स्वयंप्रेरणेने समाजसेवा

स्वयंप्रेरणेने समाजसेवा

संघाचे काम हे काही जगावेगळे नाही...संघ स्वयंसेवक प्रत्येक वेळी मदतकार्यात अग्रेसर असतो. अतिवृष्टी असो, भूकंप असो की कोरोनाचे संकट.. आपला हा देवरुप समाज यातून बाहेर निघाला पाहिजे, यासाठी आपली नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदारी या कडे पाठ करुन संघाचा स्वयंसेवक जेव्हा जेव्हा उभा राहतो त्यावेळेस त्याचे बळ १+१ हे ११ होते. कारण हा समाजच तितकाच क्षमतावान आहे. भारतीय समाज हा विश्वातील अन्य समाजव्यवस्थेपेक्षा वेगळा यासाठी आहे कारण "वयम् पंचाधिकं शतम्" या व्रुत्तीने संकटप्रसंगी आपण एकजूटीने उभे राहतो. हे आपल्या भारतीय समाजाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. 

कोरोनाच्या काळात समाजाच्या संवेदनशील मनाचे दर्शन संघ स्वयंसेवकाला झाले कारण तो या शारिरीक अंतर ठेवून काम करण्याच्या कठीण काळातही रस्त्यावर होता. जे सद्भावनेने यासाठी वेळ देत होते त्या सर्वांना असे दातृत्वाचे दर्शन घडले. यातून आपण अधिक वेगाने सर्वांच्या सोबत सेवाभावे काम करावे असे स्वयंसेवकांना वाटले.

बरं संघाची कार्यपध्दती अशी आहे की, 
शहर-गाव-वस्तीस्तरावर प्रमुख ४-५ कार्यकर्ते विचार करतात आणि समाजाचा जसा पाठींबा असेल तसे काम सुरु करतात. त्यामूळे समाज माध्यमाव्दारे जागरण-मास्क वाटप-भोजन देणे-धान्य वाटप-परप्रांतीय मजूरांना सहाय्य-वृध्दांना मदत-वस्तीचे आरोग्य सर्वेक्षण-कम्युनिटी क्लिनिक-वस्तीचे प्रबोधन-कोविड सेंटरमधील योग व खेळाचे प्रयोग-कोविड सेंटर व्यवस्थापन-मृत्यु झालेल्यांवर अंत्यसंस्कार- कुटुंबाचे समुपदेशन हे असे अनेक अंगानी सेवाकार्य स्वयंसेवकांनी समाजाच्या पाठबळावर केले. यासाठी काही व्यक्तींची जुळवा-जुळव कदाचित संघ स्वयंसेवकांनी उपलब्धतेनुसार केली असेल पण समाजातील संवेदनशील सज्जन शक्तीच्या सहभागाशिवाय ते केवळ अशक्य आहे.

त्यामूळे संघाला याचं श्रेय नकोच आहे कारण हा समाजच आपला भगवान आहे, प्रेरणा आहे ही संघाची याप्रती भावना आहे. संघाचा विचार अनुभवल्याशिवाय संघ पध्दतीला दूषणे देणे सोपे आहे. आपल्या घरातील संवेदनशील कुटुंब प्रमुख ज्याप्रमाणे सर्वांची काळजी करतो, विचारपूर्वक दिशा देतो, निर्णय घेतो, भिऊ नकोस मी आहे हा विश्वास देतो आणि पुरुषार्थाची जाणिव सतत करुन देत असतो. अशीच कुटुंबे संकटसमयी तरतात आणि यशस्वीतेत पण जमिनीला चिटकून असतात. हीच भूमिका संघाची या समाजाप्रती आहे. आपण सारे एक आहोत एकाच मातेची लेकरं आहोत या पारिवारीक भावनेने संघ काम करतो. जे आज संघ काम प्रत्यक्ष न अनुभवता पातळी सोडून टिका नव्हे द्वेष करतात ते देखील कालांतराने संघ संपर्कात येतील व आपले आहेत, आपले होतील हा आशावाद घेवून स्वयंसेवक काम करतो...

पुरामध्ये आपले घर विस्कटलेले असतांना पूरग्रस्तांना मदत करणारा, आपला हातावर पोट असलेला छोटा व्यवसाय बंद असताना समाजाला मदत करणारा असा सामान्य स्वयंसेवक कशा मूळे प्रेरीत होतो...चिरेबंदी वाड्याच्या नुसता आदेशावरुन किंवा नुसत्या आभासी अशा फेसबुकवरुन केलेल्या आवाहनाने तो काम करीत नसतो तर आजू बाजूच्या समाजाच्या पाठिब्यांने तो प्रेरीत झाला असतो. "आता माझ्या घरी चूल पेटली आहे मला मदत नको तर योग्य गरजूंना द्या..." रस्त्यावर माठ विक्री करणारी महिला जेव्हा म्हणते  "मी बनविलेल्या माठात या परप्रांतीय बांधवांना थंडगार पाणी द्या..." एखादं घर म्हणतं की " हे घ्या आमचे तांदूळ आणि सर्वांना पोटभर जेवायला द्या..." 
अशा प्रसंगाने आणि समाजाच्या या दर्शनाने प्रेरीत झालेला तरुण सेवाकार्य करायला पुढे सरसावला असतो. माझा फोटो काढा, सेल्फी घेणारा आणि मेणबत्ती पेटवून निषेध करणारा हे काही या समाजाचे जिवित आदर्श नाही होवू शकत.

संघ विचाराचं वैशिष्ट्य असं आहे की जी काही व्यवस्था आहे ती बळकट होण्यासाठी तिला सोबत राहून मदत केली पाहिजे असाच विचार संघ नेहमीच करतो म्हणूनच भारताची फाळणी असो की भारत विरोधी युध्द किंवा भारतविरोधी षडयंत्र अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो वा अपघात आणि आताचे कोरोनाचे महाभयंकर आव्हान. व्यवस्था कार्यक्षम राहण्यासाठी, बळकट होण्यासाठी आपल्या परीने मदत करण्याचे स्थानिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने ठरवतात आणि त्यासाठी श्रेय न घेता झोकून देवून काम करतात.  न की त्या व्यवस्थेला वेठीस धरुन... त्यामूळे जिल्हाधिकारी कार्यालयाला धाकधपटशा दाखवायचा... तहसिलदारांची अडवणूक करायची अशी कार्यपध्दती कधी संघाने अवलंबिली नाही तर शासन-प्रशासन यांना कठीणप्रसंगी सहाय्यभूत राहून मदत करावी हा संघाचा विचार आहे.

आणि संघावरची टिका काही नवीन नाही. त्या टिकेचे संघ नेहमी स्वागतच करीत आला आहे कारण संघाच्या वाटचालीत या  टिकाकारांचा फार मोठा वाटा आहे... यामूळे संघ विस्तारला.. चांगला नागरिक घडला पाहिजे यासाठी सतत प्रयत्नरत राहीला आणि जमिनीच्या वास्तवाशी घट्ट चिटकूनही राहीला.

या महाभयंकर संकटाशी मुकाबला करताना आपल्या व्यावहारीक जीवनात संघर्ष करणारे जवळ जवळ एक हजार क्षमतावान गुणी स्वयंसेवक कोरोनाशी दोन हात करीत या आजाराने ग्रस्त झाले..त्याचे कुटुंबातील सदस्यही बाधित झाले..ही किंमत मोजूनही संघ टिका झेलतो आहे..हा तर संघाने स्वत: स्विकारलेला मार्ग आहे त्यामूळे संघाला याची चिंता नाहीये आणि कधी नव्हती.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या