"स्वतंत्रता संग्राम में जनजाति नायको का योगदान” या विषयावरील सुंदर तैलचित्रांची प्रदर्शनीचे आयोजन



देवगिरी कल्याण आश्रमाव्दारे दरवर्षी दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतिनिमित्त देशभर विविध कार्यक्रम केले जातात. गेली अनेक वर्ष संस्थेव्दारे प्रयत्नपूर्वक या दिवसाला, "जनजाति गौरव दिन" म्हणून भारतभर महत्वाचे कार्यक्रम केले जातात. यावर्षी शासनाने सुध्दा या दि.15 नोव्हेंबरला जनजाति गौरव दिन म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत अधिकृत आदेश आले आहेत. 
देवगिरी कल्याण आश्रमाच्यावतीने जनजाति गौरव दिन कार्यक्रमाची वातावरण निर्मीती होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून “स्वतंत्रता संग्राम में जनजाति नायको का योगदान” या विषयावरील सुंदर तैलचित्रांची प्रदर्शनी धुळे महानगरातील जो. रा. सिटी महाविद्यालयात सर्व धुळेकरांसाठी भरवण्यात आलेले आहे. आज शुक्रवार दि.11/11/2022 रोजी सकाळी धुळे जिल्हयाचे मा.जिल्हाधिकारी श्री.जलज जी शर्मा यांचे हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी धुळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, देवगिरी कल्याण आश्रमचे प्रांत सचिव मा.डॉ. श्री. मंदारजी म्हस्कर व इतर पदाधिकारी, राष्ट्रिय स्वयंसेवक संघ व इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच महानगरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला देवगिरी कल्याण आश्रमचे जिल्हा प्रमुख श्री.महेंद्रजी विसपुते यांनी प्रास्ताविकात विषयाची मांडणी केली. त्यानंतर धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.रविंद्रजी बेलपाठक, मा.जिल्हाधिकारी श्री.जलजजी शर्मा व देवगिरी कल्याण आश्रमाचे महानगर प्रमुख श्री.विठ्ठलरावजी ओढेकर यांनी दिपप्रज्वलन व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. श्री.विठ्ठलराव ओढेकर यांनी मा.जिल्हाधिकारी यांना भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली. 

उपस्थितांना संबोधित करतांना मा. जिल्हाधिकारी यांनी म्हटले की, “जनजाति समाजातल्या नायकांनी स्वातंत्र्यलढयात मोठे योगदान दिलेले आहे. याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. कल्याण आश्रमाचे काम मी अनेक दिवस झाले पाहत असून, पुढच्या पिढीपर्यंत याविषयांची जागृती करण्याचं महत्वाचं काम या माध्यमातून होत आहे. संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, आवश्यक तिथे मला संपर्क करावा, त्यांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु.” तद्नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत मा.जिल्हाधिकारी यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन केले.

यावेळी मा.जिल्हाधिकारी महोदयांनी मोठ्या उत्सुकतेने सर्व प्रदर्शनी पाहिली, त्यांना डॉ. श्री. मंदारजी म्हस्कर यांनी भारतभरातल्या सर्व जनजाति नायकांची थोडक्यात माहिती दिली. यावेळी आपल्या भागातील रावलापाणि व इतर महत्वाच्या ठिकाणांविषयी जाणून घेतल्यावर, मा.जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणांना भेटण्याची ईच्छाही दर्शवली आहे.

आजपासून मंगळवार दि.15/11/2022 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी याचा मोठया प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन देवगिरी कल्याण आश्रमाव्दारे करण्यात आलेले आहे.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या