कोरोना आपदा सेवाकार्यात सहभागी एका स्वयंसेवकाचे मनोगत..
हम युवा हैं हम करे मुश्किलो से सामना!
कोरोना संकटात सध्या सर्वच जण आपापल्या परीने या अस्मानी संकटाचा सामना करत आहे. कोणत्याही संकट काळात संघ आणि संघाचे स्वयंसेवक कायम त्याचा प्रतिकार करण्यासाठी तयार असतात. प. पू. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे "राष्ट्रय स्वाहा इदं न मम" हे ब्रीद उराशी ठेवत या जागतिक संकटाच्या काळात सुद्धा संघ हा समाजाच्या मदतीसाठी देशभर तत्पर उभा राहिला हे सर्वानाच माहिती आहे.
३० जूनला साधारण दुपारी आमच्या डोंबिवली संघ परिवाराच्या सगळ्या व्हॉट्सअँप ग्रुपवर कल्याण डोंबिवली महानरपालिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ -जनकल्याण समिती यांच्यामार्फत संशियत कोविड रुग्णांच्या सर्वेक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष फिल्ड वरून जाऊन काम करतील अशा स्वयसेवकांची आवश्यकता असल्याचा निरोप आला. असं काम आधी संघाने पुणे, ठाणे आणि मुंबईत केलं असल्याची माहिती होतीच. निरोप आल्यावरच मी स्वतः जाणार असल्याचा निर्णय स्वतच्या मनाशी पक्का केला होता. घरातले वातावरण पहिल्यापासून संघमय असल्यामुळे विरोध होणार नाही याची खात्री होतीच आणि अपेक्षेप्रमाणे लगेच आई बाबांनी परवानगी दिली सुद्धा.
सगळ्या योग्य व्यवस्था लावून ६ जुलै पासून आमचा हे विशेष शिबिर सुरू झाले. पहिल्या दिवशी कामाची साधारण कल्पना, फील्ड वर काम करताना घ्यायची काळजी, PPE किट घालणे- काढण्या बद्दलच्या सूचना या देण्यात आल्या आणि दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. PPE किट घालून काम करणे हे खरंच भयंकर काम आहे. ज्या सहजतने आपण प्लास्टिक बॅग वापरतो, तेच प्लॅस्टिक जेव्हा आपण आपल्या अंगावर चढवतो तेव्हा त्या प्लॅस्टिकचा किती त्रास निसर्गाला होत असेल याची कल्पना येते. PPE किट घातल्या पासून घामाच्या धारा ज्या सुरू होतात त्या थांबतच नाही.
पहिला दिवसाचं काम हे काही प्रशासकीय कारणामुळे दुपारी ३ ला सुरू होऊन साधारण ५.३० सुमारास संपले. या अडीच तासातच आमचा चांगलाच घामटा निघाला होता. परत आमच्या केंद्रावर येऊन PPE किट काढण्याचे एक किचकट काम करून आणि मग गरम पाण्याने अंघोळी झाल्या. सर्वच जण दमले असल्याने जेवण करून जी झोप लागली ती थेट सकाळी ६ ला झालेल्या शिट्टी मुळेच सर्वांना जाग आली. सकाळी उठून सूर्यनमस्कार योगासने आणि न्याहारी करून पुन्हा एकदा आम्ही फिल्डवर रुजू झालो. पहिले २ दिवस झालेल्या त्रासाची सवय होऊन पुढच्या ३ दिवसांत जास्तीत जास्त काम करण्याच्या प्रयत्न सर्वच योध्यांनी सुरू केला.
५ दिवसाच्या सुरू असलेले हे मास स्क्रिनिंग एकूण ७१ कोरोना योद्धे यांच्या मार्फत सुरू होते. ज्यात एकूण २२ हजाराहून आधिक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आला.
आता प्रश्न येतो हे करण्याची काही मला कोणी सक्ती केली होती का? जिथे मला कोरोना होऊ शकतो हे मला माहिती असून सुद्धा मी का गेलो? यासाठी या पोस्टच शिर्षक पुन्हा एकदा बघा. संघ शिबिरात जाणाऱ्यांना माहितीच असले की संघाच्या कोणत्याही वर्गात/शिबिरात एक पद्य त्या शिबिरासाठी ठरवलं असत. "हम युवा हैं हम करे मुश्किलो से सामना" हे या शिबिराचे आमचे पद्य होते आणि ही काही केवळ ओळ नाही तर लाखो कार्यकर्ते जगत असलेली भावना आहे.
"संघ म्हणजेच समाज आणि समाज म्हणजेच संघ", त्यामुळे समाजावर आलेलं संकट हे आपल्यावर आलेले संकट आहे हीच भावना प्रत्येक स्वयंसेवकाची असते. यात मला स्वतःला संसर्ग होईल अशी भीती वाटली नाही का? तर संघाने दिलेली शिकवण आहे की अडचणीच्या काळात स्वार्थचक्रात अडकु नका. शिबिर पद्याच्या पुढील ओळी यासाठी समर्पक आहेत.
"आँधीयों में स्वार्थ की त्याग दीप ना बुझे
मातृभू को प्राण दूँ याद है शपथ मुझे
मै कहाँ अकेला हूँ साथ है ये कारवा ॥"
आता संघ विरोध हीच ज्यांची मूळ विचारधारा आहे, ते म्हणतील संघाने कुठे काय केलं, प्रशासन सरकार यांनी सगळं केलंय. संघ कुठेही म्हणत नाही की संघाने काही केले आहे, संघाने केवळ मदतीचा हात प्रशासनाला या संकटाच्या काळात दिला, जो अन्य कोणत्याही स्वघोषित पुरोगामी संघटनेनं इतक्या व्यापक प्रमाणात दिलेला दिसत नाही. बरं आता काम संपलं का? तर नाही उलट आम्ही म्हणतो,
"ये कदम हजारों अब रुक ना पायेंगे कभी,
मंझीलों पे पहुंचकर ही विराम ले सभी
ध्येय पूर्ती पुर्व अब रुक ना पाये साधना॥"
लगेच काहीजण विचारतील की या सगळ्यातून मला काय मिळाले? तर मला पाण्याची किंमत कळली. आजवर केवळ टीव्ही आणि बातम्यांमधून पाण्यासाठी चाललेली वणवण बघितली होती. त्यावर माझ्या परीने काम देखील काही प्रमाणात केलं होत. परंतु त्याची प्रत्यक्ष झळ कधी बसली नव्हती. PPE किट घातल्यावर ते काढेपर्यंत तुम्ही पाणी पिऊ शकत नाही. त्यामुळे घामाच्या धारा लागल्या असताना देखील आणि समोर पाणी असताना सुद्धा ते प्यायला मिळत नाही तेव्हा खरचं पाण्याला जीवन का म्हणतात हे कळतं. प्लास्टिकच्या PPE किट मध्ये घुसमट होताना, निसर्गाला किती त्या प्लॅस्टिकचा त्रास होत असेल हे क्षणोक्षणी जाणवतं. घरी अंघोळ केल्यावर बॉयलरच बटन बंद करायला विसरणारा मी, हवं तेवढा आणि हवं तेव्हा गरम पाणी मिळणाऱ्या मला ऊर्जेचे महत्त्व कळले. अश्या अनेक गोष्टी आहेत, त्या सांगून उगाच पोस्टचा विस्तार वाढवत नाही.
ही पोस्ट लिहीत असतांनाच आम्हा सर्वांची कोव्हिड टेस्ट झाली आहे. चाचणी ते चाचणीचा निष्कर्ष येईपर्यंत एक भीती, चिंताग्रस्त वातावरण हा अनुभव सुद्धा विलक्षण आहे. तुम्ही निगेटीव्ह आहात हे जेव्हां कळतं तो आनंद तर सध्याच्या परिस्थितीत अवर्णनीय आहे. यासाठी जातांना माझ्या अनेक मित्रांनी मला विचारले होते की भीती नाही का वाटतं? काम करतांना घाबरायला होत नाही का? तर नक्कीच भीती वाटते, घाबरायला होते. पण ही सगळी भिती संध्याकाळी प्रार्थना (संघाची) म्हणताना कुठच्या कुठे पळून जाते समजत सुद्धा नाही. प्रार्थनेच्या पुढील ओळी ही सगळी भीती पळून जाते.
"प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयम्
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये।"
याचा थोडक्यात अर्थ म्हणजे हे परमेश्वरा हे कठीण कार्य आम्ही हाती घेतले आहे, त्यात अनेक अडथळे येतील त्यावर मात करण्याची शक्ती आम्हाला दे, आम्ही घेतलेले हे सतीचं वाण पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे!
पोस्टच्या अखेरीस माझ्या सारख्या अनेक युवकांना आव्हान करतो की हे एक खूप कठीण काम आहे. आपणा सर्वांना मिळून याचा सामना करायचं त्यामुळे जिथे तुम्हाला या संकट काळात देशाची सेवा करण्याची संधी मिळेल ती दवडू नका. आपली भारतमाता आपल्याला आवाज देते आहे तिच्या मदतीसाठी धावून जा.
हे सर्व काम करतं असताना मला क्षणोक्षणी माझा काका कै. महेश हिंगे याची आठवण येत होती. देवाने माझा काका फार लवकर माझ्यापासून हिरावून घेतला.आज मी जे काही थोडफार संघकाम करतोय त्याची प्रेरणा आणि ऊर्जा फक्त माझा काका आहे. परंतू काका तू जिथे कुठे असशील तिथून मला आशीर्वाद आणि असंच काम करत राहायची प्रेरणा देत राहा! I miss you so much!
आता पुढे अजुन काही दिवस मला home quarantine राहायचे आहे. या सगळ्यात आपणा सर्वांचे आशिर्वाद असू द्या ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो.
भारत माता की जय!
- सुमेध हिंगे, डोंबिवली
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या