वेदांत रामायण हे रामायणाचे तात्त्विक दृष्टीने लिहिले गेलेले एक संस्करण आहे. ४ खंडांत लिहिल्या गेलेल्या या ग्रंथात रामायणातील सर्व पात्रे ही माणसे नसून वेदांत तत्त्वज्ञानातील संकल्पनांची प्रतीके म्हणून मांडली गेली आहेत. ग्रंथाच्या सुरुवातीला ब्रह्माच्या स्वरूपाचे वर्णन आहे. ब्रह्माचे स्वरूप चैतन्यमयी, अनादि आणि अनंत असल्याचे म्हटले आहे. ब्रह्म अजन्मा असल्याने तो मानव रूपात पृथ्वीवर येत नाही मात्र ब्रह्मज्ञानाच्या स्वरूपात तो पृथ्वीवर येतो. त्यामुळे त्याच्या अशा तत्व रूपात येण्याला 'अवतरण' असे म्हटले जाते. ज्या आत्म्याच्या माध्यमातून हे अवतरण होते त्याला 'अवतार' असे म्हटले जाते. त्यामुळे वेदांत रामायणाच्या अनुसार राम हा 'अवतार' आहे. तो ब्रह्मज्ञानाचा परिष्कार आहे.
ब्रह्मज्ञान पृथ्वीवर कुठे आणि कसे प्रकट व्हावे याला काही अटी आहेत. रामायणातील प्रत्येक घटक या ज्ञानाच्या पृथ्वीवरील अवतारणासाठी सुसज्ज असल्याचे वेदांत रामायण सांगते. वेदांती म्हणतात त्यानुसार दशरथ हा राजा नाही तर एक वृत्ती आहे. तत्त्वज्ञानाच्या अनुसार आपले शरीर हा एक रथ आहे आणि त्याला ५ कर्मेंद्रिये आणि ५ ज्ञानेंद्रिये असे १० घोडे आहेत. या रथावर मन आरूढ आहे आणि त्याच्या हातात लगाम आहे. मनाला जितके सैल सोडू तितके घोड्यांचे लगाम सैल होतील आणि इंद्रिये विषयांच्या दिशेने धावतील. दशरथ म्हणजे बुद्धीने अर्थात विवेकाने संचालित केलेल्या मनाचे प्रतीक आहे. ही अशी वृत्ती आहे ज्यात मनाने सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेऊन अखंड समाधानाची आणि संयमाची प्राप्ती केली आहे.
रामाच्या जन्माचे स्थान अयोध्या ही नगरी आहे. वेदांत रामायणाच्या मते अयोध्या म्हणजे जिथे युद्ध झाले नाही असे स्थान. हे युद्ध म्हणजे मानवी युद्ध नाही. या युद्धाचे स्वरूप अंतर्गत संघर्षाचे आहे. मानवी मनात अनेक विषय, विकार यांच्या अनुषंगाने विविध संघर्ष सुरू असतात. हे संघर्ष जिथे संपले म्हणजे जिथे विषयांचे आकर्षण संपले असे युद्ध नसणारे स्थान म्हणजे अयोध्या आहे. यातून हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अखंड शुद्धतेच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान अवतरित होतांना दिसते आहे.
अवतार तत्व हे आधी बुद्धीच्या ठायी मान्यता पावते. त्याला अंतःकरणात रुजविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याठिकाणी वेदांती म्हणतात की रामाच्या बुद्धीला समजलेले ब्रह्मज्ञान त्याच्या अंतःकरणात रुजविण्यासाठी त्याला जी संत शक्ती मदतरूप ठरली तिचे नाव 'विश्वामित्र' असे आहे. विश्वामित्र ही संपूर्ण जगाच्या प्रति समत्व राखणारी वृत्ती आहे. ज्याने संपूर्ण जगाला मित्र मानले आहे, आपले मानले आहे असे स्वरूप विश्वामित्राचे आहे. हे विश्वामित्र रामाचे गुरू आहेत. म्हणजे ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार रामाचे ठायी पूर्णत्वास नेण्यासाठी ते सहाय्यक आहेत.
अंतःकरण मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या चार बाबींनी मिळून निर्माण होते. या सर्व बाबींच्या शुद्धतेतून ब्रह्मज्ञानाचे आत्म्याशी मिलन होते. रामाच्या आयुष्यात विविध घटनांच्या माध्यमातून त्याच्या आत्म्याशी मिलन होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला आहे.
प्रस्तुत ग्रंथात त्राटीका राक्षसी म्हणजे मनाला विचलित करणाऱ्या दुराशेचे प्रतीक आहे, अहल्या ही विवेकाच्या अभावाने जड झालेल्या बुद्धीचे प्रतीक आहे, शिव धनुष्य हे सात्विक अहंकाराचे प्रतीक आहे. रामाने या विकारांवर कसा विजय मिळवला याचे प्रतीक म्हणजे रामायणातील या सर्व कथा आहेत. रामाने परशुरामावर केवळ वाणीने मिळवलेला विजय हे शुद्ध चित्ताचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीचे आचार - विचार हे आकर्षित करणारे असतात. राम - परशुराम संवादात असे दिसते की अत्यंत क्रोधीत झालेल्या परशुरामाला रामाने त्याच्या मृदू वाणीने जिंकले. हे आकर्षित करणाऱ्या वाणीचे उदाहरण आहे असे वेदांत रामायण मानते.
प्रस्तुत रामायणाच्या अनुषंगाने सीता ही भक्ती, शांती आणि आत्म्याचे प्रतीक आहे. राम आणि सीतेचा विवाह म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन आहे, परमेश्वर आणि भक्ती यांचे मिलन आहे, विवेकबुद्धी आणि शांती यांचे मिलन आहे.
या कथेतील रावण हे भोगवादी आसुरी वृत्तीचे प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आसुरी शक्ती अधिक प्रभावी होते तेव्हा शांतीचे हरण होते असे म्हटले जाते. सीतेचे हरण हे या शांतीच्या हरणाचे प्रतीक आहे. यामुळे संपूर्ण पृथ्वी अशांत झाली आहे, प्रत्येक जीव चंचल झाला आहे आणि शांतीच्या शोधत सर्वत्र फिरतो आहे. सीतेच्या शोधाचे वर्णन हे या वर्णनाशी जुळतांना दिसते.
रामायण कथेतील हनुमानाचे स्थान महत्वपूर्ण आहे. वेदांती हनुमानाला संत म्हणतात. आपल्याला मिळालेले श्रेष्ठ ज्ञान केवळ आपल्यापुरते न ठेवता सर्वांना मोक्षाचा मार्ग कळावा या हेतूने समाजाच्या उत्थानासाठी ज्ञानाचे वाटप करणारा हनुमान संत आहे. चराचर विश्वात सर्वत्र ब्रह्मतत्व पाहणाऱ्या हनुमंताला अद्वैती म्हटले आहे. हनुमान विविध प्रकारे चंचल झालेल्या समाजाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो आहे.
सीतेच्या शोधार्थ वनात फिरत असतांना स्वयंप्रभा देवीच्या गुहेत प्रवेश करण्याचा आणि तिथल्या मायावी जगाच्या दर्शनाचा एक प्रसंग वाल्मीकी रामायणात आढळतो. वेदांत रामायणाच्या दृष्टीने या घटनेचे वेगळे महत्व आहे. शांतीच्या शोधात भटकणाऱ्या चंचल समाजाला संत हनुमान अंतर्मनाचे दर्शन घडवतो असे यात म्हटले आहे. बाहेरून अत्यंत अंधारमय भासणाऱ्या गुहेत किती प्रकाश आहे हे यातून दर्शवले आहे. म्हणजे चैतन्यमयी, प्रकाशमान असणाऱ्या अंतर्मनाचे हे दर्शन आहे. त्यामुळे या गुहेचे रक्षण करणाऱ्या देवीचे नाव देखील स्वयंप्रभा आहे. इथून बाहेर पडताना सर्व वानर सैन्य फार समाधानी आणि तृप्त असल्याचे वर्णन आहे. अर्थात स्वतःच्या साधनेने अंतर्मनाच्या समाधानाचा आणि त्यातून मिळणाऱ्या दैवी शांततेचा हा अनुभव इथे प्रतिकात्मक स्वरूपात आपल्यासमोर मांडला आहे.
हनुमानाला संत म्हटले असल्याचे आपण पाहिले. संतांना देखील अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते हे पुढील कथेतून दिसते. लंकेचा समुद्र म्हणजे भवसागर असल्याचे मानले गेले आहे. या भवसागरात अनेक विकार समोर येतात. हनुमानाला भेटलेली पहिली राक्षसी म्हणजे सुरसा. ही सुरसा म्हणजे लोकेषणा. याचाच अर्थ लोकांनी सातत्याने केलेली स्तुती. माणूस स्तुती ऐकून हरखून जातो आणि यातून स्वतःला अधिकाधिक मोठा समजू लागतो. यातून सात्विक अहंकाराचा जन्म होतो. हनुमान इथे सूक्ष्म रूप धारण करून सुरसा च्या तावडीतून सुटतो. अर्थात वाढत जाणाऱ्या स्तुतीपुढे आपण अधिकाधिक विनम्र व्हावे या कृतीचे की कथा प्रतीक आहे. पुढची राक्षसी म्हणजे सिंहका आहे. हिचा निवास समुद्रात असतो आणि ही समुद्र पार करू इच्छिणाऱ्याची सावली धरून ठेवते व त्याला समुद्र ओलांडू देत नाही. वेदांत रामायणाच्या मते अनेक मोठया लोकांच्या ठायी असणारी ही ईर्षा वृत्ती आहे, पाय खेचण्याची वृत्ती आहे. या राक्षसीचा हनुमान वध करतो. संतांनी ईर्षा वृत्तीच मनात आणू नये आणि आलीच तर तिला तात्काळ मारून टाकावे हा या कथेचा संकेत आहे. पुढची राक्षसी लंकिणी आहे. ही भोगवादाची संरक्षक आहे. हनुमानाने तिच्यावर प्रहार करून तिने शरण येणे म्हणजे संतांच्या स्पर्शाने जागृत होणाऱ्या विरक्त भावाचे हे प्रतीक आहे. अशा विविध विकारांना पार करून संत हनुमान प्रत्यक्ष भोगवादाच्या नगरीत म्हणजे लंकेत पोहोचला आहे. इथे तो शांतीचा शोध घेतो आहे. त्याने भोगवादाला थोडे समजावून, थोडे घाबरवून मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला आहे मात्र भोगवाद, आसुरी वृत्ती प्रबळ झाली आहे. तेव्हा संत देवतांचे स्मरण करतात. रामरूपी देव तिथे प्रकट होतात.
प्रस्तुत ग्रंथात सांगितल्यानुसार रावणाची १० मुखे म्हणजे मोहाचे प्रकार आहेत. राम अर्थात ब्रह्मज्ञान या मोहावर प्रहार करतो आहे. मोहावर प्रहार केला की त्याचा भाऊ अहंकार (कुंभकर्ण) जागा होतो, त्यावर प्रहार केला की मोहाचा पुत्र काम (मेघनाद) जागा होतो. ज्ञानी पुरुष काम वृत्ती मारून आणि अहंकाराला तोडून मोहाचा अंत करतात. भोगवादाचे मूळ मोह आहे. त्यामुळे मोहाचा अंत झाल्याने भोगवादाचा देखील अंत होतो. शांतीचे देवतेशी, आत्म्याचे परमात्म्याशी पुन्हा एकदा मिलन होते आणि पृथ्वीवर अखंड शांती, आनंद, समृद्धी, समाधान यांची प्रस्थापना होते.
वेदांत रामायण म्हणजे तत्व रामायण आहे. यातील प्रत्येक पात्र म्हणजे एकेक तत्व आहे. यात सांगितलेले तत्वज्ञान म्हणजे केवळ साधकांचे नियम नाहीत तर दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे. वेदांत रामायण म्हणजे मानवाच्या उत्थानासाठी केलेले तात्त्विक मार्गदर्शन आहे.
मधुरा गजानन डांगे,
नंदुरबार.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या