भाग १ - चिनी आक्रमणाची सूचना

श्री गुरुजींचे चीन विषयक विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजामध्ये राष्ट्रीय विचार निर्माण होण्यासाठी व समाज जागृतीसाठी सतत प्रयत्न केले आहे. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करून आपले अवघे आयुष्य संघ कार्यासाठी व देशसेवेसाठी वाहून दिले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संघाचे द्वितीय सरसंघचालक पु. श्रीगुरुजी अर्थात माधव सदाशिव गोळवलकर यांनी संघ कार्य वाढविण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. याच वेळी त्यांनी राष्ट्रीय विचार म्हणून काही भूमिका ही मांडल्या. ज्याप्रमाणे श्वासाविना जीवन चालू शकत नाही त्याचप्रमाणे राष्ट्रकार्यशिवाय समाज जीवन चालू शकत नाही. 

भारतमाता म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही. भारत मातेकडे गौरवपूर्ण दृष्टीने पाहण्याचा आपला दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मातृभूमी वरील कोणताही घाव आपण सहन करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रहित म्हणून जागृती असणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण जीवनभर राष्ट्रहिताचा दृष्टिकोन घेऊन समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या पू. गोळवलकर गुरुजी यांनी चीनच्या विस्तारवादी भूमिकेवर आपले विचार मांडले होते. आज भारत-चीन संबंध ज्या तणावाखाली आहे व चीन ज्याप्रकारे वागत आहे, त्या परिस्थितीत श्री गुरुजींचे विचार तंतोतंत जुळत आहेत. 

१९४९ मध्ये स्वतंत्र झालेल्या चीन ने १९५० पासून भारताविरुद्ध आपले विस्तारवादाचे धोरण आरंभिले होते. १९५० पासून भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमांमध्ये चिनी सैन्यासाठी रस्ते बनविणे, तेथील भारतीय सीमाभागात आपला विस्तार वाढविण्यासाठी कारवाई करणे चीनने सुरू केली होती. १९५१ मध्ये श्री गुरुजी यांनी वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी चीनची विस्तारवादी प्रवृत्ती असल्याचे म्हटले होते. भविष्यात त्याची भारतावर आक्रमण करण्याची संभावना असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी चीनच्या तिबेटच्या संदर्भात आक्रमक हालचाली सुरू होत्या. त्या धोरणावरून श्री गुरुजी यांनी अनुमान लावला व भारत सरकारला सतर्क राहण्याची सूचना केली. 

श्रीगुरुजी म्हणाले होते, "भारताने चीनला तिबेटची भूमी बहाल करून मोठी चूक केली आहे. भारत सरकारला याची दूरदृष्टी नसल्यासारखे आहे. याचे परिणाम भारताला येणाऱ्या काळात भोगावे लागतील." त्यावेळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू चिनी पंतप्रधान चाऊ एन लाय सोबत "हिंदी चिनी भाई भाई" ही घोषणा देत चीन सोबत बंधुभाव जोपासण्याचा प्रयत्न करत होते. चीनच्या बंधूभावामध्ये पंचशील तत्व कशाप्रकारे समाविष्ट झाले आहे आणि ते पंचशील तत्व भारतीय परंपरेच्या विचारधारेशी कशा प्रकारे जोडले गेले आहे, या विषयावर नेहरू भावुक होऊन भाषण देत होते. भारतीय जनताही या घोषणेने प्रभावित झाली होती. भारतीय नागरिकसुद्धा "हिंदी चीनी भाई भाई"च्या घोषणामध्ये आपल्या भारताचे सुवर्ण भविष्य पाहू लागली होती. अशावेळी चीनच्या साम्राज्यवादी व आक्रमकतेची भाकीत सांगणारे एकमेव व्यक्ती होते, ते म्हणजे पू. श्रीगुरुजी.

सन १९६२ मध्ये श्रीगुरुजी चितोडच्या एका कार्यक्रमात भाषण देत होते. यावेळी त्यांनी म्हटले, मला खात्रीशीर माहिती मिळाली आहे की चीन भारतावर आक्रमण करणार आहे. चीनच्या हालचालींवर दुर्लक्ष करून आपले पंतप्रधान "हिंदी चीनी भाई भाई" घोषणा देण्यात मशगुल आहेत. परंतु, असे असतानाही विस्तारवादी चीन भारतावर आक्रमण करेलच. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्रीगुरुजींनी ही बातमी सरकारला सांगितली. परंतु श्रीगुरुजींच्या या वक्तव्यावर त्यावेळी जळजळीत प्रतिक्रिया राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये उमटल्या. 

कोलकाता येथील एका दैनिकाच्या संपादकांनी लिहिले की ही अतिशय तथ्यहीन बाब आहे, जर असे असते तर भारत सरकारला या गोष्टीची माहिती जरूर मिळाली असती आणि आणि या भाषणाच्या दोन दिवसानंतर आकाशवाणीवर धक्कादायक वृत्त देशाने ऐकले की चीनने अरुणाचल प्रदेशात भारतावर सरळ सरळ आक्रमण केले आहे. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आपण मोठ्या भ्रमात राहिलो असे सत्य स्वीकारले. हिंदी चीनी भाई भाई च्या घोषणा देणाऱ्या आणि पंचशील तत्वांचा उद्घोष करणाऱ्या चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता.

@अमोल पेडणेकर
सौजन्य- हिंदी विवेक

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या