शेकडो वर्षाच्या संघर्षा नंतर ५ ऑगस्टचा अयोध्येतील भूमिपूजन कार्यक्रम म्हणजे नवभारताच्या निर्मितीतील एक ऐतिहासिक टप्पा आहे. सारे भारतीय या भव्य मंदीर निर्माणात आपला सहभाग देण्यासाठी उत्सुक आहेत. या अभियानासाठी संपूर्ण देशभरातून निधी समर्पण करण्याची संकल्पना निश्चत झाली. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना देखील या मंदीर उभारणीत योगदान देता येणार आहे. देशभरातील सर्व गावातील सर्व घरांमध्ये यासाठी आवाहन करण्यासाठी रामभक्त नियोजन करीत आहेत.
प्रांत-जिल्हा-तालुका-मंडळ-गाव-वस्ती अशी योजना करुन समाजातील सज्जनशक्तीच्या सहकार्याने हे अभियान मकरसंक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणार असून माघ पौर्णिमे पर्यंत संपन्न होईल. सर्व घरापर्यंत प्रत्यक्ष भेटून हे अभियान करायचं असल्याने समाजातील सर्वांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. खारुताईचा सहभागही रामसेतू निर्माणात किती महत्वाचा होता हे आपण सारे जाणतोच. आपल्या जिल्हाची योजना करताना गावपातळी पर्यंत प्रत्येक घरापर्यंत संपर्काचा विचार व योजना केली असेलच. यासाठीच मी कोणत्या तरी भागाची जबाबदारी घेवून सर्व उत्साही तरुण, मात्रुशक्ती यांना सोबत घेवून या महाभियानात सहभागी होईल असा संकल्प केला आहेच.
सामाजिक समरसतेचे अनुपमेय उदाहरण हे भव्य मंदीर असणार आहे. जगातील सर्वात मोठे असे ३ क्रमांकाचे हे मंदीर असणार असून शरयू तीरावरील अयोध्येतील सुमारे १५० एकर मध्ये असलेले हे मंदीर भारतीय परंपरा, श्रद्धा आणि विश्वास याचं प्रकटीकरण असणार आहे. अशा या मंदीराचे निर्माण होत असताना भारतातील प्रत्येक सक्रीय व्यक्तीचा सहभाग या रामकार्यात असावा अशी योजना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने केली आहे. त्यामूळे इथून पुढील दोन महिने आपण सारे या तीर्थ क्षेत्राचे स्वयंसेवक कार्यकर्ते आहोत. आपल्या जिल्ह्यातील संपर्क व सहभागाची योजना आपण कल्पकतेने करुन अबाल-वृध्दांचा सहभाग या महाअभियानात व्हावा यासाठी योजना करायची आहे. हे सर्व करताना आपल्याला समाजाचे दर्शन घडणार आहे. यातून आपले मन तयार होईल आणि सामाजिक प्रश्नांची उकल करण्याची द्रुष्टी विकसित होईल. ज्या प्रमाणे स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांनी संपूर्ण भारताची परिक्रमा केली आणि याद्वारे झालेल्या भारताच्या दर्शनाने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, त्यामूळेच भारतीय जीवन दर्शनावर आधारीत चिंतन त्यांनी मांडले त्यामूळेच पर्यावरण, ग्रामविकास, जलसंधारण, स्वदेशी, गोसेवा, कुटुंब व्यवस्था या बाबतीत सारे विश्व भारताकडे मार्गदर्शनासाठी पाहते आहे.
या अभियानाच्या निमित्ताने लाखो कार्यकर्ते या भारतभूमीचे दर्शन घेवून श्रीराम मंदीरासाठी यथाशक्ती समर्पणाचे आवाहन करणार आहे. हे आवाहन करताना आपल्याला शहरी व ग्रामीण भागातील आपल्या कुटुंब पध्दतीला जवळून पाहता येणार आहे. या व्यवस्थेचे सामर्थ्य आपण कोरोनाच्या कठीण काळात पाहिले. या कुटुंबाने अनेकांना आधार दिला, विश्वास दिला, सेवेची द्रुष्टी दिली. त्याकाळात सारे जग स्तब्ध झाले मात्र याही काळात भारतात लाखो तरुण सेवाकार्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यामूळेच कोणी उपाशी राहिले नाही, गरजूंना रस्त्यात मदत मिळाली आणि सारा भारत या कठीण समयी बंधुत्वाच्या सुत्रात बांधला गेला. असा आपला हा भारत ... प्रभू श्रीरामाचा भारत आहे..!१४ वर्ष वनवासात असतांना प्रभू श्रीरामांनी अनवाणी पायांनी भ्रमण केले, अहिल्येचा उध्दार केला, शबरीची बोरं खाल्ली तर निषाधराजाला सहकार्य केले. प्रेम व मित्रता याचा आदर्श श्रीरामांनी स्थापन केला आणि असूर शक्तीचे निर्दालन करण्याची प्रतिज्ञा केली आणि रावणवधाने ती पूर्णही केली. यामूळेच एवढ्या हजारो वर्षांनंतरही मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा आदर्शावरच हा देश सतत चालतो आहे.
'प्राण जाए पर वचन न जाए' हे जणू जीवन तत्व या देशाचे आहे. म्हणूनच हे ५०० वर्षांच्या संघर्षानंतर निर्माण होणारे श्रीराम मंदीर भारतीयांचे राष्ट्र मंदीर आहे. यातून समाजाचे दर्शन घडल्यावर नवा क्षमतावान सामर्थ्यवान यशस्वी विश्वगुरु भारत आपण घडवू शकणार आहोत. त्यामूळे डोळसपणे, संवेदनशीलतेने आणि आग्रहपूर्वक प्रत्येक घरी जावून हे अभियान पूर्ण करुया व समाजाला यथाशक्ती भव्य मंदीर निर्माण करण्यासाठी निधी समर्पण करण्याचे आवाहन करुया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतर या सर्व नियमांचे पालन करुन उत्साहाने हे रामकार्य करुया...
यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!!
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या