प्रा.एस.टी. जोशी सर यांना विनम्र - भावसुमनांजली
"अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया ।
चक्षुरू न्मीलितं येन तस्मै श्री गुरुवै नम: ।।"
@ प्रा. डॉ. सौ. व्ही. व्ही. निफाडकर
ऋषितुल्य जीवन जगलेल्या प्रा. एस. टी. जोशी सरांवर इतक्या लवकर मृत्युलेख लिहून श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल असे आम्हा कार्यकर्त्यांच्या कधी ध्यानीमनीही नव्हतं आजचा दिवस हा सर्वांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असावा अशी नियतीची इच्छा असली तरी आमच्या म्हणजे सरांच्या सतत सान्निध्यात राहणाऱ्या आणि ज्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अक्षरशः घडवले उज्वल भविष्याची प्रेरणा दिली अनेक विद्यार्थी त्यांच्या तप:पूत जीवनातून घडवले अशा आम्हा असंख्य प्रियजनांची या आकस्मिक आघाताने सैरभैर अवस्था झाली आहे. त्यामुळे हे श्रद्धा सुमन भावांजली वाहतांना स्थलकालाच्या चुका होण्याची शक्यता बरीच आहे. कारण सरांचे कर्तृत्व, त्यांचे प्रेरणादायी जीवन, अध्यात्मिक साधना एका लेखात मांडणे म्हणजे आकाशाला कवेत घेणे आहे, पण त्यातला भाव आणि प्रेम महत्वाचं!
सरांनी मला बीएड, एमएड, पीएचडी या अभ्यासक्रमांना केवळ नव्हे, तर आयुष्यभर मार्गदर्शन केलं हे आमचे मित्र तत्वज्ञान आणि मार्गदर्शक होते, म्हणून त्यांचा उल्लेख सर असाच होणार आहे.
सर मूळचे पारोळ्याचे राहणारे आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे कुटुंबात त्यांचा जन्म झाला घरात लक्ष्मीचा नाही तरी सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला होता. मातृछत्र लहानपणीच हरवलेलं, अशा अनेक समस्यांमधून वाट काढत सरांनी आपले शिक्षण पूर्ण करून प्रथम गिंदोडिया हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर एम एड पूर्ण करून धुळे एज्युकेशन सोसायटीच्या बीएड कॉलेजमध्ये पहिली काही वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी करत प्राचार्य पदापर्यंत पोहोचले आणि शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले प्राचार्य म्हणून प्रदीर्घ सेवा केली. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक, भावनिक आधार देऊन जीवनात समर्थपणे उभे केले.
कुठलेही काम असो विशेषतः सामाजिक हिताचे काम करताना त्यांनी कुठल्याही परिणामांचा ऐहिक सुखाचा विचार केला नाही. संघ स्वयंसेवकांच्या झोकून देऊन काम करण्याचा गुण त्यांच्या रक्तातच असल्याने कार्यकर्ते जोडणी त्यांना कामाला लावणे आणि कार्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणे हे त्यांचं अंगभूत वैशिष्ट्य होतं. समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेली संघटकाची सर्व सूत्रे गुणवैशिष्ट्ये त्यांच्यामध्ये होती. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली तरी त्यानंतर जिल्हा कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. आज संघाचे सध्याचे मा. सरकार्यवाह श्री भैयाजी जोशी हे धुळे येथे जिल्हा प्रचारक असताना त्यांच्यासोबत सरांनी जिल्हा कार्यवाह म्हणून काम केले होते. संघाच्या मुशीतून तयार झाल्यामुळे आणि कार्यकर्त्यांना कार्याला जोडून घेण्याच्या मृदु मधुर वाणीमुळे संघ परिवारात त्यांना मानाचे स्थान होते. आजही त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते संघकार्य करताना आणीबाणीच्या काळात त्यांनी दीड वर्ष कारावास भोगला होता. त्यावेळी घरातही अनेक अडचणी समोर असताना कौटुंबिक अडचणींचा त्यांच्या सामाजिक जीवनावर कधीच परिणाम झाला नाही. अर्थात याचे श्रेय यांच्या धर्मपत्नी माननीय शशीताईंना द्यावे लागेल. त्यांनी सरांना त्यांच्या आयुष्यात कर्तृत्वाच्या सर्व क्षेत्रात मनापासून साथ दिली. त्यांनी सावलीसारखी आयुष्यात साथ दिल्याने सरांना सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात झोकून देऊन काम करता आले.
बीएड कॉलेजचे प्राचार्य म्हणून प्रदीर्घ सेवा करत असताना त्याच काळात सरांनी अभाविपच्या कामात स्वतःला झोकून दिले. वर्षे 1969 ते 1985 या काळात स्वतःच्या आदर्श वागणुकीतून निरलस, निस्पृह कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. आज त्यातले कितीतरी कार्यकर्ते सामाजिक राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.
जळगाव जनता बँकेची स्थापना जळगावला झाल्यानंतर त्या बँकेची शाखा धुळ्याला सुरू व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आणि आता त्याचे दृश्य स्वरूप म्हणून धुळे शाखेचा विस्तार आणि कार्य दिवसेंदिवस बहरत आहे. विद्याभारती सारख्या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेमध्ये अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सर करीत होते, त्यातून सरस्वती शिशु मंदिराची स्थापना करून सुसंस्कृत पिढी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यानंतर सरांनी संघाच्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतलं होतं. परंतु समर्थ रामदास स्वामींच्या मनात काही वेगळंच होतं. इतकं निरलस आणि उदंड काम परंतु गुप्त रूपाने कार्य करणारा कार्यकर्ता आपल्याकडे यावा म्हणून त्यांनी सरांचे अध्यात्मिक गुरु परमपूज्य गुळवणी महाराज यांचे अंतरंग शिष्य परमपूजनीय कवीश्वर महाराजांच्या मुखातून समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये काम करण्याची आज्ञा देवविली आणि सरांनीही गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून समर्थ वाग्देवता मंदिर सत्कार्योत्तेजक सभा वाचनालय आणि भारतीय विद्या संशोधन संस्था या सर्व ठिकाणी आपल्या कामाने एक आदराचे मानाचे स्थान निर्माण केले. त्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले आहेत. समर्थ वाग्देवता मंदिर आणि सत्कार्योतेजक सभेमध्ये ते विश्वस्त मंडळावर होते तसेच सामाजिक क्षेत्रात अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली आहेत.
सरांमधला विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता सतत जागृत असल्याने स्वतः नानासाहेब देवांनी अत्यंत कष्टाने मिळवलेले आणि जपणूक केलेला समर्थांचे प्रचंड वाङमय लोकांसमोर यावं म्हणून व त्यातून समाजप्रबोधन व्हावे, या साहित्याचा संशोधन अभ्यास व्हावा म्हणून भारतीय विद्या संशोधन केंद्राची 1993 स्थापना केली होती. त्यावेळेच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. एन के ठाकरे यांच्या प्रेरणेतून, सहकार्यातून केंद्राच्या 'इवलेसे रोप लावियेले द्वारी' अशा रोपट्याचे प्रचंड वटवृक्षात रुपांतर होत आहे. हे सर्व श्रेय सरांचे आहे. त्यांच्या प्रेरणेने आज केंद्रात विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची, नागरिकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढतेच आहे. सरांचं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन होते. आता ती उणीव आम्हाला सतत जाणवणार आहे.
सरांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम कार्यशाळा, सेमीनार घेतले. 2002-03 दरम्यान आंतरराष्ट्रीय मानसशास्त्र परिषद धुळ्यासारख्या आदिवासी, दुर्गम, दुर्लक्षित भागात घेऊन समर्थांच्या उक्तीप्रमाणे 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' हे खरे करून दाखवले. या परिषदेमध्ये अनेक विद्यापीठांचे कुलगुरु आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. या परिषदेच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेतून आणि परिषदेच्या यशस्वीतेतून अनेक विद्यापीठातून भारतीय मानसशास्त्राचा अभ्यासक्रमातून समावेश करण्यात आला.
बँकांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी 2010-11 साली सज्जनगडावर भारतीय विज्ञान संशोधन केंद्रातर्फे "आत्मभावी व्यवस्थापन कार्यशाळा" या शीर्षकाखाली तीन दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये नामवंत प्रथितयश बँकांमधील अधिकारी सहभागी झाले होते. यांच्या प्रतिक्रियांमधून या कार्यशाळेचा त्यांना दैनंदिन कामात खूप उपयोग झाल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले. त्यानंतर अशा कार्यशाळा विविध ठिकाणी घेण्यात आल्या. त्यामध्ये धुळ्यातील उद्योजकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.
सरांचा पीएचडी चा विषय आदिवासी भागातील शैक्षणिक समस्यांचा असल्यामुळे त्या निमित्ताने सर अनेक दुर्गम पाड्यांपर्यंत जाऊन आले. त्यांच्या जीवनाचा त्यांनी अभ्यास केला आणि विद्यावाचस्पती पदवी मिळाल्यानंतर स्वस्थ न बसता या आदिवासी पाड्यांवरील मुली धुळ्याला वनवासी कल्याण आश्रमात शिक्षण घेण्यासाठी येतात हे माहिती असल्याने या विद्यार्थिनींचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी पाच वर्ष प्रकल्प राबवला. त्याअंतर्गत अनेक उपक्रम घेऊन त्यांचा शैक्षणिक दर्जा तर सुधारला पण त्यांच्यामधील सुप्त गुणांचा विकासही झाला. हा एक आदर्श प्रकल्प शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे. सरांनी या उपक्रमावर आधारित पंचकोशात्मक विकास पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक अभ्यासक्रमासाठी संदर्भ पुस्तक म्हणून ग्रंथालयात ठेवले आहे.
या सर्व कामांच्या मागे सरांची अध्यात्मिक प्रवृत्ती त्यांची तपसाधना गुरुनिष्ठा वेळोवेळी केलेली अनेक रूपे परमेश्वराप्रति अनन्यशरण, कुटुंबियांची साथ आणि अंतरंग साधना होती. त्यांना पू. कवीश्वर महाराजांची शक्तिपात दीक्षा असल्याने त्यांच्या नित्य नियमात कधीही खंड पडला नाही. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. धुळ्याच्या रंगावधूत परिवारातील ते ज्येष्ठ सदस्य आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे होते या परिवारात अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक अधिकारी व्यक्तींची व्याख्याने प्रवचन ते दरवर्षी आयोजित करत असत. हा आध्यात्मिक वारसा तपसाधना ही सरांच्या कार्यामागची मूळ प्रेरणा होती. माणूस गेल्यावरच त्याचं मोठेपण, त्याने केलेलं कार्य लोकांसमोर यावं, ती व्यक्ती कार्यमग्न असताना तिचं मोठेपण तिच्या कार्याची महानता कळू नये हा नियतीने दिलेला शाप सरांच्या बाबतीतही दुर्दैवानं खरा ठरला आहे. सरांनी केलेले कार्य शब्दांमध्ये सांगता येणार नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागेल. त्यांनी निरलस, निस्पृह कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी आयुष्यभर केलेले कष्ट याचे महत्त्व पुढच्या काळात तीव्रतेने जाणवणार आहे.
आम्हा सर्व कार्यकर्त्यांना तर सरांच्या हक्काच्या मार्गदर्शनाची इतकी सवय झाली होती की कोणतेही काम करताना कुठलीही समस्या आली, उपाय सापडला नाही की सरांकडे धावत जायचं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे काम केलं की कोणतीही अडचण समस्या शंभर टक्के दूर होणारच हा ठाम विश्वास होता. कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांचा सल्ला व मार्गदर्शन उपयोगी पडत असे.
आज मात्र आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या निधनाने एकाकी पडलो आहोत. आजपर्यंत सरांना किती अपघात झाले, प्रकृती अस्वास्थ्य अनेक वेळा निर्माण झाले परंतु सर त्यातून प्रत्येक वेळी फिनिक्स पक्षासारखे उठून उभे राहत आणि आम्हाला नवीन दिशा प्रेरणा देत. तसेच आताही होईल असं वाटलं होतं. परंतु नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं म्हणून हे दुःख समोर आलं शेवटी 'ईश्वरेच्छा बलियसी..' म्हणून मान तुकवावीच लागेल.
यापुढेही सरांनी घालून दिलेल्या आदर्श प्रमाणे आणि निस्वार्थ निरपेक्ष काम कसं करावं हे त्यांच्या जीवनचरित्राच्या रूपाने घालून दिलेल्या उदाहरणाप्रमाणे वागण्याची काम करण्याची प्रेरणा, बुद्धी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराने द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना शेवटी एवढंच म्हणेन.
भरोनी सद्भावांची अंजुळी।
मिया वोवीया फुले मोकळी।
अर्पिली अंघ्रीयुगुली। गुरू रूपाच्या।।
लेख लिहीत असताना अज्ञानामुळे, अनावधानाने, भावना प्रक्षुब्धमुळे कोणत्या संस्थाचा किंवा व्यक्तीचा उल्लेख राहिला असल्यास क्षमा मागते.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या