कुशल संघटक कुशाभाऊ पुंडे...

🪔 नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती..

...कुशल संघटक कुशाभाऊ पुंडे...

साठ वर्षांपूर्वीचा संघ कसा असेल असा जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा  डोळ्यासमोर एका संघ कार्यकर्त्यांची आकृती  उभी राहते. डोक्यावर  संघाची काळी टोपी उजवीकडे कललेली, कांजी केलेली संघाची हाफ पँट,पांढरा शर्ट बाही दुमडलेला, कमरेला चामडी पट्टा पितळी बक्कल असलेला, पदवेश पटीस पुंगळ्या घातलेला व सदंड असा पूर्ण   गणवेश घातलेला स्वयंसेवक डोळ्यासमोर उभा राहतो. अशा "कडक" गणवेशाचा मी साक्षीदार  आहे.


अशा कडक गणवेषाचा परिणाम स्वयंसेवकाच्या मनस्थितीवर आपोआप होत असे. तो  समाजामध्ये वावरताना शिस्ती मध्ये सर्व व्यवहार करत असे. अशी कडक शिस्त बघण्यास समाजाला आनंद वाटत असे परंतु प्रत्यक्षात स्वतःहून अशी शिस्त अंगी बाळगून घेण्यास समाज तयार नसे. त्याकाळात समाजमन हे  अनुकूल नव्हते. संघावर ब्राह्मण लोकांचे वर्चस्व आहे असा शिक्का बसलेला होता, त्यामुळे बहुजन समाजातील मंडळी शाखेमध्ये येण्यास कचरत असत.  अशा काळामध्ये श्री. कुशाभाऊ पुंडे यांनी शहर कार्यवाह हे दायित्व स्वीकारले.

"की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने" याची जाणीव कुशाभाऊंना होती.शहर कार्यवाहाचे दायित्व स्वीकारल्यावर नगरपालिकेतील नोकरी सांभाळून बरेच कष्ट करावे लागतील याची कल्पना त्यांना होती.संघाचे वैशिष्ट्य असे की,कोणतेही पद हे शोभेचे पद नसते,त्या स्वीकारलेल्या पदाला योग्य  तो न्याय द्यायचा असतो.

कुशाभाऊंचा जन्म 1933 मध्ये  सर्वसामान्य कुटुंबात झाला. घरातली परिस्थिती अत्यंत बिकट होती. कुशाभाऊंचे पूर्ण नाव श्रीकृष्ण विश्वंभर पुंडे. संघ परिवारात ते कुशाभाऊ पुंडे या नावाने  परिचित होते. कुशाभाऊ  यांचे वडील पौरोहित्य करत असत. कुशाभाऊंना दोन भाऊ व एक बहीण.
कुशाभाऊंचे मित्र श्री. रघुजी रारावीकर यांच्याशी बोलणे झाले. रघुजी  कुशाभाऊंचे जिवलग मित्र होते.  त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कुशाभाऊंचे  जीवन चरित्र तीन भागात सांगितले.  सांसारिक  जीवन,  व्यावसायिक जीवन, संघ जीवन.

कुशाभाऊंचीआर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती. एकच वेळ जेवण हे त्यांचं ठरलेलं असे आणि घरामध्ये एक संस्कार असा होता की जो कोणी अतिथी येईल त्याला उपाशीपोटी पाठवायचं नाही. त्यामुळे त्यांना एखाद्या वेळेस खोटे सांगून माझं जेवण झालेले आहे, तुम्ही जेवायला बसा असं सांगावं लागत असे घरी आलेल्या अनेक स्वयंसेवकांना त्याचा अनुभव आलेला होता. कुशाभाऊंची आई प्रेमळ स्वभावाची होती त्यामुळे ती आलेल्या प्रचारक व इतर स्वयंसेवकांचा  अत्यंत प्रेमाने  आदर सत्कार करत असे. कुशाभाऊंना दोन भाऊ व एक बहीण. त्यांचे विवाह सुद्धा त्यांनी  अल्प खर्चामध्ये पार पाडले.
कुशाभाऊंच्या व्यावसायिक जीवनासंबंधी बोलतांना रघुजींनी सांगितले की, कुशाभाऊ नगरपालिकेमध्ये सुरुवातीला नाके कारकून म्हणून नोकरीला लागले. नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना ते त्याच बरोबर बाहेरून शिक्षण घेत असत. असं करत त्यांनी B.A. ची पदवी प्राप्त केली आणि नगरपालिकेच्या पदोन्नती करता ज्या परीक्षा असतात, त्या परीक्षा सुद्धा उत्तीर्ण होत होत शेवटी ते उपमुख्य अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.   त्यावेळेचे नगराध्यक्ष कॉम्रेड स.ना. भालेराव यांनी कुशाभाऊ यांचा सत्कार करतांना असे सांगितले की, कुशाभाऊ जर माझ्या संपर्कात लहानपणीच आले असते तर मी आज संघात असतो कारण त्यांच्या इतका कार्यकुशल अधिकारी हा संघ स्वयंसेवकच असू शकतो. नंतरचे नगराध्यक्ष श्री. सुरेश जैन यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या.

कुशाभाऊंचे संघ जीवन या बाबतीत बोलताना रघूजी  म्हणाले कुशाभाऊ हे  कुशल संघटक होते त्याच बरोबर ते कुशल व्यवस्थापकही होते आणि त्याला जोड म्हणजे त्यांचा संपर्क. या तीन गोष्टींमुळे कुशाभाऊचे संघ कार्य प्रांतात "जळगांव माॅडेल" म्हणून ओळखले जाऊ लागले. कुशाभाऊंचा स्वभाव सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा होता. ते टीम वर्क ला जास्त महत्त्व देत असत. एखादा कार्यक्रम यशस्वी झाला तर त्याचे श्रेय ते स्वतः कडे न घेता टीमचे यश मानत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काम करताना एक उत्साह असे. या स्वभावामुळे अनेक कार्यकर्ते कुशाभाऊंनी जोडले होते.अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे घरगुती संबंध होते.कार्यकर्त्यांची घरगुती भांडणे,आर्थिक अडचणी,सुख दुःखाचे प्रसंग यात कुशाभाऊंचा ज्येष्ठ बंधू म्हणून भाग असे.

संघामध्ये येणा-या स्वयंसेवकामधे कुठल्या प्रकारचे गुण आहेत याची कल्पना कुशाभाऊंना लगेच येत असे. माणूस "वाचण्याची" कला कुशाभाऊंना अवगत होती. एखादा स्वयंसेवक खूप चांगल्या पद्धतीने विषय मांडणी करु शकत असेल तर त्याला  बौद्धिक क्षेत्रांमध्ये काम करण्यास ते प्रवृत्त करत असत, एखादा कार्यकर्ता शारीरिक विषयांमध्ये रस घेत असेल तर त्याला शारीरिक विषयाशी जोडून देत असत, एखादा स्वयंसेवक उत्कृष्ट गायक असेल तर त्याला पद्य गायकांच्या टीम मधे  जोडुन देत.

कार्यकर्त्यांमध्ये संघ समज नीट येण्यासाठी कुशाभाऊ प्रयत्नशील असत. स्वयंसेवकांशी किंवा नागरिकांशी बोलतांना कुठे बोलावे, काय बोलावे, कसे बोलावे, काय बोलू नये याचं ते प्रत्यक्ष उदाहरण देऊन काम करत असत. ते स्वतः या बाबतीमध्ये कुठलेही प्रबोधन न करता स्वयंसेवकांना कृतीतून मार्गदर्शन करत असत. एकदा परमपूजनीय  श्रीगुरुजींचा कार्यक्रम होता. अनेक स्वयंसेवक जिल्ह्यातून येणार होते. या कार्यक्रमांमध्ये गुरुजींच्या बरोबर वार्तालाप होणार होता. या कार्यक्रमाची परवानगी प्रशासनाकडे मागितली असतां कलेक्टरांनी काही कार्यकर्त्यांना बोलावून घेतले आणि त्या काळामध्ये जमाव बंदी असल्यामुळे तुमचा कार्यक्रम कसा होऊ शकेल? असा प्रश्न  विचारला आणि जमावबंदीचे कारण पुढे केले.  तुम्ही संघाची मंडळी तर नियमांचे पालन करता, असं सांगून हा कार्यक्रम टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु कुशाभाऊंनी कलेक्टरांना त्यावेळेस स्पष्टपणे सांगितले की, संघ हा नियम देखील पाळत असतो परंतु ठरलेला जो कार्यक्रम आहे तो तसाच होण्याचा देखील प्रयत्न करत असतो.  संघाचा ठरलेला कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच होईल. असं स्पष्टपणे व निर्भीडपणे  कलेक्टर साहेबांना सांगितले आणि नंतर कलेक्टरांनी आपल्या  कार्यक्रमाला परवानगी दिली.अशावेळी संघाची भूमिका निर्भीडपणे मांडणे आवश्यक असते.अशा अनेक प्रसंगातून कुशाभाऊ कार्यकर्त्यांची संघ समज येण्यास मदत करत होते.

कुशाभाऊ संसारी प्रचारक होते. त्यांनी संसार करून देखील पूर्णपणे संघामध्ये लक्ष घातले. नगरपालिकेमध्ये  नोकरी करून इतर वेळ ते संघ कामांमध्ये घालवत असत त्यामुळे त्यांचे संसारात दुर्लक्ष होत असे. अनेक प्रचारक मंडळी कुशाभाऊंकडे येऊन त्यांचे मार्गदर्शन घेत असत. जळगाव शहरात तात्या बापट प्रचारक म्हणून आले असतांना जळगाव मध्ये  पहिला घोष त्यांनी उभा केला.त्या काळात पूर्ण गणवेशात घोषात चाळीस स्वयंसेवक उभे राहात असत.जळगांवचा घोष उभा करण्यात कुशाभाऊंचे मोठे योगदान होते.त्यानंतर तात्यांनी 350 स्वयंसेवक पूर्ण गणवेशात संचलनात उभे राहिल्यास सघोष संचलन निघेल अन्यथा  संचलन निघणार नाही अशी सुचना केली.तात्यांच्या सूचनेचा योग्य परिणाम झाला.त्यावर्षी संचलनात 350 संख्या पूर्ण गणवेशात उपस्थित होती. कुशाभाऊंच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यकर्त्यांची टीम काम करत होती.

अनेक प्रचारकांचा कुशाभाऊंना सहवास मिळाला. त्यात तात्या बापट, डाॅ.वसंतराव कुंटे, नाना ढोबळे, अण्णा राईलकर, आप्पाजी ओलतीकर, तात्या इनामदार ह्या नावांचा  विशेष उल्लेख करता येईल. कुशाभाऊ सर्व प्रचारकांना आपल्या घरातला फॅमिली मेंबर समजत असत. प्रचारक आपल्या खाजगी गोष्टी ज्या ते इतर स्वयंसेवकांना सांगू शकत नसत त्या गोष्टी  प्रचारक कुशाभाऊंशी मोकळेपणाने  शेअर करत असत. आपल्या अडचणी सुद्धा ते कुशाभाऊंशी मोकळेपणाने बोलत  असत.  त्यामुळे कुशाभाऊंना नेहमी वाटे की जे प्रचारक आपले घर  सोडून  संघ कामासाठी बाहेर पडले, त्यांच्यासाठी एक घर तरी असे असावे की जिथे ते आपले मन मोकळे करू शकतील. त्यामुळे संघाच्या प्रचारकांशी  त्यांची वेव्ह लाईन चांगली जमत असे. रघुजी रारावीकर यांच्याशी संवाद करताना मी त्यांना कुशाभाऊंच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग कोणता होता ते विचारले. त्यावर त्यांनी पूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याबरोबर वार्तालाप नागपूर येथील महाल कार्यालयांमध्ये झाल्याची घटना सांगितली.

कुशाभाऊ त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाप्रीत्यर्थ नागपूरला गेले असतांना ते नागपूर येथील महाल संघ कार्यालया मध्ये गेले. तेथे सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर पूजनीय सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस यांनाही भेटले( त्या वेळी मा.बाळासाहेब देवरस हे सरकार्यवाह होते) बाळासाहेब देवरस यांनी त्यांना,' लग्न समारंभ झाल्यानंतर तुम्ही संघ कार्यालयात एक दिवस मुक्कामी या' असे  सांगितले. त्यावरून कुशाभाऊ हे संघ कार्यालयात एक दिवस  थांबले. त्यावेळेस बाळासाहेबांनी कुशाभाऊंना  जळगावचा संघ कसा चालला आहे अशी विचारणा केली.कुशाभाऊंनी सगळी माहिती जळगाव शाखेची दिली. त्यांनी  सर्व माहिती ऐकून घेतली आणि त्यांनी खूप समाधान व्यक्त केले. हा त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस होता.
   
1975 हे वर्ष संघ स्वयंसेवकांसाठी अग्नीपरिक्षेचे होते.अनेक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले होते.कुशाभाऊ देखील नाशिक कारागृहात 15 महिने  स्थानबद्ध होते. कारागृहात त्यांना संघाच्या अनेक अधिका-यांचा सहवास मिळाला. 1977 साली वर्ष प्रतिपदेचा त्यांची कारागृहातून मुक्तता झाली.

1988 मध्ये कुशाभाऊंनी नगर पालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आग्रहाखातर त्यांनी जनता बँकेमध्ये संचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.1991 ते 1998 पर्यंत ते जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. नगरपालिकेमध्ये काम करताना त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव त्यांना जनता बँकेमध्ये काम करताना  उपयोगी ठरला. जनता बँकेच्या सर्व कामांमध्ये ते  लक्ष घालत. बँकेच्या इतिहासामध्ये 1992 मधे जुन्या प्रचारकांचा सत्काराचा कार्यक्रम हा कुशाभाऊंनी प्रामुख्याने पुढाकार घेऊन ठरवला होता. जळगांव मधून जे प्रचारक निघालेले होते त्या सर्व प्रचारकांचा सत्कार बँकेने आयोजित केला होता तो कार्यक्रम तात्या बापट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठरवलेला होता. त्या कार्यक्रमात माननिय कै. मोरोपंत पिंगळे यांची उपस्थिती होती.संघकार्य करण्यासाठी बाहेर निघालेल्या प्रचारकांना  कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम होता.

1999 वर्ष पुंडे कुटुंबीयांना अत्यंत क्लेशकारक गेले. कुशाभाऊंना घशाचा कॅन्सर झाला. बरेच इलाज करुनही सुधारणा होत नव्हती. अखेर 13/08/1999 ला त्यांना देवाज्ञा झाली. कुशाभाऊंचे जीवनकार्य श्री. रघुजी रारावीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडण्याचा प्रयत्न केला.या क्रियाशील कार्यकर्त्याचे जीवन कार्य भावी पिढीला पथदर्शक होईल.

कुशाभाऊंना विनम्र आदरांजली.

दीपक गजानन घाणेकर
( मो.नं. 9423187480 )

कै. कुशाभाऊंच्या कुटुंबीयांचे मनोगत......

नमस्कार ,

माझे ज्येष्ठ बंधू कुशाभाऊ हे रा.स्व. संघाचे एकनिष्ठ व तत्वनिष्ठ स्वयंसेवक ! जळगांव शहराचे ते शहर कार्यवाह होते.साहजिकच आमच्या घरी स्वयंसेवक, प्रचारक इ. चे नेहमीच येणे - जाणे असे. माझी आई सर्वांचे आपुलकीने, मायेने स्वागत करी. देशासाठी काम करणाऱ्या या लोकांच्या त्यागाची, कार्याची तिला जाणीव होती. आपला मुलगा जे काम करतो त्याबद्दल तिला अभिमान वाटे. त्यावेळी आमची परिस्थिती बेताचीच होती.एकदा सर्वांची जेवणे झाल्यावर आपले ताट वाढून घेऊन आई जेवायला बसणार तोच बाहेरगावाहून एक प्रचारक आले. त्यांचे जेवण व्हायचे आहे हे कळल्यावर कोणालाही कळू न देतां आपले वाढलेले ताट तिने आनंदाने त्यांच्यासमोर ठेवले. कर्तव्यपूर्तीच्या समाधानानेच त्यादिवशी तिचे पोट भरले.
      
कुशाभाऊंचा संघ कानानिमित्त प्रवास होत असे. अनेकदा त्यांच्याकडे  लोक आपल्या अडचणी, तक्रारी घेऊन येत. त्यांचे योग्य प्रकारे समाधान करीत. अशाप्रकारे कुशाभाऊंच्या कार्याचा ठसा आमच्या घरातील सर्वांवर खोलवर उमटला आहे. जीवनभर संघ कार्यास वाहून घेतलेल्या कुशाभाऊंस माझी विनम्र आदरांजली !

श्री. नलिनी फडणीस
मो.नं. - ९४०३४७८७१७
--------

नमस्कार ,

आमच्या वडिलांचे निधन होऊन आज बरोबर २१ वर्षे होत आहेत. परंतु ते त्यांच्या कार्य कर्तृत्वाने विचारांनी आजही  आमच्या सोबत आहेत. आज इतकी वर्षे झाली आम्ही आमच्या क्षेत्रात कार्यरत आहोत परंतु आम्हा चौघांना ही कुशाभाऊंची मुलगी किवा कुशाभाऊंचा मुलगा म्हणून ओळखतात आमच्या साठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भेटणारा अतिशय जिव्हाळ्याने त्यांच्या विषयी बोलतो, त्यांच्या कार्याची भरभरून आठवण काढतो, त्यांनी कश्या प्रकारे मदत केली होती हे आवर्जून सांगतो, त्या वेळी आमचे वडील आम्हाला नव्याने समजतात, त्यांनी केलेल्या अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला नवीन आहेत, सांगणार्‍या साठी ती गोष्ट आयुष्यभर लक्ष्यात राहणारी असते. अनेकांच्या मनात असलेले कुशाभाऊ हे आमच्या साठी या रूपाने कायम सोबत आहेत.
त्यांनी शेवट पर्यन्त संघ विचार जपला, इतरांमध्ये रुजवला, त्रास सहन करावा लागला तरी विचार सोडला नाही आम्हा साठी हे अभिमानाचे आहे. संघामुळे आमच्या कुटुंबाशी अनेक कुटुंब जोडली गेली जी आमच्या कुटुंबाच्या खूप जवळ होती व अजूनही आहेत.  अर्थात आमचे बाबा संघ कार्य करू शकले ते आमच्या आईच्या सोबतीमुळेच. आणीबाणीत पंधरा महीने बाबा बंदिवासात असतांना तिने ज्या पद्धतीने आम्हाला व इतरांना ही सांभाळले, तिच्या आठवणीशिवाय बाबांचे कार्य पूर्ण होऊ शकणार नाही असे आम्हा चौघांना वाटते. फक्त आमचे वडीलच नव्हे तर खर्‍या अर्थाने आमची आई देखील आयुष्यभर संघ जगली.

सौ. विभावरी, सौ. विजया, सौ. विद्या व विवेक श्रीकृष्ण पुंडे.
( 9823083888 )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या