"आपल्या सगळ्यांना आपल्या मनाची अयोध्या सजवायची आहे."

@विभावरी बिडवे

काही क्षण येतात ह्या शतकात,  अमुक विभूतींबरोबर जन्मलो,  जगतो आहोत,  आपल्यासोबत ते जगाच्या पाठीवर कुठेतरी आहेत आणि हे जग आपण त्यांच्याबरोबर शेअर करत आहोत ह्याबद्दल अतिशय आनंद होतो.  आजचा दिवस तसा होता.  

एका नेत्याचे काम झाल्या गोष्टीचे फलित सांगायचे आणि त्यापुढील अनेक वर्षांची  दिशा दाखवायचे. योगींचें भाषण भारताने स्वीकारलेल्या लोकतांत्रिक मार्गातून संघर्ष दूर केला हे सांगणारे होते.  (ज्याचा विशेष आनंद झाला.) आजचे मोदींजींचे भाषण तर सगळ्या प्रांतिक भाषिक अस्मितांना कवेत घेऊन राष्ट्रीयत्वावर एक आणण्यासाठी होतेच.  त्यामध्ये भारतातील विविध रामायणे सोबत जगभरात पोहोचलेला राम अशा उल्लेखांमुळे  राष्ट्रीयत्वातून वैश्विक होणारे होतेच. मात्र  सर्वाधिक आवडले ते डॉ.  मोहनजींचे! ते संघर्षाचे फलित आणि इथून पुढची सामाजिक दिशा दाखवणारे,  अत्यंत प्रेरणादायी,  मार्गदर्शक होते. बऱ्याचशा त्यांच्याच शब्दात त्यातील आवडलेला भाग देते - 

भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आवश्यकता होती, ज्या आत्मभानाची आवश्यकता होती, त्याचे  सगुण साकार रूप होण्याची सुरुवात आज होत आहे. ते रूप अध्यात्मिक दृष्टीचे आहे, सगळ्या जगाला आपल्यामध्ये आणि आपल्याला सगळ्या जगामध्ये बघण्याची भारताची दृष्टी, तिच्यामुळे त्यातील प्रत्येक व्यक्तीचे  वागणे आजसुद्धा जगात सगळ्यात सज्जनतेचे वागणे असते. आणि त्या देशाचा सर्वांसाठी सामुहिक व्यवहार हा ‘वसुधैव कुटुंबकम’ असा असतो. जितकं शक्य तितकं सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा हा स्वभाव. त्याचं अधिष्ठान आज इथे निर्माण होत आहे. 

ह्या आनंदात एक उत्साह आहे. आम्ही हे करू शकतो ही भावना आहे. ह्या कोरोनामुळे सर्व जग अंतर्मुख झालं आहे. कुठे चूक होतेय ह्याचा विचार करत आहे. कसा मार्ग काढायचा... दोन रस्ते चाचपडून बघितले. तिसरा रस्ता कुठे आहे का? हो आहे, आमच्याकडे आहे. आम्ही देऊ शकतो. देण्याचं काम आम्हाला करायचं आहे. त्याची तयारी करण्याच्या संकल्पाचा आजचा दिवस आहे. त्याच्यासाठीचा आवश्यक पुरुषार्थ आम्ही केला आहे. राम चरित्रापासून आजपर्यंत बघितलं तर पराक्रम, वीरवृत्ती आमच्याकडे आहे. ती आम्ही गमावलेली नाही. आम्ही सुरु केलं तर नक्की होईल, ह्याचा विश्वास, स्फुरण, प्रेरणा आजच्या दिवसानी मिळत आहे. 

सर्व भारतवासियांना मिळत आहे. कोणीही अपवाद नाही. कारण सगळे रामाचे आहेत, आणि सगळ्यांमध्ये राम आहे. आणि त्यामुळे भव्य मंदिर होतंय.  सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. मग आपल्याला काय काम असेल? आपल्या सगळ्यांना आपल्या मनाची अयोध्या सजवायची आहे. ह्या भव्य कार्यासाठी प्रभू श्रीराम ज्या धर्माचे प्रतिक मानले जातात तो जोडणारा, धारण करणारा, उन्नत होण्यासाठी  हात देणारा धर्म, सर्वांची उन्नती करणारा धर्म, सर्वांना आपला मानणारा धर्म, त्याच्या ध्वजाला आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण विश्वाला सुखशांती देणारा भारत आपण उभा करू शकू ह्यासाठी आपल्याला आपल्या मनाची अयोध्या निर्माण करायची आहे. इथे जसजसे मंदिर होईल तशी ती अयोध्याही निर्माण व्हायला पाहिजे. आणि हे मंदिर पूर्ण होण्याअगोदर आपले मन मंदिर पूर्ण झालेले असले पाहिजे. ह्याची आवश्यकता आहे. आणि ते मनमंदिर कसे असेल? 

काम कोह मद मान न मोहा। 
लोभ न छोभ न राग न द्रोहा॥
जिन्ह कें कपट दंभ नहिं माया। 
तिन्ह कें हृदय बसहु रघुराया॥१॥

जाति पाँति धनु धरमु बड़ाई। 
प्रिय परिवार सदन सुखदाई॥
सब तजि तुम्हहि रहइ उर लाई। 
तेहि के हृदयँ रहहु रघुराई॥३॥

आमच्या हृदयात रामाचा वास असायला पाहिजे. ह्यासाठी सगळ्या दोषांपासून, विकारापासून, द्वेषापासून, शत्रुतापासून मुक्त दुनियेची माया कशीही असुदे, त्याच्यासाठी सर्व प्रकारचे व्यवहार करण्यासाठी समर्थ आणि हृदयातून सर्व प्रकारच्या भेदांना तिलांजली देऊन  सर्व केवळ देशालाच नाही तर सगळ्या जगाला आपलं म्हणण्याची क्षमता असणारी ह्या देशाचा व्यक्ती  आणि ह्या देशाचा समाज निर्माण करण्याचा आणि त्या निर्मितीच्या कामाचे सगुण साकार प्रतिक  जो सदैव प्रेरणा देत राहील, ते इथे निर्माण होत आहे. भव्य राम मंदिर बनण्याचे काम, भारतवर्षातील लाखो मंदिरे बनवण्याच्या कामासारखे नाहीय. त्या सगळ्या मंदिरांतील मूर्तींचा जो आशय आहे त्या आशयाचे पुनर्प्रकटीकरण आणि पुनर्स्थापन करण्याच्या कामाचा शुभारंभ आज येथे मंगल हातांनी झाला आहे.  

(कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृ. मूळ भाषण ऐकावे.)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या