राममंदिर भूमीपूजनसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान 'महू' येथून जाणार पवित्र माती

#राममंदिर भूमीपूजनसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान 'महू' येथून जाणार पवित्र माती

देशभरातून आनंद आणि हर्षोल्हासित वातावरणात हजारो पवित्र स्थळांची पवित्र माती तसेच पवित्र नद्यांचे पाणी हे श्रीराम जन्मभूमीच्या पूजनासाठी पाठविले जात आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्या येथे राममंदिराचे भूमीपूजन होणार आहे. त्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थान असलेल्या 'महू' येथील पवित्र मातीसुद्धा नेण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री श्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अयोध्येतील श्रीराममंदिर येथे राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय स्वाभिमान व सामाजिक समरसतेचे दर्शन घडेल असे प्रतिपादन मिलिंद परांडे यांनी यावेळी केले. महू येथील पवित्र मातीसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उगमस्थान नागपूर, संत रविदास यांचे काशी येथील जन्मस्थान, सीतामढी येथील वाल्मिकी आश्रम, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातले कचारगड, झारखंड येथील रामरेखाधाम, मध्यप्रदेशातील तंट्या भिल्लाची पुण्यभूमी, श्री हरमंदिर साहिब अमृतसर, दिल्ली येथील जैन लाल मंदिर, महात्मा गांधी यांनी जिथे ७२ दिवस वास्तव्य केले ते वाल्मिकी मंदिर आणि महाराष्ट्रातुन शिवनेरी, रायगड, वढू बुद्रुक, नांदेड व पैठण अश्या पुण्य स्थळावरून पवित्र जल व मातीही येणार आहे.

सर्व रामभक्तांनी ५ ऑगस्ट रोजी आपापल्या घरी, मठ मंदिरांमध्ये, आश्रमांमध्ये सकाळी १०:३० वाजता सामुहिक स्वरूपात आपल्या आराध्य दैवताची पूजा करावी, फुले वाहावीत, आरती करावी आणि प्रसाद वाटावा. अयोध्येतील कार्यक्रम समाजाला लाइव दाखविण्याची व्यवस्था करावी. घरांमध्ये, वस्त्यांमध्ये, गावांमध्ये, बाजार, मठमंदिरे, गुरुद्वारा, आश्रमांमध्ये सजावट करून सायंकाळी दिवे लावावेत. मंदिर निर्मितीसाठी यथाशक्ती दान करण्याचा संकल्प करावा. प्रचाराच्या सर्व साधनांचा उपयोग करून हा कार्यक्रम समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा. या सर्व कार्यक्रमांच्या दरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व साधने वापरून काळजी घ्यावी आणि सरकारी तसेच प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही विहिंप केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले आहे.  

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या