रामजन्मभूमी आयोध्यात टाईम कॅप्सूल (कालपात्र) पुरणार !

रामजन्मभूमी अयोध्या येथे 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. अतिशय भव्य दिव्य अशी राम मंदिराची रचना करण्यात आली असून जगातील तिसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर तर प्रभू रामचंद्रांचे जगातील सर्वात मोठे मंदिर म्हणून हे मंदिर नावारूपास येणार आहे. 

मागील पाचशे वर्षांपासून या मंदिरासाठी हिंदू समाज लढा देत आलेला आहे, अखेरीस 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील विवादित जागी मंदिर उभारण्यास परवानगी दिली. असे वाद भविष्यात निर्माण होऊ नये तसेच, इतिहास व पुरावे तात्काळ उपलब्ध व्हावे यासाठी अयोध्येच्या मंदिर परिसरात टाईम कॅप्सूल पुरण्यात येणार आहे. ही टाईम कॅप्सूल म्हणजे राम मंदिराचा इतिहास व तथ्यपूर्ण माहिती असणार आहे. रामजन्मभूमी ट्रस्ट चे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

काय असते टाईम कॅप्सूल?

'टाईम कॅप्सूल' म्हणजे महितीपत्राचा छोटासा संग्रह असतो. ज्यामध्ये तिथी, महत्वाच्या तारखा, नावे अश्या बाबींचा उल्लेख करण्यात येतो. जसे की या टाईम कॅप्सूल मध्ये राम मंदिराच्या इतिहाससंबंधी काही महत्वपूर्ण माहिती, मंदिराची न्यायालयीन लढाई, निकाल, त्याचे बांधकाम, त्याच्याशी संबंधित महत्वपूर्ण व्यक्तीचे नाव, सनावळ्या आदी माहिती अंतर्भूत असू शकते. जेणेकरून भविष्यात कैक वर्षांनंतर पुन्हा काही विवाद उद्भवल्यास किंवा अध्ययनासाठी मंदिराची माहिती मिळू शकेल.  

या टाईम कॅप्सूलद्वारे योग्य व सत्य माहिती जगासमोर येईल. ताम्रपत्रावर विशिष्ट पद्धतीने ही माहिती लिखित स्वरूपात मांडली जाते व हवाबंद पोकळी असलेल्या विशिष्ट धातूच्या नरसाळ्यात ते ठेऊन जमिनीत खोलवर पुरल्या जाते. 

या नरसाळ्यास कसलीही कीड लागत नाही, गंज चढत नाही किंवा त्याची झीजही होत नाही. हजारो वर्षापर्यंत ते सुस्थितीत राहू शकते. राम मंदिर परिसरात 2 हजार फूट खोल ही टाईम कॅप्सूल पुरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टाईम कॅप्सूलचा इतिहास

टाईम कॅप्सूल भारताच्या इतिहासात सर्वप्रथम राजा विक्रमादित्य ने पुरली असल्याचे सांगण्यात येते व त्यांनतर असा प्रयोग करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राज्यकर्ते आहेत, असे काही संत महात्म्यांनी एका  वाहिनीवर बोलताना सांगितले. 

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी असा प्रयोग दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात केल्याचे सांगितले जाते, परंतु त्याची अधिकृत माहिती मिळत नाही. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बर्म्युडा, चिली, ब्राझील, आईसलँड, फ्रांस, मलेशिया, नॉर्वे, पोलंड, रशिया या देशामध्ये टाईम कॅप्सूल चे उल्लेख आढळतात. 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या