राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षभरातील सहा प्रमुख उत्सवांपैकी एक महत्वाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव. भारतीय परंपरतेत आषाढी पौर्णिमा या दिवसाला गुरुपौर्णिमा म्हणून विशेष महत्व आहे. या दिवशी आपल्या गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीला सर्वजण वंदन करत त्याची मनोभावे पूजन करतात व दान दक्षिण अर्पण करतात.
संघाचा हा उत्सव मात्र यापेक्षा थोडा वेगळा आहे. संघाने आपल्या गुरुस्थानी व्यक्तीला न मानता परम पावित्र अश्या भगव्या ध्वजाला गुरू मानले आहे. दरवर्षी सर्व स्वयंसेवक या भगव्या ध्वजाचे पूजन करतात व दान दक्षिणा म्हणजेच समर्पण करतात. ध्वजाच्या शेजारीच असलेल्या एका कलशात स्वयंसेवक आपल्या इच्छाशक्तीनुसार समर्पण करतात. याच समर्पणातून संघाचे वर्षभरातील विविध गतीविधी सुरू असतात.
संघाच्या या आगळ्या वेगळ्या गुरूपौर्णिमेचा इतिहास व उद्देश्यही तसेच खूप विचारदर्शी असल्याचे दिसून येते. संघाची स्थापना झाल्यानन्तर तीन वर्षांनी म्हणजेच 1928 मध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात झाली. या तीन वर्षात संघ संस्थापक पूज्यनीय डॉ. हेडगेवार स्वतःच खर्च करत संघकार्य वाढवीत होते. त्यांच्या सहकाऱ्यांनीही यात मदत केली होती. परंतु, संघकार्य वेगाने वाढत जात असताना आर्थिक चणचण भासू लागली होती. तेव्हा डॉक्टरजी व स्वयंसेवक यांनी एकमताने गुरुपूजन व समर्पण यास सुरुवात केली.
गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी डॉक्टरांनी स्वयंसेवकांना उद्या फुल, हार घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा प्रत्येकजण गुरू म्हणून वेगवेगळा विचार करत होता. कोणाला वाटले डॉक्टर हेडगेवारच गुरू असतील, तर कोणी अप्पा सोहोनी यांचा विचार केला. प्रत्येक जण तर्क लावीत होता. परंतु, दुसऱ्या दिवशी डॉ. हेडगेवार यांनी आपण गुरुस्थानी भगव्या ध्वजाला मानावे असा प्रस्ताव ठेवला.
व्यक्ती कितीही श्रेष्ठ असली तरी तिच्यात काहींना काही दोष राहूनच जातात. त्यामुळे व्यक्तिनिष्ठेपेक्षा तत्वनिष्ठता महत्वाची असा विचार मांडून हा भगवा ध्वज युगानुयुगापासून हिंदूंच्या शौर्याचा, पराक्रमाचा साक्षीदार राहिला आहे असे त्यांनी सांगितले. प्रभू रामचंद्रांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांनी भगव्या ध्वजाला परमोच्च आदर दिला. तीच परंपरा कायम ठेवत सर्वानुमते अखेर भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानून त्याचे पूजन केले. त्या दिवशी झालेल्या दक्षिणा समर्पणात एकूण 84 रुपये इतकी पहिली समर्पण दक्षिणा अर्पण झाली होती.
"भक्तीभावे श्री गुरूंची मी पूजा बंधीयली
जीवनाची पुष्पकमले या ध्वजाला वाहिली" या पंक्तीप्रमाणे आजही जगभरात जिथे जिथे संघाची शाखा लागते तिथे तिथे स्वयंसेवक गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करतात व भगव्या ध्वजाला प्रणाम करून दक्षिणा समर्पण करतात.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या