कोणताही लवाजमा बरोबर न घेता राम लक्ष्मण विश्वामित्रांच्या बरोबर निघाले. गुरूच्या सिद्धाश्रमाकडे नंतर लवकरच पोहचल्याच्या दृष्टीने रामांच्या अनुमतीने विश्वामित्रांनी त्राटिका वनातून जायचे निश्चित केले. जाताना त्राटीकाचा करावा लागणार सामना, आजूबाजूच्या परिसरातील भयभीत जनता, तिच्यामुळे अनेकांचा झालेला मृत्यू या गोष्टी विश्वामित्रांनी रामाला सांगितल्या. पुढे लगेचच त्या मार्गाने जाताना त्राटिका समोर येते. त्यावेळी गुरूंच्या आज्ञेने राम-लक्ष्मण त्राटीकेचा वध करतात. ही गोष्ट आपल्याला माहीत असते, पण त्यावर आपण विचार करीत नाही.
हा प्रसंग घडला तेव्हा रामाचं वय वर्षे साधारण 15 वर्ष असावं. कोणत्याही अस्त्रांचा वा अन्य शक्तींचा अभ्यास नाही, तरीही राम-लक्ष्मणांनी महा भयानक अश्या त्राटिका दैत्यीणीला मारले. हा प्रसंग किती धाडसाचा आहे! अनेकांना भीती घालणारी अति क्रूर अति भयानक अशी दैत्यरूपी स्त्रीचा राम वध करतात.
समाजाप्रती जाणवलेले आपले कर्तव्य व या कर्तव्याची जाणीव रामाला बालवयात मोठं करते. धाडस, शौर्य कणाकणातून उफाळून यायचं असं हे वय होतं का? पण जगावेगळं जेव्हा घडतं तेव्हा असामान्यत्व सिद्ध होतं. अशा प्रसंगांनी श्रीरामाला समाजाने प्रभू बनवलं होतं.
प्रत्यक्ष यज्ञ रक्षणासाठी देखील राम आणि लक्ष्मण दोघेच होते, की जे येणाऱ्या राक्षसावर शरसंधान करू शकतील. यज्ञाची सुरुवात झाल्यावर तात्काळ अनेक राक्षस आपल्या आगळ्यावेगळ्या शक्तीने तिथे येऊन यज्ञात व्यत्यय आणीत होते. त्यांना आडवणे, मारणे, नाहीसे करणे याचसाठी त्या दोघांना विश्वामित्रांनी इथे आणलं होतं. त्यांच्या अतुल्य पराक्रमाचे वर्णन कसे करावे? वेगवेगळ्या प्रकारचे बाण ते वापरत आणि विश्वामित्रांनी दिलेल्या शस्त्रांमुळे आणि विद्येमुळे ते हे युद्ध करू शकले.
अनेक दैवी शक्तीने युक्त असलेल्या अनेक राक्षसांना धारातीर्थी पाडणे म्हणजे अवघड आणि अप्राप्य होते. 'न भूतो न भविष्यती' असा प्रसंग होता. त्राटीका वधानंतर राम आपले काम निश्चित करू शकतील अशी खात्री वाटल्यावरच विश्वामित्रांनी राम-लक्ष्मणांना 'बला' आणि 'अतीबला' या दोन विद्या दिल्या होत्या. इतक्या लहान वयात त्यांना मिळालेला हा जगविख्यात पुरस्कारच होता आणि तोही आजपासून ७-८ हजार वर्षापूर्वी म्हणजे अभिमानास्पद आहे.
श्रीराम या एका राजपुत्राने वयाच्या पंधराव्या वर्षी या अफाट पराक्रमाने स्वतःचे शौर्य तर प्रकट केलेच, पण प्रसंगावधान, निर्णयक्षमता, चपळता सिद्ध केली. त्यांच्या अंगीभूत गुणांच्या अधिष्ठानातच त्यांचं प्रभुपद असावं असं वाटतं.
- सौ. नीला रानडे, धुळे
(श्रीरामचरित्र अभ्यासक व प्रवचनकार
मो. 9657059784)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या