@ विशाल पाटील, जळगांव
'सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा
बिकट रूप धरि लंक जरावा'
हनुमान चालीसेतील या पंक्ती स्मरताक्षणी एखादीक सामान्य मनुष्यही वैचारीक दीन-हिनता झटकून अनंत विराट शक्तीचा संचार त्यात झाल्याचा अनुभव सहज करतो. मात्र हा सर्वंकष अनुभव श्रद्धेविना होणे तेवढे अशक्य. जगाच्या इतिहासात भारत हे असे विशेष राष्ट्र ठरते ज्यावर परकीयांची अनुक्रमे अनेक आक्रमणे झालीत परंतु येथील संस्कृती आजतागत चिरंतन टिकून आहे. अन्य संस्कृती नामशेष झाल्या. याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न अनेक जिज्ञासुंनी केला तसेच काही संशोधकांनीही, तथाकथित जगज्जेता मानला जाणारा 'शिकंदर' विश्वविजयाचे रंजक स्वप्न घेऊन भारतस्वारीस आला होता.परंतु अन्य मुलखांच्या तुलनेत भारत देशातील अनुभव त्याचा संघर्षानेपूर्ण असाच राहिला. भारत चढाई दरम्यान शिकंदरास जाणवले की पुढील प्रांत जिंकताक्षणी मागील जिंकलेली प्रांताची जयपताका उखडून फेकत त्यासमोर त्याच त्वेषात बंडाचे शट्टू ठोकत युद्धाचे आव्हान करीत. यामुळे त्रयस्थपणे आपली जिज्ञासा घेऊन तो भारतीय योग्या जवळ आपला प्रश्न घेऊन "मी इतर राष्ट्रांप्रमाणे संपूर्ण भारत जिंकू शकेन काय?" कुतूहलाने विचारू लागला. हरणीच्या चामडी आसनावरून उठत त्याकडे अंगुलीनिर्देश करीत ते योगी त्यास उत्तरले "आपल्या हाताने आसनाची चारही टोके भूमीस समांतर करून दाखव." जे 'शिकंदरास' करता येणे अशक्य झाले. कारण एकबाजू दाबतासरशी दुसरे टोक सज्ज होई आणि ही तारे वरची कसरत त्याची कुचकामी ठरली. "भारत विजयाची आकांक्षाही तुझी अशीच ठरेल." तो भारतीय योगी तद्नंतर उत्तरला. कालांतराने शिकंदर मायदेशी परतला तेथे त्याचा देहठेवल्या गेला. परंतु भारतजयाचे स्वप्न जे अधुरे ते भंगलेच. भारत चिरंजीवी राष्ट्र असेल तर केवळ आपल्या सामर्थ्यपूर्ण श्रद्धेवर. हे सामर्थ्यपूर्ण श्रद्धेचे पुनःजागरण सहस्त्र वर्षांपासून भारतात विविधांगी राहिलेले आहे. या सामर्थ्यपूर्ण श्रद्धेचा यज्ञ पुनः पुनः प्रज्वलीत होत जातो व यात असंख्य श्रेष्ठ नरोत्तम समिधारूपाने समाहित होतात. हा यज्ञ सदैव तेवण्याकरिताच श्रीरामाचा उत्तर-दक्षिण प्रवास असो अथवा श्रीकृष्णाचा पूर्व-पश्चिम तसेच आद्यशंकराचार्य यांचा चारधामाद्वारे राष्ट्र बांधणीचा सुगममार्ग. सारेच काळानुरूप भारताचे पुनः जागरण करणारेच.
इस्लामिक आक्रमनास लढा देतांना निर्माण झालेले भक्ती आंदोलनही राष्ट्रीय संस्कृती टिकविण्यासाठीचे राष्ट्रांदोलनच वाटते. असाच या राष्ट्रांदोलनाचा एक ओजस्वी धागा उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात विक्रम संवत १५५४ साली शुक्लपक्षातील सप्तमीस वडील आत्माराम दुबे व आई हुलसी दुबे च्या परिवारात हा दिव्य बालक जन्मला. सामान्यांप्रमाणे जन्मतःच किंकाळत न रडता तब्बल बारामाह आईच्या गर्भावसनातुन बाहेर येताक्षणी 'राम' नाव त्याने पुकारले. परंतु त्याचा जन्म हा 'अपशकुन'असून घरातील मंडळीच हत्येचा कट त्याविरुद्ध रचू लागली. जन्मतःच मिळालेले आद्यनाम'रामबोला' सहित 'अपशकुनी' हेही नाव त्याला समाजाने दिले. बालपणात अनेक वेळा हत्येचा प्रयत्न झाल्यावरही तो मृत्युंजयी ठरला. 'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण जणू त्याचीच ग्वाही देते. परंतु जीवनोद्देशपूर्ती पूर्वी मृत्यू काही त्याला गवसणी घालू शकला नाही. समस्थ सृष्टीच ज्याच्या जगण्यासाठी लोलुप झालेली असतांना त्याला मरण तरी कसले. बालकाचे परिवारात वाढणे प्रतिकूल राहील हे आई हुलसीने वेळीच ओळखल्याने आपली दासी मुनिया हिच्या ताब्यात त्यास सुपूर्द केल्या गेले. मुनियानेही यशोदेगत रामबोलास पाचवर्षापर्यंत वाढवले. काट्यांनीच अवघा जीवनमार्ग सुसज्जीत असल्याने सौख्य तरी कसे लाभणार? मुनियाचेही अकस्मात निधन झाल्याने पुढे गुरू नरहरिदासांनी त्याला शिक्षित व दीक्षित करण्याचे ठरविले. जेथे गुरू मिळाले तेथे या भवसागराच्या विलासाचा किंवा दुःखाचा कळस तेव्हाच कोसळतो आणि एका अखंड अंतहीन ज्ञानाचा दिपक अज्ञानाचा तमस मिटवू लागतो. गुरूंची महती सांगत ते आपल्या दोह्यात म्हणतात...
बंदउ गुरू पद कंज कृपा सिंधु नर रूप हरि
महामोह तम पुंज जासु बचन रवि कर निकर।
गुरु हा समुद्रासमान मानवरूपात ईश्वर आहे,
मोहमायेचा अंधकार नष्ट करण्यासाठी त्यांची वचने सुर्यकिरणा सदृश्य आहेत. मी त्या गुरूच्या कमलरूपी चरणांचे विनती करतो.
त्यांसोबत रामबोला काशीस्थित स्वामी रामानंदजींच्या आश्रमात पंचगंगा घाटावर संस्कृत व्याकरण, इतिहास , ज्योतिषशास्त्र, वेद-वेदांग, दर्शनशास्त्र, पुरानादिंचे सखोल अध्ययन करून रामबोला वा अपशकुणीचा 'तुलसीदास' म्हणून विख्यात झाला. तुलसीदास आपल्या दिव्य मेधेने अत्यंत मधुर वाणीने 'रामायण' सांगीत त्यात सारीच मंडळी मंत्रमुग्ध होऊन भक्ती रसात लीन होऊन जाई.
अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेच्या ह्या दिव्य बालकाकडे आकर्षून रामकथा ऐकण्यास आलेल्या दिनबंधु पाठकांनी आपल्या मुलीचा विवाह प्रस्तावत्यांसमक्ष ठेवला. विधिवत विवाहबंधनात रत्नावली आणि तुलसीदास बांधल्या गेले. रत्नावली आपल्या अलौकिक मनोहर सौंदर्याने देखनी असल्याकारणाने तुलसीदास तिच्यावर अतोनात प्रेम करीत. जराही आपल्यात व रत्नावलीत असलेले अंतर त्यांना असह्य होई. नेहमी रत्नावलीसोबतच ते असत. एके दिवशी तुलसीदासांना न सांगता पत्नी रत्नावली आपल्या माहेरी निघून गेली. तुलसीदास घरी परतताच रत्नावली कुठेही दिसत नसल्या कारणाने तिच्या विरहात तुलसीदासही तिच्या मागे मागे सासरी जाण्यास निघाले. प्रेमाची उत्कटता इतकी की रात्र झाली असताही मार्गात आलेली नदी त्यांनी मृतदेहाच्या मदतीने पार केली. सासरी पोहोचल्या पोहचल्या त्यांना पत्नी रत्नावली म्हणाली
"अस्थी चर्ममय देह मम तामे ऐसी प्रीति ।
ऐसी जो श्रीराम मह होत न तय भयभीत।"
माझ्या हाडा मांसाच्या शरीराशी जेवढे प्रेम आहे, याच्या निमपट प्रेम जरी श्रीरामाशी झाले तर या संसाराचे भय उरणार नाही.
कदाचित सरस्वतीच तिच्या मुखावर त्यावेळी विराजमान असावी. तदक्षण तुलसीदासांचा काम रामात परावर्तीत झाला नि ते 'गोस्वामी' ज्याने पंचेंद्रियांवर विजय संपादित केला असे 'गोस्वामी तुलसीदास' म्हणून प्रसिद्ध झाले. रामभक्तीच्या अतुट आर्तहाकेने त्यांचे संपूर्ण अनुरेणूच बदलून गेले. श्रीरामांच्या शोधात समग्र भारत दर्शन त्यांनी आरंभिले प्रयाग, अयोध्या, चित्रकूट, मानसरोवर ते रामेश्वरम, चारधाम प्रत्येक तीर्थात प्रभु श्रीरामचंद्रांचा शोध सुरू झाला. परंतु निराशाच मिळाली. त्या जगनियंत्याच्या चेतनेने प्रकाशित नि रोमांचीत होणारे हे विश्व शेवटी भक्ताची दशा पाहून आपले स्वरूप प्रकटण्याचे ठरविलेच. रोज प्रातर्विधी आटोपून लोट्यात उरलेले अर्धे पाणी तुलसीदास आंब्याच्या वृक्षास अर्पित. हा क्रम नेहमीचाच. त्या जलार्पणामुळे झाडावर निवसीलेले एक प्रेत त्यांना प्रसन्न झाले. तुलसीदासांनी श्रीरामाचा पत्ता त्यांना विचारला असता श्रीहनुमानाचा पत्ता प्रेताने दिला.हे सारे निमित्त जरी असले तरी तुलसीदासांची श्रद्धा भक्ती मात्र अतुट होती. आणि हे प्रभू श्रीरामचंद्र जाणून होतेच.भक्ताची निस्सीम श्रद्धा पाहून श्रीरामचंद्रांनी तुलसीदासयांना दर्शन दिले.
चित्रकूट के घाट पर भय संतन की भीर। तुलसीदास चंदन घिसे तिलक करे रघुवीर।
तुलसीदासांचे जीवन लक्ष्य जरी पूर्ण झाले असले तरी जीवनोद्देश तूर्तास अपूर्ण होता. अजून मानवतेच्या विकसित रूपास जनसमान्यांच्या समक्ष त्यांना प्रस्तुत करायचे होते.समाजाचे होत चाललेले पतन रोखून त्यास ऊर्ध्वरेता करत, राष्ट्रांदोलनात जनतेस उतारणे काळाचे कर्तव्य होते.आक्रमणांनी खचलेला समाज श्रध्दासामर्थ्याच्या बळावर उचलणे आव्हानात्मक वाटू लागले.या नैराश्यातून श्रीरामांचे अलौकिक सामर्थ्य पुन्हा भारतीय जनमानसात त्याच विराटरूपाने दर्शविणे या जांबुवंताचे आद्यकर्तव्यच ठरले. या महत बेलेची सुरुवात झाली श्रीरामनवमीस. श्रीरामचरितमानस या महाकाव्याची रचना प्रारंभीली ती २ वर्षे ७ माह २६ दिवसांपर्यंत छंदबद्ध होत सीताराम विवाह दिनी संपूर्ण झाली. तोवर संस्कृत भाषेतील धर्मग्रंथांना लोकभाषेत अधिकाराने वा प्रमाण रचना झाली नव्हती. जणू हा काही भगीरथ प्रयासच होता. हे तुलसीदासांनी शक्य करून दाखविले. आणि जनसामान्यांची भाषा 'अवधी' मध्ये 'श्रीरामचरितमानस' लिहिल्या गेले. एकूण १२ हजार ८०० वाक्ये व १ हजार ७३ छंदा सहित बालकांड,आयोध्याकांड,अरण्यकांड,किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड व शेवट उत्तरकांडाने हे काव्य संपूर्णते. स्थानिक पौरोहित्यांनी सुरुवातीस 'रामचरितमानसास' प्रचंड विरोध केला याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपसले, एक मोठी परीक्षाही घेण्यात आली यात काशी विश्वनाथाच्या मंदिरात वेद पुराण ई. ग्रंथांच्या थेट खाली ठेवण्यात आले परंतु विशेषता अशी की सकाळी सर्व ग्रंथांवर श्रीरामचरितमानस हे मुकुटमणी प्रमाणे विराजीत प्रथमश्रेणीत स्थीर होते. यामुळे गोस्वामी तुलसीदासकृत श्रीरामचरितमानस स्वयंसिद्धतेसह कोटी हृदयांना आजही सामर्थ्यपूर्ण श्रध्येत प्रस्थापित आहे. श्रीरामचरितमानस हा एक अमर ग्रंथच नव्हे तर भारतीय संस्कृतीतील अमुल्य माणिकच ठरला. नि त्याचे रचनाकार गोस्वामी तुलसीदास ज्यांच्या धरागमनावेळी मृत्यूत्यांपाशी घिरट्या घालत होता ते तर अमरच झाले. कवी हरीऔध तुलसीदासांवर म्हणतात
कविता करके तुलसी ना लसे।
कविता लसी पा तुलसी की कला।
कवितेमुळे कविमोठा होतो,
परंतु तुलसीदासांमुळे कविताच मोठी झाली.
महामना मालवीय हे गोलमेज संमेलनाकरीता इंग्लंड येथे गेले असता, त्यांना तेथील मंडळींनी प्रश्न केला की इस्लाम, ईसाई यांचा ज्याप्रमाणे एक प्रातिनिधिक ग्रंथ आहे. त्याप्रमाणे हिंदूंच्या खिचडी ग्रंथांपैकी एक प्रातिनिधिक ग्रंथ कुठला? यावर मालवीयजींनी गौरवशाली मुद्रेने 'श्रीरामचरितमानस' हे स्पष्टपणे ठणकावुन सांगितले. डॉ. ग्रीथर्सन आशियातील सर्वोत्कृष्ट कवी म्हणून गोस्वामी तुलसीदासांचा उल्लेख करतात. तर सुरदासांनी महाकवी म्हणूनच तुलसीदासांना जाणले. तुलसीदासांनी प्रत्यक्ष हिंदुजागरणाचे कठोर व्रतच जीवनात घेतलेले समजते. समग्र उत्तर भारतात विविध आखाड्यांची स्थापना तुलसीदासांद्वारे केल्या गेली. चळवळत स्वरूप यास क्रमप्राप्त झाले, तालमीत शरीर व मन बळकटीकरणाचे कार्य यातुन होऊ लागले. गावोगावी श्रीमारुतीची प्रतिस्थापना बलस्थान म्हणून तुलसीदासांनी केली. ब्रजभाषेतही कृष्णगीतावली, गीतावली, साहित्यरत्न, दोहावली, विनयपत्रिका साहित्यनिर्माण कार्य केले गेले. मारुतीरायांवरील प्रेमभक्तीमुळे हनुमानाष्टक, हनुमान बाहुका नि अमर कोटीजनांच्या मुखातून जो दैनिक मंत्र जपल्या जातो अशी हनुमान चालीसाही गोस्वामी तुलसीदासांद्वारे रचल्या गेली. भारतीय संस्कृतीचे एक अमरनायक म्हणूनच तत्त्वतः गोस्वामी तुलसीदाजींचा जीवनवृत्तांत एक स्मारक म्हणून हृदयात उभे आहेत.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
1 टिप्पण्या
गोस्वामी तुलसीदास यांचे विषयी खूप सुंदर आणि तथ्य पूर्ण माहिती दिल्याबद्दल अगदी मनापासून नमस्कार आणि आभार.