भगवान परशुराम

@अभिजित खेडकर

जन्म क्रमानुसार सप्त चिरंजीवांमध्ये दुसरा क्रमांक येतो तो भगवान परशुराम यांचा. परशुराम हे एकमेव असे आहेत कि ज्यांचे नाव दशावतारांमध्ये आहे आणि सप्त चिरंजीवांमध्ये देखील आहे. परशुरामांचा कर्म कालखंड हा सर्वात मोठा कालखंड समजला जातो. रामायण कालखंडाच्या, राम अवताराच्या आधी त्यांचा जन्म आणि बऱ्याचश्या प्रमुख जीवित कार्याचा उल्लेख येतो. तर रामायण काळात रामांकडून शिवधनुष्य भंगाच्या प्रसंगाच्या वेळी आणि महाभारत काळात भीष्म, द्रोण आणि कर्ण यांचे शस्त्रगुरु म्हणूनही त्यांचा उल्लेख येतो. ब्रम्ह्वैवर्त पुराणात एक कथा आहे, त्यानुसार परशुराम एकदा भगवान शंकरांना भेटायला कैलासावर गेले, परंतू शंकरांची आज्ञा नसल्यामुळे द्वारावर रक्षक म्हणून उभे असलेल्या गणेशांनी त्यांना अडविले, त्यावरून त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धात गणेशांचा एक दात तुटला, तेव्हापासून त्यांना एकदंत असे नाव पडले. 

परशुराम हे ऋषी जमदग्नी आणि त्यांची पत्नी रेणुका ह्यांचे पाचवे पुत्र. जन्माने ब्राम्हण कुळातील असले तरी, कर्माने क्षत्रिय म्हणून ओळखले जातात. शस्त्र आणि शास्त्र या दोहिंवरही समान अधिकार आणि प्राविण्य प्राप्त केल्याने,
"अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।" 
अर्थात चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो (तो परशुराम). असे त्यांचे यथार्थ वर्णन केले जाते.

परशुरामांच्या जन्मस्थानाबद्दल अनेक प्रवाद आहेत. माथुर चतुर्वेदी ब्राम्हणांच्या इतिहासाचे लेखक, श्रीबाल मुकुंद चतुर्वेदी यांच्या अनुसार भगवान परशुरामांचा जन्म ई. पू.5142 . वैशाख शुक्ल तृतीयेच्या म्हणजेच अक्षयतृतीयेच्या रात्री प्रथम प्रहरी झाला. परशुरामांचा जन्मसमय सतयुग आणि त्रेतायुगाचा संधिकाल मानला जातो. भृगुक्षेत्रा चे संशोधक साहित्यकार शिवकुमार सिंह कौशिकेय यांच्या अनुसार परशुरामांचा जन्म उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील खैराडीह या गावात झाला होता. त्यांच्या शोध कार्यानुसार उत्तर प्रदेश राज्याच्या बलिया जिल्ह्याच्या शासकीय राजपत्रातही याची सचित्र माहिती दिली आहे. एका मान्यतेनुसार त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदौर जवळ महू गावातील जानापाव पर्वतावर झाला असे मानले जाते. दुसऱ्या एका मान्यतेनुसार परशुरामांचा जन्म छत्तीसगढ़ च्या सरगुजा जिल्ह्यातील घनदाट जंगलात असलेल्या कलचा गावातील प्राचीन महालाच्या, शतमहाल नावाच्या खंडहरात झाल्याचे सांगितले जाते. तो महाल हा जमदग्नी ऋषींच्या पत्नीचा, रेणुकेचा होता असे मानले जाते. हा सारा भाग प्राचीन दंडकारण्याचा भाग मानला जातो. 

परशुरामांची आपल्याला ओळख आहे ती प्रामुख्याने, त्यांनी पित्याच्या आज्ञेवरून स्वतःच्या मातेचा आणि चारही भावांचा एक क्षण हि विचार न करता केलेला वध किंवा पिता प्रसन्न झाल्यावर माते सहित सर्व भावांना पुन्हा जिवंत करण्याच मिळवलेल वरदान, हैहयराज सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुनाशी जबरदस्तीने कामधेनु पळवून नेल्यामुळे आणि आपल्या पित्याची जमदग्नी ऋषींची त्याने केलेली हत्या यामुळे त्याच्याशी केलेले युद्ध आणि त्याचा केलेला वध, सत्तांध झालेल्या अनेक क्षत्रिय राजांच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आपल्या क्षत्रीयकुलोत्पन्न मातेच्या; रेणुकेच्या आदेशावरून एकवीस वेळा नि:क्षत्रिय केलेली पृथ्वी या घटनांमुळे. परंतु परशुरामांच कार्य केवळ एवढचं नाहीये.

परशुरामांना केरळ मधील सुप्रसिध्द भारतीय युद्धकला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्लारीपत्तू (म्हणजेच जुडो कराटे चा मूळ भारतीय अवतार) या प्रकाराचे संस्थापक जनक म्हणूनही ओळखले जाते. प्रामुख्याने मलबार क्षेत्रात ओळखल्या जाणार्या उत्तरी कल्लारीपत्तू चे संस्थापक परशुरामांना आणि कन्याकुमारी क्षेत्रात अभ्यास केल्या जाणाऱ्या दक्षिणी कल्लारीपत्तू चे संस्थापक अगस्त्य ऋषींना मानले जाते. कल्लारीपत्तू चे मुळ उद्गाता साक्षात भगवान शिव मानले जातात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अगस्ती आणि परशुराम यांनी या कलेचा विकास केला. 

एका मान्यतेनुसार परशुरामांनी ऋषी अगस्तींची पत्नी लोपामुद्रा, ऋषी अत्री पत्नी अनुसूया आणि आपला एक शिष्य अकृतवण यांच्या सहकार्याने संपूर्ण भारतखंडात नारीजागृती अभियानाचेही कार्य उभे केल्याची माहिती मिळते.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी वरील कोकण पासून ते थेट केरळ पर्यंतची अपरांत भूमी ही परशुरामांनी आपल्या परिश्रमाने आणि अद्भुत अश्या भूमीअभियांत्रीकी च्या ज्ञानाने समुद्र चारशे योजन मागे हटवून अर्थात समुद्रात भर घालून (Land Reclamation) त्या काळात अक्षरशः काही हजारो वर्षांपूर्वी निर्माण केली आणि वस्तीयोग्य बनवली. हि सारी भूमी आज परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते, आणि परशुरामांना सप्तकोकणचे देव म्हणून मानले जाते. 

अरुणाचल प्रदेशातील लोहित स्थानी ज्या ठिकाणी ब्रम्हपुत्र नदी भारतात प्रवेश करते, तेथे एक तलाव “परशुराम कुंड” नावाने प्रसिध्द आहे. असे मानतात कि मातेची हत्या केल्या नंतर त्यांच्या हातातील परशु त्यांच्या हातातच चिटकून राहिला. तेव्हा त्यांच्या पित्याने, जमदग्नी ऋषींनी त्यांना सांगितले कि तसाच जाऊन भारतातील प्रत्येक कुंडात स्नान कर, ज्या ठिकाणी तुझ्या हातातील परशु गळून पडेल, तेव्हा तू मातृहत्येच्या पातकातून मुक्त होशील. परशुराम सारा भारत फिरून जेव्हा या ठिकाणी आले, तेव्हा त्यांचा परशु मुक्त झाला, तेव्हापासून या स्थानाला परशुराम कुंड म्हणून मान्यता आहे. दर मकरसंक्रांती च्या दिवशी येथे मोठा मेळा भरतो. या कुंडात स्नान केल्याने पापमुक्ती होते असे मानले जाते. परशुरामांनी आपल्या पित्याची आज्ञा मानून आपल्या मातेची, रेणुकादेवीची हत्या केली. परंतु पुन्हा आपल्या पित्याला प्रसन्न करून घेत त्यांनी मातेचे आणि भावांचे प्राण परत मिळवले, यावरून प्रसन्न होऊन पिता जमदग्नी ऋषींनी त्यांना इच्छामृत्यू अर्थात चिरंजीवित्वाचा वर दिला. 

असं म्हणतात कि परशुरामांनी अनेक विद्या आपल्या बालपणीच अवगत केल्या होत्या. त्यात विशेष म्हणजे त्यांना पशु-पक्षांची हि भाषा येत होती. कुठलेही हिंस्त्र पशु सुद्धा त्यांच्या सहवासात आल्यावर त्यांचे मित्र बनून जात असत. 

परशुरामांच्या काही जणांना होणाऱ्या साक्षात्कारांच्या कथा आजही भारतात काही ठिकाणी ऐकायला मिळतात.

चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामांच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असे म्हणतात. परशुरामांच्या इथल्या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत,उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. असे सांगतात कि एकदा या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होते. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.

दुसरं एक स्थान टांगीनाथ धाम. झारखंड राज्यातील गुमला शहरापासून ७५ कि.मी.आणि रांची शहरापासून १५० कि.मी.अंतरावर वसलेल्या घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. भगवान रामांशी भेट झाल्यानंतर परशुरामांनी आपले अमोघ धनुष्य पुढील अवतार कार्यासाठी श्रीरामांना देऊन ते स्वतः बिहार च्या या क्षेत्रात आले आणि जमिनीत आपला परशु गाडून तपश्चर्येला बसले. येथेच आजही भार्गवरामांचा हा परशु जमिनीत गाडलेला आहे. परशुला झारखंडच्या स्थानिक भाषेत टांगी म्हटलं जातं. ह्यावरूनच ह्या जागेचं नाव टांगीनाथ असं पडलं. त्या जागी श्री परशुरामांचे पदचिन्ह सुद्धा अजून दिसतात. 
येथे असलेल्या परशु बद्दल सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे हजारो वर्ष सतत हवा आणि पाणी ह्यांच्या संपर्कात राहून ही त्या परशुला अजून ही गंज चढलेला नाही आहे त्या अवस्थेत अजूनही सुस्थितीत आहे. दुसरं आश्चर्य म्हणजे जमिनीत गाडला गेलेला परशु किती खोलवर आहे ह्याची अजूनही निश्चीती नाही, पण हा परशु अंदाजे १७ फुट असावा असे अनुमान आहे.
असं सांगितल जातं की एकदा ह्या परिसरात राहणाऱ्या व लोहार काम करणाऱ्या समाजातील काही लोकांनी लोखंड मिळवण्याच्या हेतूने परशु ला कापण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले. उलट तसा प्रयत्न करणाऱ्यांचा एक एक करून मृत्यू होऊ लागला. ह्यामुळे भयभीत झालेल्या त्या जमातीने जसा तो परिसर सोडला तसा आजही त्या परिसराच्या १५ कि.मी च्या घेऱ्यात अजून ही लोहार जातीचे लोक राहत नाही. सन १९८९ मध्ये पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात सोने चांदीचे आभुषणांसह अनेक मौल्यवान व पुरातन वस्तू आढळून आल्या उदा.हिरे जडीत मुकुट चांदीचे अर्धगोलाकार शिक्के, कानात घालण्यात येणारी सोन्याची बाळी, तांब्याचा डबा ज्यात काळी तीळ आणि तांदूळ होते. ह्या सगळ्या गोष्टी आजही डमुरी येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

सन १९४४ साली अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे गादीपुरुष श्री गजानन महाराज हे आपल्या तक्तपोथावर बसलेले असतांना सकाळी त्यांच्या समोर साक्षात भगवान परशुराम प्रकट झाले. श्री गजानन महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे साक्षात त्रिमित स्वरुपात परंतू वेगळ्याच मितीत अन्य कुणालाही न दिसता महाराजांसमोर प्रकट झाले. शेजारीच पहुडलेल्या चार अर्धग्लानीत असलेल्या, गलितगात्र झालेल्या चार श्वानांकडे निर्देश करून म्हणाले कि, "सध्याच्या काळात चारही वेदांची स्थिती अशी दीन झाली आहे, आपण याचा पुनरुद्धार करावा." अशी आज्ञा देऊन पुन्हा अंतर्ध्यान पावले. महाराजांनी तीच गुरुदक्षिणा मानून श्रुतींचे पुनरुज्जीवन करण्याची प्रतिज्ञा घेऊन अक्कलकोट येथे वेद विद्या अनुसंधानाचे आणि अग्निहोत्र प्रसाराचे कार्य सुरु केले. नोव्हेंबर, 2017 मध्ये आणि सलग दुसऱ्या वर्षी नोव्हेंबर, 2018 मध्ये ही येथील मंदिरात एका रात्रीत अचानक काही पावले उमटल्याचे सकाळी मंदिर उघडल्यानंतर पुजार्यांच्या लक्षात आले. यात काही पावलांचे ठसे प्राण्यांचे आणि काही ठसे मानवाच्या पावलांच्या ठश्यांसारखे, परंतू नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचे असल्याचे दिसून आले. हे भगवान परशुरामांच्या पाऊलांचे ठसे असावेत असे मानले जाते.

भगवान परशुरामांचा उल्लेख हा कल्की पुराणातही आलेला आढळतो. त्यात आलेल्या वर्णनानुसार जेव्हा कलियुगाच्या शेवटी शम्भल नावाच्या ग्रामांत कल्की अवतार होईल तेव्हा भगवान कल्कींना शस्त्र आणि शास्त्र दीक्षा देण्याची जबाबदारी भगवान परशूरामांवर असेल. पुराणानुसार सध्या ते महेंद्रगिरी पर्वतावर ध्यानस्थ आहेत. यातही दोन प्रवाद आढळतात, एक महेंद्रगिरी समुद्रसपाटी पासून सुमारे पाच हजार फुट उंचावर ओरिसा राज्यातील गजपती जिल्ह्यातील पराखेमुंडी या स्थानी आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. दुसरा महेंद्रगिरी आहे कोकणात, चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. त्यालाही महेंद्रगिरी म्हणूनच ओळखले जाते आणि परशुराम सध्या तेथे तपस्या करीत आहेत असेही मानले जाते. 

अतिशय मोठा कार्य कालखंड असलेले भगवान परशुराम आजही साऱ्या समाजाला वंदनीय आणि प्रेरणादायी असेच आहेत.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या