गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीरामांनी आपली एक इच्छा आपल्या वडिलांकडे व्यक्त केली होती. अर्थात ही इच्छा होण्यामागचे कारण आहे, ते शिक्षण ग्रहणाच्या कालावधीत असावे. त्यावेळी लाडक्या पुत्राची मागणी दशरथाने मान्य केली. ती नाकारण्यासारखी नव्हती. त्यात कोणताही छंद नव्हता, करमणूक नव्हती. त्यांची मागणी ऐकून स्वतः दशरथ महाराजांना आणि गुरु वशिष्ठ यांना सुद्धा आश्चर्य वाटले होते. काही वेळा गुरुवर्य सर्व विद्यार्थ्यांना सारखंच ज्ञान देतात. विविध उदाहरणातून मुद्दा पटवून देतात. परंतु, त्यातून विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी काय आणि कसं ग्रहण करावं हे प्रत्येकाच्या बुद्धीच्या वृत्तीच्या आणि मनाच्या ताकदीवर अवलंबून असतं, आणि घडलंही तसंच.
रामांनी गुरूंच्या प्रत्येक शिकवणीतून असे ग्रहण केले जे त्यांना अवगत नव्हते. हा प्रसंग रामांचा वेगळेपणा सिद्ध करतो हे वाचकांनी स्मरणात ठेवावे. रामाने क्षत्रिय कुळात जन्म घेतल्याने युद्धशास्त्र, युद्धनीती, युद्ध रचना, गनिमीकावा वगैरे शिकताना अन्य अनेक गोष्टी जाणून घेतल्या होत्या. त्यामुळे शिक्षणानंतर रामांनी मला आपला सर्व देश पाहायचा आहे, ही इच्छा महाराजांकडे प्रकट केली. त्यामागे रामांच्या विचारांची दिशा किती वेगळी होती हे जाणवते. देशाटनानंतर तीन वर्षांनी राम परतले, परंतु तरीही त्यांना स्वतःची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद नव्हताच. ते अबोल आणि चिंतित होते.
त्यांच्या मनातलं कोणाजवळ न बोलणारे राम जेव्हा विश्वामित्र येतात तेव्हाच मनमोकळेपणाने आपली इच्छा व्यक्त करतात. या प्रसंगातही रामाचं वेगळेपण जाणवतं. यज्ञ रक्षणासाठी रामाने विश्वामित्र यांच्या बरोबर जावं हे ठरतं तेव्हा रामांना आनंद होतो.
श्रीरामांना प्रभुपद मिळण्यामागे आपल्याला त्यांच्या बालपणापासूनच या घटना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या प्रभुपदामागील एक कारण असे की त्यांना देशामध्ये ज्या गोष्टी दिसल्या, त्याच वेळी त्यांनी आपले ध्येय निश्चित केले आणि म्हणून त्यांनी आपल्या पित्यासमोर आपल्या मौनाचे कारण स्पष्ट केले. मी क्षत्रिय आहे मी युद्धाशिवाय अन्य काही शिकलो, पण त्याचा उपयोग मी केवळ आपल्याच संरक्षणासाठी करायचा का? हा समाज माझा आहे, अनेक ऋषी दैत्यांच्या छळामुळे मरण पावलेले आहेत, अनेकांचा छळ होतोय आणि अशावेळी मी माझ्या शिक्षणाचा उपयोग का नाही करायचा? मी त्यांना सहकार्य करू शकत नसेल, तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग? मग त्याला काहीच अर्थ राहणार नाही, असा विचार राम करतात. आपल्या पित्याला ते म्हणतात, आज मला गुरूंबरोबर जाण्यासाठी आपण अनुमती दिली आणि मला माझे ठरवलेले काम करण्यास संधी मिळाली. 'सज्जनांना अभय, दुर्जनांचे निकंदन' हा विषय वयाच्या पंधराव्या वर्षी रामाच्या मनात येतो आणि मनातील ठरवलेले ध्येय सुनिश्चित होते ही प्रभू पदासाठीची पहिलीच पायरी म्हणावी लागेल.
- सौ. निला रानडे, धुळे
(श्रीराम चरित्राच्या अभ्यासक आणि प्रवचनकार)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या