देवगिरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सकाळी अचानक लेहमध्ये पोहोचले. 15 जूनला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निमु इथं गेले. पहाटेच ते इथे पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी लष्कर, हवाई दल आणि ITBP च्या जवानांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि सीडीएस बिपीन रावत हेही होते.
जवानांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, लडाख ही देशासाठी कोणताही त्याग करायची तयारी असलेल्या देशभक्तांची भूमी आहे. कुशोक बकुला रिनपोशे यांच्यासारखे महान देशभक्त लडाखने या देशाला दिले आहे.
प्रत्येक भारतीय नागरिकाचा आपल्या शौर्याला सलाम आहे. संपूर्ण जगाने आपले अद्वितीय शौर्य पाहिले आहे, आपल्या शौर्याच्या कथा आज घरोघरी सांगितल्या जात आहेत.आपला त्वेष आणि दाहकता शत्रूने पाहिली आहे. राष्ट्र रक्षा म्हणून मी विचार करतो तेव्हा तो मातांचा विचार करून निर्णय घेत असतो. त्यातील पहिली माता म्हणजे 'भारतमाता' आणि दुसरी म्हणजे त्या सर्व माता ज्यानी राष्ट्र रक्षणासाठी आपल्यासारख्या वीरपुत्रांना जन्म दिला. अश्या शब्दात पंतप्रधानांनी जवानांचा उत्साह वाढविला.
लडाखमधले लोक, मग ते सैनिक असोत किंवा नागरिक, देश बळकट आणि सामर्थ्यशाली करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. इतक्या उंच प्रदेशात, कठीण परिस्थितीत आपण ज्या पद्धतीने भारत मातेचे रक्षण आणि सेवा करत आहात ते जगात कोणीही करू शकणार नाही. तुम्ही ज्या उंचावर काम करत आहात त्यापेक्षा जास्त उत्तुंग तुमचे शौर्य आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, तुमच्या सभोवताली असलेल्या पर्वतांप्रमाणे तुमची इच्छाशक्ती भक्कम आहे. भक्कम इच्छाशक्ती असलेल्या तुमच्या हातांमध्ये देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याने, देशाचा विश्वास अढळ आहे. तुमची समर्पित वृत्ती देशाच्या प्रत्येक नागरिकाला रांत्र-दिवस काम करण्याची प्रेरणा देते. भारतमातेच्या रक्षणासाठी जवानांचे सामर्थ्य, जिद्द, धाडस आणि समर्पित वृत्तीची पंतप्रधानांकडून प्रशंसा करण्यात आली.
आपल्या त्याग आणि बलिदानाने #AatmaNirbharBharat हे स्वप्न अधिकच दृढ झालं आहे. आपण दाखवलेल्या शौर्याने, संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याचा संदेश मिळाला. मला तुमच्या डोळ्यात मातृभूमीच्या रक्षणाचा निर्धार आणि बांधिलकी दिसते, तुम्ही त्या भूमीचे शूर सुपुत्र आहात ज्या भूमीने हजारो वर्षांपासून ज्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि आपला छळ केला त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या