@ रवींद्र मुळे
वर असलेल्या शीर्षक गीता प्रमाणे संघ ही एक नदी प्रमाणे स्थापने पासून प्रवाही बनून वाहत राहिली आणि आपल्या बरोबर अनेक समाज जीवन सामावून घेत विस्तीर्ण होत राहिली. प्रवाही नदी जशी चैतन्याने फुललेली असते, येणारे अडथळे पार करताना प्रसंगी वळसा घालत, प्रसंगी घर्षण करून उंच डोंगरांना कापत आणि प्रसंगी धबधबा बनून विलक्षण रौद्र रूप धारण करते. तसेच संघ जीवनाची वाटचाल होत राहिली आहे. नदी अखेर समुद्राला जाऊन मिळतेच. कारण तिचे गंतव्य ठरलेले असते, तसेच संघाचे गंतव्य स्थान म्हणजे ह्या देशाला, ह्या संस्कृती ला आणि या हिन्दू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजाला पूनर्वैभव प्राप्त करून देणे हे होय.
या गंतव्य स्थानाच्या अगदी नजिक संघ पोहचला आहे. आणखी एक गीता मधून जसे म्हंटले आहे कळस दिसू लागले अशी स्थिती आहे. संघाला स्थापन होवून ९५ वर्ष पूर्ण झाली आहेत. संघाचे इतिहासात
दोन वेळेस संचलन होवू शकले नाही ते बंदी मुळे आणि आता नाही झाले ते या महामारी मुळे. त्या मुळे हा संघाच्या इतिहासातील एक आगळा वेगळा उत्सव आहे त्या निमित्ताने काही चिंतन शब्द बध्द करत आहे.
एखाद्या संघटनेचे मार्गक्रमण ९५ वर्ष अविरत चालू राहणे, त्यात कुठे ही स्थापनेच्या उद्देशा पासून न भरकटणे, अधिष्ठान आणि कार्यपद्धती यात कुठलाही मूलभूत फरक न पडणे ( कार्य पद्धती मध्ये मामुली बदल हे परिस्थिती नुसार झाले. पण ते मूलभूत नाहीत) आणि मुख्य म्हणजे संघटनेचे कार्य दीन प्रतिदिन वृध्दींगत होणे हा एकूणच संघटना म्हणून जो प्रवास झाला तो समाजशास्त्र , राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यास करणाऱ्यांना अभ्यासण्यासाठी एक आवाहन आणि आव्हानच आहे.
असां चिकित्सक अभ्यास निरपेक्ष पणे करणारी मंडळी संघाच्या यशाचे रहस्य शोधायला लागले तर त्यांना प्रामाणिक पणे वस्तुस्थिती मांडता येईल. आणि ती संघ हिता पेक्षा देश हिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे प्रामाणिक पणे वाटते.
संघावर अत्यंत जुजबी वरवरची माहिती घेऊन पूर्वग्रह ठेवून संघाचे विश्लेषण करण्याची येथे एक विचारवंतांची फळी भारतात उभी राहिली. (संघ ,हिंदुत्व याबद्दल नकारात्मक बोलणे म्हणजे विचारवंत म्हणून मान्यता मिळणे हे विचार विश्वात जणू समीकरणच झाले) आणि मग समाजात संघाबद्दल अनेक गैर समज पसरत राहिले. बरं संघाच्या कार्यपद्धतीमुळे संघाला कधी स्वतः हुन आम्ही असे आहोत असे सांगायची आवश्यकता वाटत नव्हती पण ज्यांनी प्रामाणिक पणे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यांच्या पासून संघाने काही लपवले पण नाही. त्या मुळे संघावर अनेक आरोप होत राहिले पण संघ 'हाथी चले अपनी चाल' या न्यायाने चालत राहिला.
आज ९५ वर्ष संघाची पूर्ण झालेली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा निदान या देशावरती प्रेम करणाऱ्या पण प्रत्यक्ष संघ कार्यात सहभागी नसणाऱ्या महानुभवानी अभ्यास करण्याची गरज आहे. संघाची मुळातच धारणा 'सब समाज को लिये साथ मे' अशीच आहे. या विशाल देशात जेथे भाषा, वस्त्र, हवामान, अन्न यात खूप वैविध्य आहे तेथे संघ आणि समाज एकरूप झाल्याशिवाय या देशाचे
भले होणार नाही.
संघाची हिंदू म्हणून व्याख्या किंवा हिंदू राष्ट्राची संकल्पना नेमकी काय आहे ? आपल्या कडे आक्रमक टोळ्या आणि कावेबाज इंग्रज यांच्या अधिपत्य राहिल्या नंतर हिंदू हा शब्द उच्चारला की अंगावर पाल पडली असे होत असे. एक न्युनगंड निर्माण झाला होता. दुर्दैवाने ही परंपरा स्वातंत्र्य मिळाल्यावर कायम राहिली. या न्युनगंडातूनच देशाची फाळणी त्या वेळेसच्या नेतृत्वाने स्वीकारली होती.
फाळणीनंतर एकत्रित भारताची वाटचाल जर योग्य दिशेने झाली असती तर संघाची आवश्यकता नव्हती पण दुर्दैवाने स्वतंत्र भारतात देशाची वाटचाल ज्याची सुरुवात इंग्रजांनी करून दिली होती त्याच पायावर सुरू झाली.
या देशाचा उज्वल इतिहास, प्राचीन परंपरा आणि उच्च जीवन मूल्ये सांगणारी संस्कृती या पेक्षा जणू आता आम्ही नवीनच देश उभा करत आहोत असा आव आणण्याच्या नादात येथील सत्ताधारी, इंग्रजाळलेले सनदी अधिकारी आणि डाव्या विचारसरणीचे लोक यांनी वेगळीच मिथिके मांडली. ती पाठ्य पुस्तकात घुसवली आणि तेच सत्य समजून आमची एक एक पिढी घडत गेली. अशा विचाराने तयार झालेली मंडळी राजकारणात आली. सनदी नोकर झाली . न्याय व्यवस्थेत गेली आणि मुख्य म्हणजे शिक्षण क्षेत्रावर तर त्यांनी कब्जाच मिळवला.
संघाचा विश्वास हा कधीच व्यवस्था परिवर्तन करून ध्येय साध्य करण्याचा नव्हता आणि आज ही नाही. त्या मुळे राजकारणात जी तुरळक कार्यकर्ते गेले किंवा ज्यांना जायला सांगितले त्यांचे काय चालले आहे आणि काय चुकते आहे याचे दिशादर्शन या पलीकडे
संघाची किंवा संघ नेतृत्वाची भूमिका नव्हती. ( या पेक्षा अधिक राजकारणात आपला संबंध असावा असा संघ संस्थापक यांचा हेतू नव्हता)
अर्थात संघाचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे ते व्यक्ती निर्माण किंवा मनुष्य परिवर्तन आणि त्यातून सामाजिक परिवर्तन या प्रक्रियेची गती पण तुलनेने कमी आहे. याला मुख्यत्वे कारण हे त्या पद्धतीत च आहे. पण संघाला कुठली घाई नव्हती.
कारण शेकडो वर्षाची दुरुस्ती एका जादूच्या कांडीने होईल किंवा क्रांती होईल यावर सर्वकालिक संघ कार्यकर्ते अथवा नेतृत्वाचा विश्वास नव्हता. त्या मुळे संघाने दीर्घकालीन आणि अडचणीचा मार्ग दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नसल्याने जाणीवपूर्वक स्विकारला आहे हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणूनच संघात मागील वर्षांचा आढावा घेताना ती वर्ष वाया गेली आहेत, खूप वेळ गेला आहे, अशा अर्थाने कधी चिंतन होत नाही. उलट या संपूर्ण काळात जी तपश्चर्या झाली ती एका उत्कट ध्येय पूर्तीकडे नेणारी कठोर साधना होती, असेच मानले जाते. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या वैचारिक आणि राजकीय संघर्षात संघाची वाट ही प्रवाहा विरूद्ध पोहण्याचीच होती.
संघ प्रत्यक्षपणे दोन हात करण्याच्या भानगडीत पडला असता तर कदाचित मुळ ध्येय वाटचाली पासून भरकटणे संभव होते. म्हणून आपल्या ध्येयाकडे एकचित्ताने संघ, संघाचे नेतृत्व आणि संघ कार्यकर्ते वाटचाल करत राहिले.
या प्रवासातील टप्प्यांचा आपण उद्या विचार करू.
(क्रमशः)
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या