अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झळकणार रामजन्मभूमी भूमीपूजन सोहळा

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झळकणार रामजन्मभूमी भूमीपूजन सोहळा 

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील हिंदू समाजाचे प्रमुख आणि अमेरिकन इंडियन पब्लिक अफेर कमिटीचे अध्यक्ष जगदीश शेहानी यांनी रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. पीटीआयशी बोलताना जगदीश यांनी जगप्रसिद्ध टाइम्स स्वेअर येथे प्रभू रामांचे मोठे चित्र झळकवले जाणार असल्याची माहिती दिली आहे. 

५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अयोध्येमध्ये मंदिराचे भूमिपूजन करतील त्याच दिवशी टाइम्स स्वेअरवरील बिलबोर्डवर प्रभू रामांची थ्री डी प्रतिमा झळकवून सोहळ्याचा आनंद साजरा केला जाणार असल्याचे जगदीश म्हणाले. हा एक ऐतिहासिक दिवस असल्याने आम्ही तो अमेरिकेमध्येही साजरा करणार असल्याचे जगदीश यांनी स्पष्ट केलं आहे.

पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री १० वाजल्यापर्यंत या स्क्रीनवर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी विशेष फोटो आणि व्हिडिओ दाखवले जाणार आहेत. यामध्ये 'जय श्रीराम' असा हिंदी आणि इंग्रजीमधील मजकूर, प्रभू रामाची चित्रं, व्हिडिओ आणि थ्री डी चित्रंही दाखवली जाणार आहेत. तसेच मंदिराची रचना कशी असेल याचबरोबर त्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याचे फोटोही या स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळेच अयोध्येबरोबरच जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ असणाऱ्या टाइम्स स्कवेअरवरही जय श्रीरामच्या घोषणा आणि फोटो पहायाला मिळणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या