स्व.मुकुंदराव पणशीकर- पाचवा स्मृतिदिन...



संघातल्या ५ पिढयांसोबत काम केलेले मुकुंदराव शब्दात बसणारं व्यक्तिमत्व नव्हतं. १९६२ ला प्रचारक म्हणुन निघाल्यानंतर ते पहिल्यांदा दापोलीला प्रचारक म्हणून आले. तेव्हापासुनच्या त्यांच्या कार्यपद्धतीचा कथा ऐकत ऐकत अनेक जण संघात मोठे झाले. माझ्यासारख्या अनेकांच्या वडिलांना मुकुंदरावांनी किशोरावस्थेत संघदर्शन घडवलं आणि त्याच सहजतेने त्यांच्यापेक्षा ४०- ४५- ५० वर्षांनी लहान असलेल्या प्रचारकांना आणि कार्यकर्त्यांना समजून घेऊन त्यांच्याकडुन योग्य त्या दिशेने काम करून घेतलं.

आकर्षक वक्तृत्व नाही, पुस्तकांचे ढीग वाचलेले नाहीत, लेख लिहिणं नाही, संघ कामात लागेल तेवढंच भाषण तेही कथा- उपमा- विनोद यापासून कोसो दूर असंच, मांडायचा विषय संपला की बोलणं संपलं! माझ्याकडून काही शिका, मी सांगतो तसं करा हा शब्द कशी ऐकायला मिळणार नाही. पण तरीही त्यांच्या मनातल्या कल्पना ते कोणत्याही वयाच्या प्रचारक- कार्यकर्त्यांकडून जमिनीवर त्यांना हव्या त्या पद्धतीने उतरवून घायचे!  हे ते कसं करायचे माहीत नाही, पण ते व्हायचं...

हजारो कार्यकर्ते, प्रचारक त्यांना बघत बघत संघात मोठे झाले आणि शेकडो प्रकल्प, योजना त्यांनी कमीत कमी बोलून नियोजन ते अंमलबजावणी पर्यंत मार्गी लावल्या. अनेक वेळा कार्यकर्त्यांनी केलेल्या चुका पोटात घातल्या, एवढंच नाही ज्याची चूक समोर येईल त्याला काही काळ कामातून बाजूला केलं पण पुढच्या महिन्याभरात त्याच्या घरी जाऊन राहिले, बोलले, संपर्कात राहिले आणि परत त्याला कामात आणलं.

मेघालय- नागालँडच्या संघकामात महाराष्ट्रातून पाठवलेल्या प्रचारकांना   महाराष्ट्रातून प्रांत प्रचारकांनी जाऊन वर्षातून एकदा  भेटावं असं एकदा ठरलं, ते शेवटपर्यंत त्यांच्या वेळापत्रकाचा भाग बनून राहिलं. तिथे पाठवलेलं प्रचारक काय स्थितीत राहतात, त्यांच्या गरजा काय आहेत, त्या कधीपर्यंत पुऱ्या करणं आवश्यक आहे याचा पुरेपूर तक्ता त्यांच्या डोक्यात असायचा आणि प्रचारकाने एकदा कळवलेली गरज मुदतीच्या आधी पूर्ण झालेली असायची. तिथे पाठवलेल्या प्रचारकांनी एकदाही- अक्षरशः एकदाही मा. मुकुंदरावांना आठवण करावी लागली असं झाल्याचं कधी ऐकलेलं किंवा अनुभवलेलं नाही.

मा. मुकुंदरावांचा शब्दकोश आणि व्यवहारकोश...
अनेक वेळा एखाद्याने काही अपेक्षा व्यक्त केली की त्याला शांत करण्यासाठी, तात्पुरतं समाधान देण्यासाठी आपण "बघु" काय करता येईल ते, असं म्हणून जातो आणि त्याचा तेवढाच अर्थ समोरचा घेतो. पण मुकुंदरावांच्या भाषेत "बघु" याचा अर्थ "नक्की करतो" हा असायचा. एखाद्या गोष्टीची त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली किंवा एखादी योजना त्यांच्यासमोर मांडली आणि ती करणं त्यावेळी आवश्यक नसेल तर त्याला "आता आपली अशी योजना नाही", असं उत्तर मिळायचं- याचा अर्थ यात मुकुंदराव काहीही करणार नाहीत म्हणजे "पूर्णविराम" असा असायचा.

धर्म जागरण समन्वय विभागाच्या सुरुवातीपासून त्यांनी जी नवी कार्यपद्धती आणि रचना लावली ती केवळ अद्भुत या सदरात मोडणारी होती. त्यासंदर्भात इथे फार लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणून लिहीत नाही...

झगमगाटाच्या जगात राहूनही अत्यंत आवश्यक तेवढंच बोलून, संघकामासाठी जे आवश्यक आहे तेच घेऊन, अनावश्यक ते निर्दयपणे बाजूला सारून ते सतत कामात राहिले. महाराष्ट्रात भाजपचं पहिलं सरकार असताना, त्यांनी मेघालयातल्या एका प्रचारकाला कार्यालयात भेटण्यासाठी बोलावलं होतं. नेमके त्याचवेळीभाजपचे दोन वरिष्ठ मंत्री त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात आले होते. पण गेल्या गेल्या प्रचारकाला एकाने निरोप दिला कि तु मुकुंदरावांच्या खोलीच्या दरवाजात जाऊन त्यांना तू आला आहेस हे दाखवून ये. त्याप्रमाणे तो प्रचारक तिथे गेला, मुकुंदरावांनी त्याला बघितलं आणि इथेच थांब म्हणून सांगितलं. यानंतर तो प्रचारक दरवाजासमोरून थोडा बाजूला उभा राहिला. मग त्याला आतला मुकुंदरावांचा संवाद ऐकायला आला, ते त्या २ मंत्र्यांना म्हणाले, "ठीक आहे, भेटू आपण नंतर; मेघालयातून एक प्रचारक आलाय मला भेटायला त्यामुळे आता मी त्याला भेटतो, बाकी काय ते नंतर बोलू!"

या संवादानंतर ते मंत्री महोदय बाहेर आले आणि प्रचारक आत गेला. पण आपल्या भेटीला मुकुंदराव किती महत्व देतात हे त्याच्या जन्मभर लक्षात राहिलं!
प्रचारक- कार्यकर्ता सांभाळून ठेवण्यासाठी त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक, व्यावहारिक समस्या तासंतास ऐकून घेतल्या. त्यावर काही उपाय करता आले ते केले, पण नुसत्या त्या ऐकून घेतल्याने अनेकांच्या त्या संपल्याही! याकामी त्यांनी  कित्येक वेळा त्यांच्या आयुष्याचे हजारो तास खर्च केले असतील, आणि तेही मी हे ऐकून "केवढे उपकार करतोय" हा भाव चेहऱ्यावर तर नाहीच- मनात सुद्धा नं आणता... मीही मेघालयातल्या बारीक सारीक समस्या सांगून त्यांचे अनेक तास वाया घालवलेत आणि मला प्रचारक म्हणून संघकामाचा जेमतेम २- ४ वर्षाचा अनुभव असताना, हे मला आता जाणवतंय.. पण हेही मला अजून लक्खपणे, अगदी काल परवा घडल्यासारखं आठवतंय, की त्यांना मी जे काही सांगायचो त्याने मला उत्साह आणि तरतरी यायची. ज्यात त्यांनी काही करणं गरजेचं असेल, त्यावर ते परत कसलीही आठवण नं करता ते करून टाकायचे.
२००४ मध्ये मेघालयातल्या एका नव्या शाळेसाठी त्यांच्याकडे मदत मागितली, तीही फोनवर. मदत पोचली, शाळेचं काम सुरु झालं आणि अतिरेकी संघटना/ चर्च यांनी भयंकर विरोध केल्यामुळे काम बंद पडलं. ती शाळा कधीही सुरु झाली नाही. त्यांच्या कानावर ही गोष्ट फोनवर घातली, तर भेटल्यावर बोलू म्हणाले. प्रत्यक्ष भेटायच्या आधी भीती वाटली, पैसे पाण्यात गेले यावर ते काय म्हणतील? रागावतील का? चिडून बोलतील  का? भीत भीत त्यांना भेटलो.
त्यांनी तो विषय काढलाच नाही, म्हणून मीच विषय काढला- शाळा बहुतेक कधीच सुरु होणार नाही, पैसे पाण्यात गेले सगळे! प्रयत्न करू परत! हे ऐकून ते सहज, हसत हसत म्हणाले, "ठीके जाऊदे पैसे, ते मनाला लावून घेऊ नको, मला लक्षात आलं होतं ती शाळा पुढे जाणार नाही."

मी म्हटलं, "तुम्हाला आधी अंदाज असताना तुम्ही मला थांबवलं का नाही? पैसे का पाठवले?"

त्यावर मुकुंदराव म्हणाले, "तुला तिथे जाऊन ३ वर्ष झाल्येत फक्त, त्यात हे करू नको म्हणून तुला निराश करण्यात काही अर्थ नव्हता, म्हणून दिले पैसे. आता जे गेले त्यावर विचार करू नको. पुढच्या वेळी जास्त नियोजन करून काम सुरु करू!!"

या उत्तराने माझा आत्मविश्वास मधलाच पण नंतर कामाचा पूर्ण ट्रॅक बदलला... ज्या गारो समाजात पाय ठेवायला जागा नव्हती त्या गारो समाजातून २ वर्षांपूर्वी गुवाहाटीच्या महासम्मेलनात १४ गावातून ४१ गारो बंधू आले होते आणि गेल्या महिन्यात एक गारो विस्तारक मेघालयाच्या बाहेर संघ कामाला बाहेर पडला...
माझ्या त्यावेळच्या चुकीच्या निर्णयामुळे फुकट गेलेल्या पैशाचा-   तोही मा. मुकुंदरावांच्या संयमी, शांत दृढनिश्चयी स्वभावामुळे- आज १६ वर्षांनी संघाला परतावा मिळत आहे, एका गारो विस्तारकाच्या रूपाने...

मुकुंदतत्व...

माझ्यासारख्या असंख्य "दिशाहीन" "अनियंत्रित" तरुणांना आपल्या योजनेसुमार हव्या त्या दिशेला वळवणारं हे "मुकुंदतत्व" संघात जागोजागी असतं पण प्रत्यक्ष संपर्काशिवाय दिसत नाही, कारण त्याचा मुद्दाम प्रचार होत नाही. अशी  'मुकुंदतत्व' १९२५ पासून तयार होत राहिली म्हणून संघ वाढत राहिला, वाढत राहील. शेकडो जन्मांमध्ये माझ्या हातून झालेल्या पुंण्यामुळे  मा.मुकुंदरावांना जवळून अनुभवता आलं, हे परमभाग्य....

त्यांना परत एकदा कोटी कोटी नमन...

साभार- लेखक: विनय जोशी

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या