अंध:काराची काजळी दूर करणारा दिवस - दीप अमावस्या

आज आषाढ अमावस्या. ह्या अमावस्येला 'दीप अमावस्या' असेही म्हणतात. आजच्या दिवशी घरातील सर्व दिवे आणि पुजेचे साहित्य स्वच्छ करून ठेवायाचे असते व दिवा दीप प्रज्वलन करायचे असते. 

समस्त मानवजातीला सहाय्यक असणाऱ्या वस्तू, प्राणी, पक्षी या सर्वांप्रति ज्याप्रमाणे वटपौर्णिमा, बैल पोळा, गोकुळ अष्टमी, तुलसी पूजन, नाग पंचमी या दिवशी कृतज्ञ भाव व्यक्त केला जातो. त्याचप्रमाणे मानवजातीला अंधकारापासून दूर नेऊन प्रकाश देणाऱ्या सूर्य, दिवे, दीप, पणती, समई अश्या सर्व दिव्यांचे पूजन केले जाते. 

अमावस्या म्हटले की, अंधाराचा दिवस. चंद्राच्या सर्व कला एका कलेत लुप्त होण्याचा दिवस. अमावस्या ही तमोगूणप्रधान मानली जाते. कारण सत्वगुणांचा आश्रय असलेली चंद्रकिरणे आज पूर्णपणे लुप्त झालेली असतात. अग्नी हे तेजाचे व सत्वगुणाचे प्रतिक आहे. अमावस्येला पसरत असलेला तमोगूण आज दिव्याच्या सत्वगुणामुळे नाश पावत असतो. म्हणून आजच्या दिवशी दीपप्रज्वलनाचे अत्यंत महत्त्व आहे.

लहानपणी रोज सायंकाळी घरातील वडीलधारे लोक आपल्याला देवासमोर उभे करून दिव्याची प्रार्थना करायला लावत असत.

शुभंकरोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।
शत्रूबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोsस्तुते ।।

सायंकाळी म्हटल्या जाणाऱ्या ह्या श्लोकाचा अर्थही तितकाच सकारात्मक आहे. शुभ करणाऱ्या, कल्याणप्रद, आरोग्यदायक, धनसंपदा मिळवून देणाऱ्या आणि शत्रूबुद्धीचा नाश करणाऱ्या दीपज्योतीला मी नमस्कार करतो, असा अत्यंत सकारात्मक अर्थ ह्यात सामावलेला आहे.

अमावस्येनंतर चातुर्मास सुरू होतात. चातुर्मासात देवपुजनाचे, उपासनेचे व भक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून चातुर्मास सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच दिवे आणि पुजेचे साहित्य यांची साफसफाई करून ठेवली जाते. 

दीपप्रज्वलन केल्यानंतर दिवा जमिनीवर ठेवू नये असा नियम आहे. दिवा ठेवण्यासाठी एखादा ओटा असावा. दीप हा ज्ञानाचे प्रतिक आहे. दीपामुळे जसा अंधार नष्ट होतो तसे ज्ञानामुळे अज्ञान नष्ट होते. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीपु उजळी ।।"

आजची दीप अमावस्या सर्वांना आरोग्य प्रदान करणारी, धनसंपदा देणारी आणि शत्रूबुद्धीचा विनाश करणारी असो.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या