जन्मगाव धुळे असलेले राम सुतार साकारणार प्रभू रामचंद्रांची भव्य मूर्ती!
अयोध्येत शरयू नदीच्या काठावर बसविण्यात येणारी श्रीरामाची उंच मूर्ती साकारण्याचे काम ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. राम सुतार यांनी आतापर्यंत १५०० हुन अधिक पुतळे साकारले आहेत. ९५ वर्षीय राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ. स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला आहे. आणि धुळे करांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.
मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून राम सुतार यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. सध्या ते दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. नोएडात त्यांचा स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत.
अयोध्येतील श्रीरामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. चीनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (२०८ मीटर) प्रभू रामचंद्रांचा उंच पुतळा असणार आहे. २० मीटर उंचीचे चक्र ५० मीटर उंचीच्या पायावर असणार आहे आणि पायाखाली साकारण्यात येणार्या डिजिटल संग्रहालयात भगवान विष्णूंचे विविध अवतार असणार आहेत.
राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.५ मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२ मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, संसदेतील १६ पुतळ्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसह मौलाना आझाद यांचे पुतळेही त्यांनी साकारले आहेत. असे ५० हून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत.
ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांनी आतापर्यंत साकारलेले काही शिल्पे:
४५ फुट उंच चम्बळ देवी मूर्ति, गंगासागर, मध्य प्रदेश
२१ फुट उंच महाराजा रणजीत सिंह मूर्ति, अमृतसर
१८ फुट उंच सरदार वल्लभ भाई पटेल मूर्ति, संसद भवन नवी दिल्ली
१७ फुट उंच महात्मा गांधी मूर्ति, गांधीनगर, गुजरात
९ फुट उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्ति, जम्मू
१९५८-५९ मध्ये राम सुतार हे भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयात तांत्रिक सहायक म्हणून नोकरी करत होते. परंतु नंतर त्यांनी नोकरी सोडून मुक्त मूर्तिकाराचे काम सुरू केले. आपला छंद जोपासला व त्यालाच मोठे केले. तसेच अजंठा आणि वेरूळ येथील अनेक मूर्तींचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना १९९९ मध्ये राम सुतार यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनंतर पद्मभूषण आणि टागोर अॅवॉर्डनेही सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या