कार्यमग्न दादा मराठे

नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती...

कार्यमग्न दादा मराठे
(नारायण संपत मराठे)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी झाली. हे संघटन समाजाच्या अंतर्गत असल्यामुळे हिंदू समाजात अनेक दोष आहेत, ते दूर करण्यासाठी "दैनंदिन शाखा" हे तंत्र उपयुक्त ठरले. या तंत्राचे पुढे मंत्रात रुपांतर झाले. आपण शाखेत पद्य म्हणतो...

  मंत्र छोटा तंत्र सोपे
  परि यशस्वी ठरले ते l
  रीत साधी शिस्त भारी
  कार्य व्यापक उभविते l

शाखे मध्ये मनुष्य देशभक्त, चारित्र्यसंपन्न, समाजाचे नेतृत्व करणारा, शारिरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी असा घडतो. दादा मराठे अशा तंत्रातून संघात आले. हे तंत्र आत्मसात करायला कर्तव्यनिष्ठेची आवश्यकता असते. तुकाराम महाराजांच्या भजनात म्हटल्याप्रमाणे "बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे l" तसे दादा मराठे यांचे होते, त्यांच्या बोलण्यात, पाहण्यात व कृतीत संघ जाणवत असे.

निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जीवनात संघर्षाला तोंड द्यावे लागते, तसे दादांच्या बाबतीतही झाले होते. जळगांव शहराचे ६०/६५ वर्षापूर्वीचे राजकीय वातावरण सध्याच्या परिस्थिती पेक्षा वेगळे होते. शहरातील तीन भाग असे होते की, तेथे कम्युनिस्ट पार्टीचे प्राबल्य होते त्यात शिवाजीनगर, शाहूनगर, वाल्मिकनगर व शनिपेठेतील गुरुनानकनगर हा भाग येत असे. येथे संघाचे काम करणाऱ्याला कम्युनिस्टांच्या दहशतीला तोंड द्यावे लागत असे.

हा भाग कामगार वस्तीचा असल्याने  व संघाचे वर्चस्व वाढू नये यासाठी कम्युनिस्ट कार्यकर्ते दहशत निर्माण करत. ही दहशत संपवण्याचे काम शिवाजीनगर मधे दादा मराठे यांनी केले. संघाच्या संयमी व निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे या तिन्ही भागात कम्युनिस्टांचे वर्चस्व संपले असून हिंदुत्ववादी विचार बळकट झाले आहेत.

दादांचा जन्म ८ जुन १९३३ ला झाला. दादांना एक लहान भाऊ व दोन बहिणी. आर्थिक  परिस्थिती बेताची. वडिल गुरांच्या बाजारात नोकरी करीत असत, आई सुईणीचे काम करी. दादांचे शिक्षण भगिरथ इंग्लीश स्कुल मधे झाले. दादांना लहानपणापासून व्यायाम व खेळात व त्यातही कबड्डीची आवड होती. रणझुंजार क्रीडा मंडळातर्फे होणाऱ्या राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत भाग घेत. १२ वी पर्यंतचे शिक्षण झाल्यावर आर्थिक परिस्थिती मुळे रेल्वेत कॕबीनमन म्हणून नोकरीस लागले. पुढे वत्सलाबाईंशी विवाह झाला.
 
विवाह बंधनात पडल्यावर संसाराची नित्य कर्मे पार पाडावीच लागतात, परंतु संघाच्या कार्यकर्त्याला या नित्य कर्मांमधे दैनंदिन शाखेलाही जोडावे लागते. कारण संघ हा कार्यकर्त्याच्या कुटुंबाचाच भाग झालेला असतो. शाखेतील विविध कार्यक्रमांद्वारे स्वयंसेवकांचा व्यक्तीमत्व  विकास कळत न कळत होत असतो.
दादांचे लौकिक शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे कमी झाले होते परंतु संघ शाखेवर अपार श्रध्दा !

या संघ शाखेवरील भक्ती मुळे त्यांना व्यक्तीमत्व विकास करता आला.बदादा शारिरिक विषयात प्रविण होते. शारिरिक मधील दंड विषय त्यांच्या विशेष आवडीचा. अनेक शारिरिक वर्गात ते दंड शिकवत असत. दादांचा दुसरा आवडीचा विषय म्हणजे घोष. दादा आनक वादक होते.वजळगांवात दोन वेळा सघोष संचलन निघत असे, विजयादशमी व वर्षप्रतिपदा. संचलनाचा मार्ग ठरलेला असे. शिवाजीनगर पासून सुरूवात होवून हर्षवर्धन शाखेवर (व. वा. वाचनालय) समाप्त होत असे. संचलनात सर्वात आकर्षण घोषाचे असते. दादा बराच काळ घोषप्रमुख होते.वसंचलनात घोषाची तयारी, हा कष्टाचा विषय असतो. संचलनाच्या आठ दिवस अगोदर सर्व घोष वादकांचा अभ्यासवर्ग घेतला जात असे. घोष साहित्याला पॉलिश केले जात असे. दादा घोषदंड घेऊन उभे राहात असत.

दर वर्षी हेमंत शिबीर डिसेंबर महिन्यात होत असे व स्वयंसेवकांची निवास व्यवस्था राहुट्या टेंट मधे असायची. शिबीर उभारणीसाठी दादा चार दिवस अगोदर शिबीर स्थानी पोचलेले असायचे.
आणीबाणीत दादांना सहा महिने नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले. मुले लहान असल्याने वहिनींवर सर्व संसाराचा भार पडला. परंतु वहिनींनी नेटाने तो सांभाळला.
 
दादांचे शारिरिक चांगले होते. कांही काळ ते जिल्हा शारिरिक शिक्षण प्रमुख होते. रेल्वेत शिफ्ट प्रमाणे काम करावे लागत असल्यामुळे रात्र पाळी असल्यास ते ड्यूटी संपवून परस्पर प्रभात शाखेवर येत. नंतर त्यांना भारतीय विचार साधनेचे दायित्व दिले गेले. भारतीय विचार साधनेच्या कामाबरोबर दैनिक तरुण भारत व साप्ताहिक विवेकचे काम दादा करत होते. जे काम स्विकारले त्याला पूर्ण न्याय देण्याचा दादांचा स्वभाव होता. दादा स्वतः सायकल वर घरोघर जाऊन सा. विवेकचे वाटप करत होते. सा. विवेकचे वार्षिक वर्गणीदार दादांच्या काळात सर्वात जास्त होते.

१९८९ ला प.पूजनीय डॉ.हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दादा मार्च १९८९ मधे रेल्वेतून निवृत्त झाले. प. पूजनीय आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवारांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे पूजनीय सरसंघचाक बाळासाहेब देवरस यांनी," एक वर्षासाठी समर्पण वर्षात पूर्ण वेळ प्रचारक म्हणून  बाहेर पडावे." असे आवाहन केले.

दादांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. धुळे शहरासाठी पूर्ण वेळ विस्तारक म्हणून एक वर्षासाठी निघाले. एक वर्षानी परत आल्यावर भारतीय विचार साधना व सा. विवेकची जबाबदारी स्वीकारली.
२००० मधे वहिनींची तब्बेत खुपच बिघडली. दादांनी वहिनींची सुश्रुषा केली. वहिनींना चांगल्या उपचारासाठी मुंबईला जे. जे. हॉस्पिटलमध्ये ॲडमीट केले. दुर्दैवाने  १४/९/२००० ला वहिनींचे निधन झाले.

पत्नीवियोगानंतर दादांच्या संघनिष्ठेवर फरक पडला नाही. नविन प्रांतरचनेत देवगिरी प्रांताची निर्मिती झाली. संभाजीनगर प्रांत कार्यालय झाले. काही दिवस दादांनी प्रांत कार्यालयात  (प्रल्हाद भवन) काम केले. तसेच जळगांव, भुसावळ कार्यालयात आपले योगदान दिले. जळगांव/भुसावळ कार्यालयाचे दादा अघोषित पालक होते. २२ ऑगस्ट २००६ चा दिवस उजाडला, नेहमीप्रमाणे दादा शिवाजी प्रभात शाखेत गेले. शाखा आटोपल्यावर एकनाथराव जाधव यांना मी भुसावळ कार्यालयात  तेथील कामासाठी जात आहे असे सांगून निरोप घेतला. भुसावळला गेल्यावर एस टी स्टॕंँड जवळ त्यांना तीव्र हार्टअटॕक येऊन त्यांचे निधन झाले.

दादांचे पूर्ण घर संघमय झालेले आहे. दादा हयात असतांना त्यांच्याकडे नानाराव ढोबळे, नाना जाधव, विनितराव कुबेर, भय्याजी जोशी इ. अनेक प्रचारकांचा संपर्क असे. दादांना तीन मुले व एक मुलगी. सर्वजण संसारी असून दादांनी घेतलेले व्रत त्यांनीही अंगिकारले आहे. मोठा मुलगा राजेंद्र नगरसेवक असून सेवाभावी आहे. दुसरा मुलगा क्रीडाप्रेमी असून कबड्डीवर विशेष प्रेम आहे, तीसरा मुलगा सुधीर (आप्पा) दादांप्रमाणे पूर्णवेळ मराठवाड्यात  प्रचारक होता व काही काळ जिल्हा कार्यवाह होता. मुलगी सौ. माधुरी राष्ट्र सेविका समितीशी जुळलेली आहे.

कार्यतत्पर व निष्ठावान अशा दादांची आजही उणीव भासते. "कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती!" हे त्यांच्या बाबतीत सार्थ ठरते.

- दिपकराव घाणेकर

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या