आणि तसंच झाले. आम्ही रामानंद नगरला रहायला गेलो तेव्हा रात्री उशिरा सायकलवर डबलसीट घरी येतांना आई उशीर झाला म्हणून वाट पहायची आणि आम्ही रस्त्याने गप्पा मारीत येत असू.. आर्थिक विवंचना होती पण कधी त्या चिंतेचा परिणाम आमच्या गप्पांवर होत नसे. अकरावी ला असल्यापासून मी गावातल्या क्लासला सकाळी लवकर यायचो. टायपिंग क्लास मधील विद्यार्थी संख्या कॉम्प्युटरच्या आकर्षणामूळे खूपच कमी झाली होती. पण टायपिंग ची कामे घेवून गि-हाईक येत असत. मी पण ती कामे टाईप करीत असे. त्यावेळेस ते त्यांच्या शैलीत सूचना देत असत. ग्राहकाचा अर्ज समजून घेवून योग्य शब्दाने अर्ज टाईप करायचा, शेवट नीट करायचा.. रि टाईप करायचं नाही..आपण टाईप करुन विसरुन जायचे. या सूचना अशा मनःपटलावर कायमच्या कोरल्या गेल्या.

माझी आई आणि त्यांचं नातं खूप वेगळं होतं. आई खूप काळजी करायची कसं होईल आपलं. कर्ज कसं फेडू आपण आणि अप्पा तिला नेहमी हिंमत द्यायचे. सगळं ठिक होईल काळजी करु नकोस. त्यांचा एकदा तारखेने व आईचा तिथीने वाढदिवस एकाच दिवशी आला होता. त्या दिवशी आम्ही पेढे घेतले गावातून येतांना तेव्हा ते म्हणाले होते की आजचा दिवस जरा विशेष आहे. आज आमचा दोघांचा वाढदिवस आहे. त्यांच्या सगळं नेहमी लक्षात असायचं. सकाळी चहा पिताना आज कुणाचा वाढदिवस आहे ते सांगून, सहजतेनं त्याचे स्वभाव वैशिष्ट्य सांगायचे. संघ कार्यातील अनेक संदर्भ ते सहजतेने देत असत. मी जिल्हा कार्यवाह असताना या संदर्भांचा चांगला उपयोग तेथील संघकार्याचा विचार करताना नेहमी होत असे.
प्रवासाला जात असतांना तिथली एखादी आठवण ते आवर्जून सांगत असत.

आईच्या आजारपणात अगदी सर्व मदत अप्पा तिला करीत असत. आई अल्पशा आजाराने गेल्यानंतर अप्पांनी आम्हाला कमी शब्दात जे समजवलं.. "आता या रथाचे एक चाक निखळलं आहे..दुसरं चाक बसविण्याचा प्रश्नच नाही..पण त्यामूळे या रथाची गती कदाचित कमी होईल पण या एका चाकावर हा रथ चालेल..भरकटणार नाही.." आणि हे त्यांनी पुढे २१ वर्ष सांभाळलं.
लग्नानंतर २१ वर्ष आईसोबत आणि तेवढीच २१ वर्ष तिच्या शिवाय त्यांनी तितक्याच ममत्वाने आम्हाला सांभाळलं.

मला १९९७ ला नांदेड जिल्ह्यातील निवघा येथे युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी लागली. अप्पा मला सोडायला निवघ्याला आले तिथे सर्वांशी आस्थेने परिचय करुन घेतला. त्यांच्या त्या सोबत येण्याने वयाच्या १९ व्या वर्षी मिळालेलं मनोबल आणि अनोळखी परिसर असून सुध्दा एक विश्वास मिळाला. त्यांच्या स्वभावातील सहजता आणि सकारात्मकता याची ताकद मोठी विलक्षण असते याची अनुभूती मला त्यावेळी मिळाली. दोन दिवसांनी मी त्यांना नांदेड स्टँडवर गाडीत बसविल्यावर आपल्या मुलाला घरापासून लांब सोडून जातांना त्यांचा गलबललेला व काळजीची लकेर उमटलेला चेहरा एकदाच बघितला आणि त्यामूळ तो अजूनही डोळ्यासमोर आहे न बोलता मला माझ्या नवीन जबाबदारीची जाणीव त्यांनी करुन दिली.

माझ्या लग्नानंतर एक वेगळे अप्पा बघायला मिळाले. प्रिती सून म्हणून असण्याऐवजी त्यांची मुलगी म्हणूनच नेहमी त्यांच्यातील संवाद असायचा. मी संघ, बँक या धावपळीत असतांना हे दोघे गाडीवर नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तू, घरातील आवश्यकता हे अप्पांनी सहजतेनं केलं. प्रितीचे आकाशवाणी वरील कार्यक्रम न चूकता कौतुकाने ऐकायचे. तिच्या बाळांतपणात कधीही आईची उणीव भासू दिली नाही. तिचे सगळे डोहाळे आठवणीनं पुरवले. अजूनही त्यांच्या स्मरणाने कित्येकदा प्रितीचे डोळे पाणावतात.

लग्नानंतर लगेच आणिबाणीतील कारावास. कौटुंबिक अडचणी, आर्थिक विवंचना, व्यवसायातील स्थान बदल-तहसिलदार कार्यालयाजवळ एका झाडाखाली कामे करणे, माझे लग्न, पुन्हा थोडी स्थिरता-नातवंडाचे लाड, आणि तब्येत खालावत असतांनाही सुख दुःखाचे क्षण समत्व भावाने झेलणारा अनासक्त योगी असल्यासारखं जगणं आणि तसं थोडे लवकरच निघून जाणं.
--------------

श्री. हर्षद उमाकांत झारे

आप्पा मातृ-पितृ भक्त होते, तसेच वडिलबंधू श्री.परशुराम काशिनाथ झारे यांच्यावर त्यांची अतिशय श्रध्दा होती व त्यांच्यामुळेच मी संघ शाखेत जाऊ लागलो असे ते सांगत असत. तसेच प्रत्येक बाबतीत वेळोवेळी वडीलबंधूंकडून मार्गदर्शन घेत असत.

   आली जरि कष्ट दशा अपार
   न टाकती धैर्य तथापि थोर ।
   केला जरी पोत बळेचि खाली
   ज्वाळा तरि ते वरती उफाळी ।।

४९ वर्षे आप्पांनी टायपिंग क्लास चालविला, व्यवसाय करत असतांना चढ उतार हे आलेच, व्यावसायिक स्पर्धा, संघर्ष हा व्यावसायिकाला करावाच लागतो, परन्तु या संकटांचा सामना त्यांनी न डगमगता अतिशय धैर्याने केला व साडेसहा वर्षे तहसिलदार कार्यालयासमोर रस्त्यावर बसून टायपिंगची कामे केली. ते म्हणत असत की- चोरी, चहाडी व लबाडी याची लाज वाटली पाहीजे, कष्ट करून, श्रम करून धनार्जन करण्यास कशाला लाज बाळगावी ?

आमच्या आप्पांची संघनिष्ठा अत्यंत बळकट होती, त्यांच्यासमोर जर कोणी संघाबद्दल अपशब्द काढले तर ते सांगत असत की- हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. स्वतः मध्ये सुधार करा. 'अपना सुधार देश की सबसे बडी सेवा है'. संघ कार्याबद्दल ते म्हणत असत की नराचा नारायण करणारी अशी संघाची संस्कारप्रद कार्यपध्दती आहे. संघाचे कार्य हे ईश्र्वरी कार्य आहे व ते "तन मन धन" पूर्वक करायचे असते. संघकाम हे प्रसिध्दी पराङ्गमुख आहे, तसेच कुठल्याही पदाची लालसा न बाळगता असंख्य निष्ठावान संघ स्वयंसेवक राष्ट्राकरीता "आम्ही असू सुखाने पत्थर पायातीलं" या भावनेने आपल्यावर सोपविलेले दायित्व पार पाडत असतात.

जरि नंतरच्या काळात ते प्रत्यक्ष संघकामात नव्हते, तरि त्यांचे दिवसभरातील आचरण हे- संघाला जसा आदर्श स्वयंसेवक अपेक्षित आहे, असेच होते. आप्पा भगवद्गीता भक्त होते, तसेच नित्य सायंकाळी रामरक्षा व भीमरूपि स्तोत्र म्हणत असत.

     यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
     स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।।

श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात, तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व जनसमुदाय वागू लागतो. संघ संस्कार झालेली, विपरीत परिस्थितीत देखील संघकार्य केलेली व पूर्वजांनी आखून दिलेल्या धर्ममार्गावर आयुष्यभर चाललेली ही असंख्य देवमाणसे म्हणजे संघाच्या ओंजळीतील अनमोल "मौक्तिक" आहेत. ही देवमाणसे ज्या वाटेवर चालली, त्या वाटेवर उमटलेली त्यांची पाऊले, ही नुसती पदचिह्ने नसून आपल्यासाठी पथप्रदर्शक अशी सुवर्ण पाऊले आहेत.
------------

श्री. योगानंद उमाकांत झारे

श्री. उमाकांत काशिनाथ झारे हे माझे वडिल, घरात आम्ही त्यांना 'आप्पा' म्हणायचो. आई गेल्यापासून आप्पांनी माझ्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली, कितीही मोठे संकट आले तरी डगमगायचे नाही, निराश व्हायचे नाही, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवायचा. स्वतःला स्वतः सूचना द्यायच्या, कोणत्याही प्रकारचा लोभ ठेवायचा नाही. मला कोणीतरी मदत करेल, मला कोणीतरी सहकार्य करेल, अशी अपेक्षा ठेवायची नाही. योगू ! तू घरामध्ये लहान आहेस, मोठ्यांच्या बोलण्याचा राग मानून घेऊ नये, आपल्यातला आळस दूर करावा आणि चुका दुरुस्त कराव्या, स्वावलंबी व्हा. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या अडचणी स्वतः प्रयत्नाने दूर केल्या पाहीजे, आपल्यामुळे लोकांना आधार वाटला पाहिजे. स्वतःला ओळखा, स्वतःबद्दल कठोर आणि दुसऱ्याबद्दल सहानुभूति असा आप्पांचा स्वभाव होता. "जो दुसऱ्यावरी विसावला त्याचा कार्यभाग संपला, जो सवेची झगडत राहिला तोची भला". या समर्थ उक्ती प्रमाणे आत्मविश्वासपूर्ण आणि आत्मनिर्भर असे आमचे आप्पा आम्ही कधीही विसरु शकत नाही.

कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार आपल्या मनाने करु नये, सकारात्मक विचार करावा, माणसाच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण ही परमेश्वराने दिलेली एक नवीन संधी आहे, त्याचा आपण सदुपयोग करावा, दुरुपयोग करु नये, असेही आप्पा आम्हाला सांगत. काळ काम आणि वेग या संदर्भात तरुणांनी दक्ष राहावे, असेही आप्पा सांगायचे. सदैव आपले आत्मसंतुलन आणि विवेक जागृत ठेवावा हे आम्ही आप्पांकडून शिकलो.
------------


श्री. अजित सदाशिव मेंडकी

 कै. श्री.बाळासाहेबांची व माझी ओळख मी कॉलेज च्या  पहिल्या वर्षी असतांना झाली. तशी शाळेत असतांना त्यांची ओळख होती पण ती जुजबी होती. पण साधारणतः १९६९ साला पासून कॉलेज चा अभ्यास करायला व झोपालाही संघ कार्यालयात मी जात असल्याने त्यांच्याशी झालेली मैत्री इतकी घट्ट झाली की ती त्यांच्या मृत्यू पर्यंत कायम राहिली व आजही त्यांची आठवण आली नाही असा एकही दिवस जात नाही. बाळासाहेब झारे म्हणजे एक आदर्श स्वयंसेवक होते. अत्यंत शांत आणि संयमी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. स्वतःच्या अडचणी, दुःखे कोणालाही न सांगता किंवा कोणासमोर साधे व्यक्त ही न करता समोरच्याला नेहमी मदत, सहकार्य करण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असत. ह्याच त्यांच्या गुणामुळे संघाच्या तसेच त्यांच्या नातेवाईक परिवरामध्ये सर्वाना ते हवेहवेसे वाटत होते.

संघ प्रचारक रात्री वेळी अवेळी प्रवास करून कार्यालयात येत असत त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून बाळासाहेब लग्नाअगोदर सुमारे 10 वर्षे रोज रात्री कार्यालयातच झोपत असे. एक साधी सतरंजी व शाल हेच त्यांचे अंथरूण असे. झोपण्या अगोदर कार्यलयाची स्वच्छता, ताजे पाणी भरून ठेवणे इ. कामे ते आवर्जून करीत असत.

आम्ही कॉलेजचा अभ्यास संघ कार्यालयातच करत असू व तेथेच मुक्काम असायचा. एकदा परीक्षेच्या दिवसात रात्री दोन अडीच वाजता अभ्यास सुरू असताना आम्हाला चहा पिण्याची तल्लफ आली. पैसे मात्र कोणाजवळ नव्हते. आम्ही बाळासाहेबांना उठविले. त्यांच्या जवळ सुद्धा त्यावेळी पैसे नव्हते. परंतु आमच्या वरील प्रेमा पोटी ते एव्हढ्या रात्री आम्हाला घेऊन त्यांच्या टायपिंग क्लास मध्ये गेले. क्लास उघडून त्यांनी तेथे असलेले १० रुपये काढले आणि आम्हाला रेल्वे स्टेशन वर नेऊन चहा पाजला. त्यावेळी १० रुपयाला खूप किमत होती.

राग, संताप, चिडणे हे शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्येच नव्हते. लग्नानंतर १०-१२ दिवसातच त्यांना "MISA" खाली अटक झाली. त्यांच्या नंतर ६ महिन्यांनी मला पण अटक झाली. नासिक कारागृहात सोबत असतांना मी नवविवाहित आहे याची पुसटभर सुद्धा जाणीव त्यांनी सोबतच्या मिसा बंधूंना होऊ दिली नाही. खरोखरच मनाचा खूप मोठा निग्रह लागतो अश्या गोष्टींना. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे अश्या ह्या अजात शत्रू माणसाची आठवण येणे कारण ती विसरता पण येत नाही आणि त्या व्यक्तीला ती परत पण देता येत नाही. स्वर्गीय बाळासाहेब झारे यांच्या पवित्र स्मृतीस माझे त्रिवार अभिवादन.
------------


श्री.प्रमोद पंडितराव कुळकर्णी 

कै.श्री.बाळासाहेब झारे हे नांव घेतलं की एक शांत आणि  संयमी मूर्ती डोळ्या समोर उभी रहाते. यांचा सहवास आम्हाला साधारण ३० वर्ष लाभला. या ३० वर्षात ते कधीही रागावलेले दिसले नाहीत. त्यांनी आम्हाला खुप सांभाळून घेतले. आम्ही रात्री संघ कार्यालयात एकत्र जमायचो तेंव्हा तेचआमचे अन्न दाता असायचे त्यांनी अनेकांना सढळ हाताने मदत केली. ते आजारी असतांना आम्ही अनेक वेळा त्यांना भेटायला त्यांच्या घरी जायचो. सगळ्यांची जन्म तारीख त्यांच्या लक्षात असायची. सगळ्यांना ते योग्य मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या बद्दल सगळ्यांना एक आदर युक्त भिती आणि  प्रेम पण होते. असे आपल्या सगळ्यांचे बाळासाहेब आपल्याला दिनांक २७.०४.२०१७  ला सोडून पुढील प्रवासाला निघून गेले. त्यांची उणीव खूप भासते. त्यांचा सारखा मित्र या जन्मात तरी मिळणार नाही. त्यांच्या पवित्र आत्म्यास त्रिवार नमन.     
--------------

श्री.अविनाश विश्वनाथ पंडित 

बाळासाहेब झारे, नमस्कार! 
प्रत्येक पिढीच्या वाट्याला काही चांगले ग्रहयोग असतात. आमच्या कुंडलीत उन्मुक्त मोकळेपणा, मित्रांचा भरघोस सहवास आणि  मित्रांचा एकमेकांवर  अधिकार हे आनंद ग्रहनक्षत्रांनी भरभरून वाटले होते. मोबाईल लॅपटॉप्स तर दूर तेव्हा टेलिव्हिजन सुद्धा नव्हते. रेडिओ सुद्धा गल्लीत एखाद्याच्या घरी असायचा. बिनाका गीतमाला आणि क्रिकेट टेस्टमॅचची कॉमेंट्री ऐकायला घोळका असायचा. असंख्य उणिवा होत्या पण उणिवांचे उत्सव मित्रांच्या सहवासात होत असत. मला आठवतंय दीपक च्या दुकाना समोर एका स्टुलवर ट्रान्झिस्टर ठेवलेला असायचा आणि कॉमेंटरी ऐकायला, हातात धोपटणं सुद्धा न घेतलेल्या एक्सपर्टचा घोळका असायचा. तीन जणात एक कप चहा मागवला जायचा. तेथेच बाळासाहेबांची भेट झाली. ओळख आधीपासूनच होती पण घट्ट मैत्री तिथेच झाली. वास्तविक मैत्री होण्या इतके आम्ही समवयस्क नव्हतो पण कोणत्याही वयोगटात सहजपणाने मिसळण्याचा स्वभाव हा त्यांचा ईश्वरदत्त गुण होता. त्यामुळे सारंग मेलग, अजित मेंडकी, प्रमोद कुलकर्णी दीपक घाणेकर आणि मी अश्या अत्यंत विसंगत स्वभावाच्या खुशालचेंडू समूहात  बाळासाहेब  *बालू* म्हणूनच प्रसिद्ध झाले. अत्यंत शांत स्वभाव, प्रचंड सहनशीलता आणि कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्यावरचे त्यांचे निर्मळ हास्य आठवले की त्या आठवणीने आपसूक डोळे भरून येतात. मार्गदर्शक, मध्यस्थ,आणि प्रोत्साहन देणारा असा मित्र आम्हाला लाभला होता. 

आम्ही बेरोजगार असताना चहाचे भेळ पाणीपुरीचे पैसे कधी दुकानदार दीपक  आणि इतर वेळेस बाळासाहेब करत असत. काळ पुढे जात असतो. आपला प्रभाव दाखवत असतो. प्रत्येकाच्या मानेवर जबाबदारीचे नांगर येतात. प्रत्येक जण आपापल्या प्रपंचात गुंतत जातो. पण बाळासाहेबांना  ऐन तारुण्यात प्रपंचात एकटेपणाचे दुःख सहन करावे लागले. पदरी लहान वयातली मुलं त्यांचे संगोपन, टाइपिंग क्लासचा व्यवसाय, संघ कार्यात एकनिष्ठता. ह्या सगळ्या गोष्टींचा तोल त्यांनी कसा सांभाळला ह्याची कल्पनाही करवत नाही. सोशिकपणाची परीक्षा बघणाऱ्या नियतीने कितीतीही दुष्टपणा दाखवला तरी बाळासाहेबांनी आपल्या अलगद हातांनी प्रत्येक आघात सोसला. आपल्या मुलांना त्याची झळ लागू दिली नाही. अर्थात दैव सुद्धा इतके कठोर नसते. कधीतरी पाठीवरून मायेने हात फिरवतेच. बाळासाहेबांच्या कष्टाची आणि एकटेपणाने पार पडलेल्या जबाबदारीची जाण मुलांनी पुरेपूर ठेवली. सून खऱ्या अर्थाने मुलगी झाली. मुलीचे भरभरून प्रेम दिले. काळजी घेतली आणि बाळासाहेबांना उतारवयात समाधानी तृप्त क्षण उपभोगता आले. बाळासाहेबानी कधीही कोणाशीही स्पर्धा केली नाही. कोणतीही अनाठायी लागभाग करून स्वतःचे महत्व दाखवण्याचा आटापिटा केला नाही. ते खऱ्या अर्थाने एखाद्या फुलातल्या परागकणासारखे निरागस होते! त्यांचे वर्णन करण्याची माझी क्षमता नाही. तसेच त्यांची उणीव भरून काढण्याची क्षमता काळात सुद्धा नाही. बाळासाहेबांची आठवण झाली की कविवर्य बा. भ. बोरकरांच्या ओळीं हाजेरी लावतात.

नाही पुण्याची मोजणी नाही पापाची बोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग...

आदरणीय बाळा साहेबांच्या स्मृतीला सविनय वंदन.
-------------

श्री. मुकुंद त्र्यंबक जोगदेव

माझा व आपल्या सर्वांचा मित्र स्व.श्री. उमाकांत ऊर्फ बाळू झारे माझ्यापेक्षा वयाने मोठा असून सुद्धा आमच्यामध्ये अरे-तुरेचे संबंध केव्हा निर्माण झाले, ते कळलेच नाही. साधारणपणे, मी तरुण असताना आमची ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर जवळचा मित्र, ते मोठा भाऊ, अगदी घरातलाच एक, याप्रमाणे संबंध निर्माण झाले.

श्री. बाळासाहेब झारे यांचा स्वभाव म्हणजे अतिशय प्रेमळ, मनमिळावू, सगळ्यांना (बाल असो, तरुण असो, की वयस्कर) आपलेसे करणे; हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे गुण होते. तसेच विनोद बुद्धी, स्मरणशक्ती ठासून भरलेली होती. सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, त्यांच्या अगदी स्पष्टपणे लक्षात असायचे. त्या दिवसा आधी भेट झाल्यास, अवश्य त्याविषयी आठवण करून देत असत. खूप जुन्या गोष्टी, राजकारणात कोण कधी जिंकले कोणाला हरवले, सगळे लक्षात ठेवत असत. ते म्हणजे ऐतिहासिक आणि राजकीय घडामोडींची जणू डिक्शनरीच होती. 

संघ कार्यात विजयादशमी उत्सवासाठी मैदानाची आखणी, प्रात्यक्षिकात अग्रेसर, संचलनात अग्रेसर, संचलन गीत, इतर उत्सवांत प्रार्थना सांगणे, इत्यादी वेळी त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. 

माझ्या वैयक्तिक आयुष्यात आनंदाची वेळ असो किंवा दुःखाचा प्रसंग, त्यांची उपस्थिती नेहमी एखाद्या जवळच्या नातलगाप्रमाणे असायची. आमचे तीर्थरूप बाबा यांच्या मृत्यू दिनी, रात्रभर आमच्या सोबत बसून त्यांनी आम्हाला मानसिक आधार दिला. त्यांचे, चिता आणि चिंता करू नये, असे नेहमी सांगणे असायचे. चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला; हे त्यांचे बोल माझ्या कायम स्मरणात स्मरणात राहतील.

 सन २०१५ पासून माझे पुणे किंवा बेंगलोर येथे जाणे असायचे. गावी जाण्यापूर्वी किंवा आल्याबरोबर मी त्यांची घरी जाऊन भेट घेत असे घरी जाऊन भेट घेत असे. परंतु मी बेंगलोर मुक्कामी असतानाच श्री बाळासाहेब झारे यांचे देहावसान झाले, त्यामुळे त्यांची अंतिम भेट होऊ शकली नाही ह्याची अजून मनामध्ये खंत आहे. ईश्वरेच्छा बलियसी. 


©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या